देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने मागे घेतला आहे. केवळ कार्यक्रमादिवशी म्हणजे १४ जूनला सायंकाळी पाचपर्यंत मंदिरात भाविकांना बंदी असणार आहे, अशी माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. शनिवारी देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितलं होतं. परंतु, या निर्णयानंतर समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया आणि भाविकांची होणारी गैरसोय यामुळे हा निर्णय बदलण्यात आला असल्याची माहिती नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जूनला शिळा मंदिर आणि तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने देहू संस्थान ने मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, तो निर्णय आता बदलण्यात आला आहे. याविषयी देहू संस्थान चे अध्यक्ष नितीन महाराज मोरे म्हणाले की, मंदिर परिसर स्वच्छ करून घेण्यात येत आहे.

दोन तासांनी दर्शन थांबविण्यात येणार

राज्यभरातून तुकोबांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात त्यामुळं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येकी दोन तासांनी दर्शन थांबविण्यात येणार आहे. परंतु, त्या वेळेत आलेल्या भाविकांना स्क्रिनच्या माध्यमातून मुखदर्शन घेता येईल याची सोय केली आहे. दोन दिवस संस्थानला सहकार्य करून स्क्रिनवरून दर्शन घ्यावं, अशी विनंती त्यांनी केली. केंद्रीय यंत्रणा यांनी अस म्हटलं नाही, की मंदिर बंद ठेवा. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता तो मागे घेण्यात आला आहे. कार्यक्रमा दिवशी म्हणजे १४ जून रोजी मंदिर बंद राहणार असल्यामुळे कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.