वृत्तपत्रे निवडणुकांच्या काळात पॅकेज मागतात, पेड न्यूज शिवाय बातम्याच देत नाहीत असा माझा अनुभव आहे. याला पत्रकारिता म्हणतात काय? हीच प्रसिद्धिमाध्यमे गेल्या २० वर्षांपासून पवार साहेबांवर खालच्या पातळीवरून टीका करीत आहेत, पण त्यांच्या विरोधात चिंधीही सापडलेली नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी जेजुरी येथील कार्यक्रमात केली.
जेजुरी येथील नाझरे धरणावर पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतील पाण्याच्या नियोजनाची बठक आज आयोजित करण्यात आली होती. या वेळी पुरंदर उपसा योजनेतून पाणी मागितल्यास अधिकारी पसे भरण्याची सक्ती करतात, पसे भरले तरी पाणी मिळत नाही असा आरोप लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केला. तर एका शेतकऱ्याने वृत्तपत्रांतील बातम्यांचा संदर्भ देत सुप्रियाताईंना पाण्याबाबत प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारल्यानवर श्रीमती सुळे संतापल्या. वृत्तपत्रांतील सर्व बातम्या खऱ्या नसतात, पत्रकारितेवर मी राजकारण कधीच करीत नाही.
एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या साध्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी प्रसारमाध्यमावर केलेली टीका ऐकून उपस्थित नेते मंडळी व शेतकरी अवाक झाले. नंतर मात्र स्थानिक नेते श्रीमती सुळे यांचे वक्तव्य एवढे गांभीर्याने घेऊ नका त्या सहज बोलल्या, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत होते. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता खासदार सुळे यांनी यावर पुणे येथे सिंचन भवन मध्ये बठक घेऊन मार्ग काढू असे सांगितले.
बठकीत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव, नीरा पाटबंधारे विभागाचे दिगंबर दुबल, शाखा अभियंता शहाजी सस्ते, माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते तसेच, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यानंतर खा. सुळे यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, आपण जे मीडियाविषयी बोललो, ते लोकसभा निवडणुकीत मला राज्य व राष्ट्रीय स्तरावर आलेल्या अनुभवावरून बोललो, असे सांगितले. ग्रामीण भागातील पत्रकारांविषयी माझे काही म्हणणे नाही, असे त्या म्हणाल्या.