लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे/ इंदापूर : इंदापूर, बारामतीमधील राजकीय परिस्थितीची कल्पना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संघर्ष होता. काही ठिकाणी तो टोकाचा होता. युती करणे नेत्यांसाठी सोपे असते, कार्यकर्त्यांसाठी काम करणे अवघड असते, याची जाणीव आहे. मात्र पंतप्रधान मोदींसाठी त्यांना बरोबर घेऊन काम करायचे आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर येथील नाराजी नाट्यावर भाष्य केले. इंदापूर तालुक्याचे पालकत्व मी स्वीकारले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी सातत्याने व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा इंदापूर येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी फडणवीस बोलत होते. आमदार राहुल कुल, वासुदेव काळे, अंकिता पाटील, चंद्रराव तावरे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, ॲड. कृष्णाजी यादव, मारुतराव वणवे, ज्ञानेश्वर चवरे, अतुल तेरखेडकर या वेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने विरोध केला. काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यासही सुळे यांचा विरोध असल्याचा आरोप फडणवीस यांनी या वेळी केला.

आणखी वाचा-भाजपचे ‘घर चलो अभियान’! पुण्यातील बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार

ते म्हणाले, की बारामतीची लढाई शरद पवार विरोधात अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी नाही. ती नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी आहे. राजकीय समीकरणे बदलण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संघर्ष होता. काही ठिकाणी तर तो टोकाचा होता. मात्र मोदींसाठी घेतलेल्या निर्णयाला साथ द्यावी लागणार आहे. त्या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांच्यासह काही जणांबरोबर चर्चा झाली आहे. मोठ्या ध्येयासाठी काम करायचे आहे. जे झाले ते विसरून महायुतीसाठी काम करायचे असून, मोदींसोबत संसदेत बारामतीचा खासदार हवा आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकले असून, सभेच्या माध्यमातून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विश्वास देण्यासाठी मी आलो आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर इंदापूरचे पालकत्व स्वीकारले असून, येत्या काळामध्ये इंदापूर-दौंडच्या विकासाला मदत केली जाईल. तसेच मुळशी धरणाचे पाणीही इंदापूर तालुक्याला देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

इंदापूरचा कार्यकर्ता स्वाभिमानी विचारांचा आहे. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये खालच्या पातळीवरचे राजकारण होत आहे. खोटे गुन्हे, खटले दाखल केले जात आहेत. कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. पोलिसांवर दबाव टाकला जात आहे, अशी तक्रार हर्षवर्धन पाटील यांनी केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी बारामतीमधील महायुतीच्या उमेदवाराचे काम केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

आणखी वाचा-खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाची बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या

प्रवीण मानेंबरोबर फडणवीसांची चर्चा

इंदापूर येथील सोनाई दूध डेअरीचे संचालक प्रवीण माने यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात माने काही दिवसांपूर्वी दिसून आले होते. फडणवीस आणि माने यांच्यातील भेटीचा नेमका तपशील पुढे आला नाही. मात्र, माने जुने मित्र आहेत. ते सातत्याने माझ्याकडे येत असतात. इंदापूरला येऊनही त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी येत नाही, असे ते म्हणाले होते. त्यामुळे इंदापूरच्या पुढील भेटीत चहा पिण्यासाठी येईल, असे आश्वासन मी दिले होते. त्यानुसार मी भेट घेतली. ते जुने मित्र आहेत आणि आमच्याबरोबरच आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे चर्चाही सुरू झाली आहे.