लोणावळा : लोणावळा परिसरात शाळकरी मुलावर तीन अल्पवयीन मुलांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली. मारहाणीत शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत १६ वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला असून तो कामशेत परिसरात राहायला आहे. त्याने याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणवळ्यातील डोंगरगाव आणि आगवाली चाळ परिसरात राहणाऱ्या तीन मुलांना ताब्यात घेण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाच्या आदेशाने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. हेही वाचा >>> पुण्यात टपाल खात्यातील अधिकाऱ्यांकडून २४ लाख रुपयांचा अपहार लोणावळ्यातील गवळीवाडा परिसरातील एका शाळेत अकिब आहे. तो शाळेच्या परिसरातून निघाला होता. त्या वेळी तीन मुलांनी त्याला पकडले. त्याच्या पोटावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. त्याच्या डोक्यात कठीण वस्तू मारली. मारहाणीत अकिब जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत. या पूर्वी लोणावळा शहर परिसरात शाळकरी मुलांची भांडणे झाली होती. भांडणाची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली होती. काही महिन्यांपूर्वी लोणावळ्यातील कुरवंडे रस्त्यावर शाळकरी मुलावर शस्त्राने वार करण्यात आले होते.