लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात पुढील आठवडाभर अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज, शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी थंड वारे आज, शुक्रवारी उत्तर भारताच्या सीमावर्ती भागात सक्रिय होईल. बंगलाच्या उपसागरात वाऱ्याची एक चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण भारतातून तेलंगणापर्यंत वाऱ्याची खंडित स्थिती निर्माण झाली आहे. या हवामानविषय स्थितीमुळे राज्यात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आर्द्रतायुक्त वारे येत आहेत. त्यामुळे किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतेक भागांत पुढील आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पश्चिमी थंड वारे उत्तर भारतात सक्रिय झाल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढून पावसाचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे.

आणखी वाचा-अमोल कोल्हे यांची संपत्ती पाच वर्षांत झाली दुप्पट

मुंबईसह किनारपट्टीला गुरुवारी तापमानात काहीसा दिलासा मिळाला. किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३४ अंशांवर राहिले. मध्य महाराष्ट्रात सरासरी ३९ तर मराठवाडा आणि विदर्भात कमाल पारा सरासरी ४२ अंशांवर राहिला. विदर्भात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल तापमानात सरासरी दोन अंशांनी वाढ झाली आहे.

तापमानात वाढीचा कल मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात कायम राहून, आज, शुक्रवारी उष्णतेच्या लाटांसह मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.