परसबाग करताना काही लोकांना केवळ जमिनीची उपलब्धता असते तर काहींना केवळ गच्ची व बाल्कनीची; पण बंगल्यात बाग करताना दोन्हींची मुबलक उपलब्धता म्हणजे दुहेरी आव्हान. पण हे आव्हान अंजलीताई लेले यांनी लिलया पेलले आहे. ढोबळमानाने वनस्पती तीन प्रकारच्या वातावरणात स्वत:ला सामावून घेतात. १) मेसोफाईट- पाणी, जमीन व मध्यम प्रकाश, २) हायड्रोफाईट- पाणथळ जागा वा पाण्यात वाढणाऱ्या, ३) झेरोफाईट- उष्ण हवा, वाळवंटात वाढणाऱ्या, बंगल्याच्या चारी बाजूंना या प्रकारचे वातावरण, प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार असते. त्यामुळे त्या त्या जागी तशी झाडे निवडली व अधिकाधिक जैवविविधता जपली असे त्या सांगतात. वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्याने वनस्पतींच्या अंतर्बाह्य़ जगाचे ज्ञान ही त्यांची जमेची बाजू. वनस्पतींच्या गरजा जाणून त्यांची निगा राखणे ही खासियत नियोजन करताना वेगेवगळ्या हवामानातील वनस्पतींना आवडीच्या अधिवासानुसार जागा दिल्या आहेत. पूर्व-पश्चिमेस उन्हाची उपलब्धता भरपूर तेथे कायमस्वरुपी झाडे, ऊन आवडणारे गुलाब आहेत. उत्तर-दक्षिणेस अयनाप्रमाणे प्रकाश कमी-जास्त होतो अशा ठिकाणी त्या कुंडय़ा बदलत राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर्शनी भागातील कुंपणाच्या जाळीवर विलोभनीय रंगातील बोगनवेलीचा बहरलेला वेल. दारात सुगंधी अनंत, एका बाजूच्या कुंपणाच्या भिंतीवर अर्धगोलाकार कुंडय़ांमध्ये ऋतुमानानुसार फुलणारे पिटुनिया, पोर्टुलाक्का, फ्लॉक्स, व्हर्बिना, नेटेरियमसारखी रंगांची उधळण करणारी फुले, बंगल्यासमोर फरशांमध्ये हिरवळ लावून केलेली सुरेख रचना, त्यामागे मातीच्या, टेराकोटाच्या सुबक कुंडय़ांमध्ये अ‍ॅन्थुरीयम, पीस लिली, फर्नस आहेत. सर्व कुंडय़ा एकाच पातळीवर न ठेवता वेगवेगळ्या उंचीवर त्यांची रचना तसेच वेगवेगळ्या उंचीच्या व आकाराच्या कुंडय़ांमुळे झाडाचे सुरेख कोलाज तयार झाले आहे. प्लॉटवरील जुन्या भल्या मोठय़ा झाडाच्या सावलीत थोडे ऊन मिळेल अशा ठिकाणी केलॅडियम, कोलीयस साँग ऑफ इंडिया, पेंटास आहेत. ‘फुले छान दिसतातच पण त्याचे आयुष्य थोडे पण शोभिवंत पानांच्या वनस्पतीमुळे बाग नेहमी छान दिसते,’ असे अंजलीताई सांगतात. त्यांच्या प्लॉटची रचना उताराची आहे. याचा उपयोग करून पायऱ्यांवरही शोभिवंत पानाच्या कुंडय़ा ठेवल्या आहेत. भिंतीलगत ऊनसावलीच्या, सूर्यप्रकाश झिरपणाऱ्या जागेत विविध ठिकाणांहून आणलेल्या देखण्या, नखरेल ऑर्किडसची तजबीज केली आहे. तिथेच नागवेलीच्या पानाच्या वेलीने भिंतीच्या आधाराने चांगलेच बस्तान बसवले आहे. त्याने पूर्ण ‘ग्रीन वॉल’ केली आहे पण त्यामुळे सरपटाचा धोका वाटतो म्हणून त्याची छाटणी करायचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips for creating beautiful garden in bungalow
First published on: 11-10-2017 at 02:33 IST