पुणे : पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिके अंतर्गत शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रोचे काम कसबा पेठेपर्यंत पोहोचले आहे. अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागातील भूमिगत मेट्रोच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या बाजूने सुरू करण्यात आलेले हे काम कसबा पेठेपर्यंत पूर्ण झाले असून स्वारगेटपासून कसबा पेठेपर्यंतच्या (बुधवार पेठ स्थानक) बोगदा निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिके मधील शिवाजीनगर ते स्वारगेट हा सहा किलोमीटर लांबीचा (दोन्ही मार्गिका मिळून लांबी १२ किलोमीटर) भुयारी मार्ग आहे. अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागातून जाणारा हा मार्ग शिवाजीनगर बसस्थानक, जिल्हा सत्र न्यायालय, बुधवार पेठ, महात्मा फु ले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी एकू ण तीन टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरण्यात येत असून आत्तापर्यंत दोन्ही मार्गिका मिळून सात किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. दोन टीबीएम यंत्रांच्या साहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्गाच्या कामांना प्रारंभ करण्यात आला तर एक यंत्र स्वारगेट येथून मंडईच्या दिशेने काम करत आहे.

कृषी महाविद्यालयापासून २२ नोव्हेंबर २०१९ ला पहिल्या टनेल बोरिंग मशीन (मुठा) द्वारे कामाला सुरुवात झाली. मुठा नदी पात्राखालून बुधवार पेठेपर्यंत यंत्र पोहोचल्याने बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. मुठा नदीपात्राखालून गेलेला बोगदा सुमारे ३३ मीटर खोल आहे.

नदीपात्राच्या तळापासून साधारणत: १० मीटर खालून तो जात आहे. दरम्यान, मेट्रोची सेवा लवकर सुरू करण्यास महामेट्रो कटिबद्ध आहे. मेट्रोचे ६० टक्के  काम पूर्ण झाले आहे, असे महामेट्रोचे व्यस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

लवकरच प्रवासी सेवा

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो मार्गिकांची कामे प्रगतिपथावर आहेत. यातील पिंपरी-चिंचवड ते दापोडी या मार्गावर मेट्रोची चाचणी एका वर्षांपूर्वी घेण्यात आली. या मार्गाची ४ जुलै रोजी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीकडून पाहणी करण्यात आली. मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची प्रक्रिया महामेट्रोकडून सुरू झाली आहे. पुण्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत काही भागाची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली आहे. या मार्गिके चे काम जसजसे पूर्ण होईल त्याप्रमाणे वनाज ते गरवारे महाविद्यालय या टप्प्यात मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे.