थेरगावमधील गणेशनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने रविवारी रात्री गावठी पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. अंकित रॉय (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित आई-वडिलांसोबत गणेशनगरमध्ये राहतो. त्याचे वडील मारुंजीला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कामाला आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अंकितही त्यांच्यासोबत तेथेच देखरेखीचे काम करतो. शनिवारी अंकितचे आई-वडील कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यानंतर तो घरात एकटाच होता. रविवारी रात्री त्याने स्वतःजवळील गावठी पिस्तूलातून स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी अंकितचे काही मित्र त्याला मोबाईलवर फोन करत होते. मात्र, तो फोन उचलत नसल्याने मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली. घराची बेल वाजविल्यानंतरही कोणी दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी थेट वाकड पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्तूल जप्त केली आहे. अंकितकडे ही पिस्तूल कशी आली, त्याने आत्महत्या का केली, याचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide by young person in thergaon
First published on: 30-11-2015 at 12:24 IST