राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी पराभव मान्य करत भाजपाचं अभिनंदन केलंय. “आमच्याकडे संख्याबळ नसतानाही आम्ही ही संधी घेतली होती. कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. भारतीय जनता पार्टीला शुभेच्छा. शरद पवार म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती, परंतू त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते अखंड राहिली. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा जे अपक्ष आमच्यासोबत होते ते जागेवरच आहेत.”

“आम्ही राष्ट्रवादीला पाठिंब्याची अपेक्षा असणाऱ्या संजय शिंदे यांचे मत मिळाले नाही याबाबत बसून चर्चा करणार आहोत. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, मात्र ‘अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है’. आमचे नेते ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करते आहे. जास्त बोललात तर ईडीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. एकादा अपयश येत तेव्हा लोकांना असे वाटते की यांची स्ट्रॅटेजी चुकली,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “सोलापूरच्या भाजपा खासदारांना ओळखत नाही”, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर जयसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले…

सुप्रिया सुळे यांनी प्लास्टिकच्या प्रश्नावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “प्लास्टिकमुळे फार अडचणी होत आहेत. प्लास्टिक वापर कमी होऊ शकतो का, कचऱ्याचं काही करू शकतो का याचा देखील आम्ही विचार करत आहे.”