मिलेनियम प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा बुधवारी सकाळी शाळेच्या आवारामध्ये मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मिलेनियम प्रशाला गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
कर्वेनगर येथील मिलेनियम शाळेमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या दिशांत झारकर (रा. रविवार पेठ) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. खेळाच्या तासाला बास्केट बॉल खेळून परत वर्गात जात असताना दिशांत चक्कर येऊन पडला. त्या वेळी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यावर प्रथमोपचार केले. मात्र, दिशांतकडून त्याला काहीच प्रतिसाद न मिळत नाही, हे पाहून त्याला उपचारासाठी शाळेजवळील शाश्वत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दिशांतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाश्वत रुग्णालयाचे संचालक डॉ. पी. एस. करमरकर यांनी सांगितले, ‘‘दिशांतला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याला कार्डियाक मसाज करण्यात आला. मात्र, त्याला दिशांतने प्रतिसाद दिला नाही. त्याच्या मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला आहे.’’
शाळेच्या मुख्याध्यापिका अर्पिता करकरे यांनी सांगितले, ‘‘दिशांत हा खूप हुशार आणि मेहनती विद्यार्थी होता. अभ्यास, खेळ आणि शाळेच्या सर्वच उपक्रमांमध्ये तो आघाडीवर असायचा. दिशांत किंडरगार्टनपासून मिलेनियम शाळेचा विद्यार्थी होता. त्याच्या आरोग्याच्या तक्रारीही नव्हत्या. दिशांतच्या अकस्मात मृत्यूने शाळेतील सर्वानाच धक्का बसला आहे.’’
याबाबत वारजे पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, दिशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे.