झीरो इयरमुळे प्रवेश प्रक्रिया रखडलेली; ६६ विद्यार्थ्यांचा नव्याने प्रवेश

राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) सध्या नवीन प्रवेशांची धामधूम सुरू आहे. गतवर्षी संस्थेची प्रवेश परीक्षा झाली असली तरी ‘झीरो इयर’मुळे प्रवेश झाले नव्हते. तेच विद्यार्थी आता प्रवेश घेत असून चित्रपट विभागाच्या सहा अभ्यासक्रमांचे प्रवेश २०१३ नंतर प्रथमच होत आहेत.

बुधवारी ६६ विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश घेतले आहेत. चित्रपटाच्या सहा अभ्यासक्रमांचे प्रवेश २०१३ नंतर दोन वर्षे झाले नव्हते, तर मागील वर्ष ‘झीरो इयर’ ठरले होते. २०१४ मध्ये दूरचित्रवाणी विभागासह चित्रपट विभागातील केवळ पटकथा लेखन अभ्यासक्रमाचे प्रवेश झाले होते. चित्रपट विभागात एकूण सात अभ्यासक्रम शिकवले जात असून दिग्दर्शन, छायालेखन, ध्वनी, संकलन, कला दिग्दर्शन आणि अभिनय या अभ्यासक्रमांसाठी तीन वर्षांनी प्रवेश होत आहेत.  संस्थेत प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी एकाच वेळी उत्तीर्ण होऊन बाहेर पडत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे संस्थेतील अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. २००८ साली प्रवेश घेतलेले  विद्यार्थी २-३ महिन्यांपूर्वी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले होते.