पुण्यातील ऐतिहासिक पेशवेकालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन करण्यात येत असून याच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून या वाड्याच्या तळमजल्यावरील ११ खोल्यांमध्ये ‘स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालय’ उभारण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील घडामोडीचा इतिहास दृकश्राव्य माध्यमातून येथे उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.२३) या संग्रहालयाचे लोकार्पण होणार आहे.

पुणे शहराची लोकसंख्या काहीशे वर्षांपूर्वी काही हजारांमध्ये होती. तेव्हा पुण्याचा आत्तासारखा विस्तार नव्हता. पेशव्यांच्या काळात संपूर्ण पुण्याचा कारभार शनिवारवाड्यामागील नानावाडा येथून चालत असे. नानासाहेब पेशवे यांच्या दरबारातील अंत्यत विश्वासू मंत्री म्हणून नाना फडणवीस यांची एक वेगळीच ओळख होती. या नाना फडणवीसांचेच हे निवासस्थान होय, त्यांनीच सन १७४० ते १७५० या काळात हा तीन मजली भव्य वाडा बांधला होता.


१७४० ते आजअखेर अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष असणाऱ्या या वाड्याने बदलतं पुणंही पाहिलं आहे. प्रशासनाचे काही काळ या वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे या वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुणे महापालिकेने २०१०पासून वाड्याच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले. दरम्यान, नऊ वर्षांच्या काळात तीन मजल्याचे काम पूर्ण करण्यात आले असून या कामासाठी सुमारे पाच कोटींची खर्च आला आहे.

‘स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालया’त पर्यटकांना काय पाहता येणार?

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चाफेकर बंधू, देशातील इंग्रजांविरोधातील १८५७ चे पहिले बंड, आदिवासींचा उठाव या ऐतिहासिक गोष्टी दृकश्राव्य स्वरुपात पर्यटकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहेत.