पुणे शहरातील अनेक भागातील रूग्णालयात जाऊन देखील काल एका रुग्णाला बेड मिळत नव्हता. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रात्री शहरातील अलका चौकात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तातडीने बेड उपलब्ध करून देण्यात आला . पण आज त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.

पुणे शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. आजअखेर शहरातील करोनाबाधितांच्या संख्येने ४० हजारांचा नकोसा टप्पा ओलांडला आहे. यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. काल धायरी येथील 33 वर्षाचा तरुणास न्युमोनिया झाला होता. त्या तरुणाच्या उपचारासाठी शहरातील अनेक रूग्णालयात जाऊन देखील बेड उपलब्ध झाला नव्हता.  यामुळे संतप्त झालेल्या या तरुणाच्या नातेवाईकांनी अलका चौकात रुग्णवाहिका उभी करून, ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तात्काळ विश्रांतवाडी येथील रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.  मात्र आज दुपारच्या सुमारास उपचार सुरू असताना, त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेबाबत रुग्ण सेवक नयन पुजारी म्हणाले की, काल शहरात अनेक ठिकाणी जाऊन देखील बेड उपलब्ध झाले नाही. आंदोलन केल्यानंतर महापालिकेमार्फत बेड मिळाला. जर वेळेत बेड मिळाला असता, तर आमचा रुग्ण वाचला असता. या घटनेला महापालिका यंत्रणा जबाबदार असून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.