ससून सर्वोपचार रुग्णालयात १४ वर्षांच्या मुलीवर ‘कायफो स्कोलिऑसिस’ म्हणजे पाठीच्या कुबडावरील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राजीव गांधी योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधा रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. दीपक कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. 
रुग्ण मुलीच्या पाठीला ५५ अंशांचा बाक होता. सुमारे पाच तास चाललेल्या शस्त्रक्रियेत हा बाक सरळ करण्यात आला.
कायफो स्कोलिऑसिस म्हणजे पाठीचे कुबड बालपणी किंवा पौगंडावस्थेत उद्भवण्याची शक्यता असते. काही रुग्णांमध्ये या आजाराची कारणे स्नायूंशी निगडित असतात, तर काही रुग्णांमध्ये कोणतेही ठोस कारण आढळत नाही. खांद्यांची असमानता, कमरेच्या दोन्ही बाजूंच्या उच्चनीचतेतील फरक, पुढे वाकल्यावर पाठीला येणारा बाक, ही या आजाराची लक्षणे असू शकतात. या आजारामुळे रुग्णाच्या फुफ्फुसांतील तसेच पायांतील ताकद कमी होते. पौगंडावस्थेतील रुग्णांच्या पाठीस येणारा बाक तुलनेने कमी असल्याने तो ब्रेसेस लावून बरा करता येऊ शकतो. परंतु हा बाक ४० ते ५० अंशांपेक्षा अधिक असल्यास शस्त्रक्रिया आवश्यक ठरू शकते, अशी माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.
डॉ. चंदनवाले, डॉ. विशाल पाटील, डॉ. राहुल पुराणिक, डॉ. कुणाल बन्सल आणि डॉ. अंकित पोखर्णा आदींनी मिळून ही शस्त्रक्रिया केली. तर परिचारिका राधा खान यांनी शस्त्रक्रियेत साहाय्य केले. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता एम. बी. शेळके यांनी या शस्त्रक्रियेसाठी विशेष देणगी गोळा केली होती.