पुणे : संपलेल्या गळीत हंगामाप्रमाणे आगामी गळीत हंगामही विक्रमी ठरणार आहे. साखर आयुक्तालयाने वर्तविलेल्या अंदाजानुसार इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात येणारी सुमारे १२ लाख टन साखर वगळून आगामी हंगामात १३८ लाख टन साखर उत्पादन होणार आहे. राज्यातील उसाचे क्षेत्र १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टरवर गेल्याचेही अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

 आगामी गळीत हंगामाविषयी साखर आयुक्तालयाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, गळितासाठी १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध असणार आहे. मागील हंगामात ऊसतोड झालेल्या क्षेत्रापेक्षा सध्याचे ऊसक्षेत्र सरासरी हजार हेक्टरने अधिक असणार आहे. सरासरी हेक्टरी ९५ टन प्रमाणे उत्पादन गृहीत धरले असता हंगामासाठी एकूण १४१३ लाख टन ऊस उपलब्ध असणार आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सरासरी १०० लाख टन अधिक ऊस उपलब्ध होणार आहे. या एकूण उसापैकी ९५ टक्के ऊस गाळपासाठी येईल, असे गृहीत धरल्यास १३४३ लाख टन ऊस प्रत्यक्षात साखर कारखान्यांत गाळपासाठी येईल. सरासरी ११.२० टक्के साखर उतारा गृहीत धरल्यास १५० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. इथेनॉल निर्मितीसाठी १२ लाख टन साखरेचा संभाव्य उपयोग गृहीत धरल्यास प्रत्यक्षात राज्यात १३८ लाख टन साखर उत्पादन होईल. हे साखर उत्पादन मागील वर्षांच्या तुलनेत एक लाख टनांनी अधिक असेल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे.

मराठवाडय़ात ऊसतोडणीच्या नियोजनाची गरज

यंदा मराठवाडय़ात ऊसतोडणी करताना कारखान्यांच्या नाकीनऊ आले होते. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी १५० दिवस आणि जालन्यात २०० दिवस हंगाम चालला होता. यंदाही मराठवाडय़ात सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. धरणे भरली आहेत. त्यामुळे उसाला पाणी कमी पडणार नाही. उसाचे एकरी उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही मराठवाडय़ातील ऊस वेळेत तोडणी होण्याची शक्यता कमीच आहे. शेतकरी आणि कारखान्यांची होणारी संभाव्य दमछाक टाळण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे.

सांगली, बीड, जालन्यात क्षेत्र वाढले

बीड जिल्ह्यात मागील हंगामात तोडणी झालेले क्षेत्र ४९ हजार ५८१ हेक्टर होते. यंदा त्यात मोठी भर होणार असून, ८४ हजार २०८ हेक्टर क्षेत्र तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे. जालन्यात मागील हंगामात ३४ हजार ४३४ हेक्टर क्षेत्रावरील उसाची तोडणी झाली होती. यंदा ४७ हजार २२७ हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे. मागील हंगामात सांगली जिल्ह्यात ९२ हजार ७१५ हेक्टरवरील उसतोडणी झाली होती. आता १३ लाख ७ हजार ५८५ हेक्टरवरील ऊस  तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे.

यंदाचा हंगाम गळीत हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या कारखान्यांना शक्य आहे त्यांची गाळप क्षमता वाढविण्यावर भर आहे. ऊसतोडणी यंत्रे खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऊसक्षेत्राची ठोस माहिती मिळविण्यासाठी ई-पीक पाहणीतील आकडेवारीची मदत घेतली जाणार आहे.

शेखर गायकवाड, साखर आयुक्त