लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून अनेक पुणेकरांच्या घरातील नळ कोरडे पडले असताना त्यांना विनामूल्य पाणीपुरवठा करण्याऐवजी टँकरमधील पाण्याची परस्पर चढ्या दराने विक्री होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. टँकरचालक नागरिकांकडे पैशांची मागणी करत असल्याची कबुली प्रशासनाने दिली असून, तक्रार आल्यानंतर टँकरचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याच्या काळ्या बाजारासंदर्भातील तक्रारींसाठी नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अनेक पुणेकरांच्या घरातील नळ कोरडे पडले असताना टँकरचालकांना मात्र मुबलक पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे अपुरा पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर असताना टँकर मात्र दुसरीकडेच धावत आहेत. टँकर कुठे जातो, हे समजण्यासाठी आवश्यक असलेली जीपीएस यंत्रणा केवळ नावालाच असून, त्यावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे टँकरमधील पाण्याचा काळा बाजार होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी ‘नळ कोरडे; टँकर काठोकाठ’ या शीर्षकाने दिले होते. त्यामध्ये टँकरद्वारे होत असलेला काळा बाजार पुढे आणण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याची गंभीर दखल घेतली असून, टँकरचालक पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्याची कबुलीही दिली आहे.

आणखी वाचा-“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले

नवीन समाविष्ट गावांमध्ये तसेच शहराच्या जुन्या हद्दीतील ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे, त्या ठिकाणी महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिकेकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. टँकरद्वारे विनामूल्य पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना टँकरचालकांकडून पैशांची मागणी होत आहे. तशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पैशांची मागणी करणाऱ्या चालकांची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकाची सुविधा देण्यात आली आहे.

टँकरचालकांकडून पैशांची मागणी करण्यात आल्यास टँकर क्रमांक, पैशांची मागणी करणाऱ्या संबंधित व्यक्तीचे नाव, तक्रारदाराचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह महापालिकेच्या १८००१०३०२२२ या नि:शुल्क दूरध्वनीवर संपर्क साधता येणार आहे. तसेच ८८८८२५१००१ या व्हॉटस्ॲप क्रमांकावरही तक्रार नोंदविता येणार असून ‘पीएमसी केअर ॲप’ वरही छायाचित्र आणि अन्य पुराव्यांसह तक्रार करता येणार आहे.

आणखी वाचा-भाजपचे ‘घर चलो अभियान’! पुण्यातील बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार

महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, टँकरचालक पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापुढे नागिरकांना थेट तक्रार करता येणार आहे. या सर्व तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जाईल. -नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका