सध्या करोनामुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत असून ‘सारथी’ संस्थेलाही याचा फटका बसत आहे. केंद्राकडून अद्यापपर्यंत निधी आलेला नाही. त्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. केंद्राकडून निधी येताच तो तातडीने ‘सारथी’कडे वर्ग केला जाईल, ही संस्था आम्ही बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

वडेट्टीवार म्हणाले, “सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील अनेक तरुणांसाठी रोजगार उभा करण्याचे काम केले जात आहे. मात्र, मध्यंतरी या संस्थेच्या कामकाजावर अनेक संघटनांनी प्रश्न निर्माण केले. त्यावर तातडीने बैठक घेऊन सर्व त्रृटी दूर करण्यात आल्या आहेत. पण आता पुन्हा या संस्थेबाबत राजकारण होताना दिसत आहे. यावर योग्यवेळी उत्तर दिले जाईल.”

‘त्या’ महाराष्ट्रद्रोहीनी शासनावर टीका करण्याचा अधिका नाही

करोना विषाणूमुळे राज्यातील उद्योग व्यवसाय चालणे कठीण झाले आहे. यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली असताना केंद्राने राज्याला लवकरात लवकर मदत देणं अपेक्षित आहे. मात्र, असं होताना दिसत नाही. उलट सरकारवर काहीजण टीका करण्याचे काम करीत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याचे आवाहन करण्याऐवजी ज्या विरोधकांनी राज्यातील नेत्यांना, व्यवसायिकांना आणि नागरिकांना पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन केले, अशा महाराष्ट्रद्रोहींना राज्य शासनाच्या कारभारावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा कठोर शब्दांत वडेट्टीवार यांनी राज्यातील भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला.