तुम्ही जर खरे खवय्ये असाल तर इथे पाकातले गरम गुलाबजाम आवर्जून घ्या. ‘उत्तम’कडे जाऊन इतर कोणत्याही गोड किंवा तिखट पदार्थाबरोबर गुलाबजाम हवेतच. कोकोनट बर्फी, मोतीचूर, पंजाबी सामोसा, पंजाबी मठरी, अमृतसरी पतीसा.. हे इथले काही वैशिष्टय़पूर्ण आणि खवय्यांना फार फार प्रिय असलेले पदार्थ.

खरंतर ‘सत्तर वर्षांची परंपरा’ एवढे तीन शब्ददेखील ‘उत्तम स्वीट मार्ट’साठी पुरेसे आहेत. ज्यांना ‘उत्तम’ची चांगली माहिती आहे, त्यांना हे मनोमन पटेल. ज्यांना चवीनं खाण्याची आवड आहे त्यांच्यासाठी मात्र सविस्तर ओळख करून द्यावी, असंच हे एक मस्त ठिकाण आहे. तसं हे मिठाईचं दुकान असलं तरी इथे येऊन वेगवेगळय़ा पदार्थाचा आस्वाद घेणाऱ्या खवय्यांची संख्याही खूप मोठी आहे. गर्दी झाली, भले दुकानातल्या बाकावर बसायला जागा नसली, तरी वेगवेगळे पदार्थ अगदी उभं राहूनदेखील खाण्याची खवय्यांची तयारी असते आणि आतल्या भट्टीतून येणाऱ्या गरम गरम पदार्थासाठी थोडं थांबावं लागलं तर त्यालाही खवय्ये तयार असतात.

Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

‘उत्तम’ची चविष्ट परंपरा जशी अखंडित आहे, तितकाच या व्यवसायाचा इतिहासही माहीत करून घ्यावा असा आहे. सरदार मंडळी मिठाईच्या व्यवसायात कमी आहेत आणि पुण्यात तर ही संख्या अल्प म्हणावी इतकीच आहे. मान सिंग कोचर हे मूळचे रावळपिंडीचे. मिठाई आणि तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. ते वृत्तीने अत्यंत धार्मिक होते. संतसज्जनांच्या सहवासात ते रमत असत. त्यांचं रावळपिंडीमध्ये मिठाईचं दुकान होतं. पुण्यातील नातेवाइकांकडे ते १९४७च्या दरम्यान आले होते. पुढे रावळपिंडीला परत न जाता त्यांनी पुण्यातच हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि रावळपिंडीत ज्या प्रमाणे तेथील गुरुद्वारासमोर त्यांचं दुकान होतं, तसंच मिठाईचं दुकान त्यांनी पुण्यातील गणेश पेठेतील गुरुद्वारासमोर सुरू केलं. या गोष्टीला सत्तर र्वष झाली. मानसिंग यांना उत्तमजित सिंग, गुरदेव सिंग, मनमोहन सिंग आणि अमरजित सिंग हे चार पुत्र. चौघेही वेगवेगळय़ा व्यवसायांत यशस्वी झाले आहेत. मान सिंग यांनी सुरू केलेला मिठाई विभाग अमरजित सिंग हे पाहतात. अमन सिंग आणि सुखदेव सिंग ही त्यांची पुढची पिढीही याच व्यवसायात भक्कमपणे उभी आहे आणि त्यांच्या प्रयत्नांतून, कल्पनांमधून ‘उत्तम स्वीट मार्ट’ला नवा लूकही मिळाला आहे.

‘उत्तम’मध्ये मिळणाऱ्या पदार्थाची खासियत ही आहे, की चवीत किंवा पदार्थाच्या दर्जात किंचितही फरक झालेला तुम्हाला जाणवणार नाही. काही पदार्थासाठी तर हे दुकान फार प्रसिद्ध आहे. कोकोनट बर्फी हा त्यातला एक प्रकार. गुलाबी बर्फी, नारळ बर्फी, उत्तम बर्फी अशा कितीतरी नावांनी ही बर्फी ओळखली जाते. या बर्फीसाठी लागणारा खोबऱ्याचा किस खास केरळहून मागवला जातो आणि वर्षांनुर्वष ही प्रथा सुरू आहे. पंजाबी सामोसा हाही इथला एक चविष्ट प्रकार. पंजाबी मसाल्यांच्या मिश्रणातून हा सामोसा तयार होतो. शिवाय, तो तेलकट होऊ नये यासाठी आता खास यंत्राचा वापर केला जातो. सामोसा जसा प्रसिद्ध आहे तेवढाच आणखी एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे पंजाबी मठरी. त्याला आपण खारी पुरी असं म्हणू शकतो. पण ही खारी पुरी नाही. फिकी, गोड, खारी, प्लेन, अमृतसरी असे चवींचे अनेकविध प्रकार त्यात आहेत. पेठा बर्फी, पिस्ता बर्फी, बटरस्कॉच बर्फी, खवा बर्फी, शुद्ध तुपातील अमृतसरी पतीसा, जिलेबी, इमृती, म्हैसूरपाक, बालुशाही, पेढे या गोड पदार्थानी आणि अनेक तिखट पदार्थानी त्यांची वैशिष्टय़ं जपलेली दिसतात. इथले मोतीचूर लाडू हाही एक लोकप्रिय प्रकार. हा व्यवसाय सरदार मंडळी करत असली तरी मराठी खवय्यांचंही हे आवडीचं ठिकाण आहे. त्यामुळे पुण्यातले अनेक जण अगदी लांबून लांबूनही काही विशिष्ट पदार्थ घेण्यासाठी इथंच आवर्जून येतात. मराठी मंडळींचं या दुकानावर प्रेम आहे. ‘उत्तम’कडे जायचं आणि तिथले गरम गुलाबजाम घ्यायचे नाहीत, असं कधी होऊ देऊ नका. या गुलाबजामची खासियत म्हणजे इथे गुलाबजामसाठी लागणारा खवा खास पद्धतीनं तयार करून घेतला जातो. मुख्य म्हणजे केव्हाही गेलात तरी इथं ताजे गुलाबजाम मिळतात आणि तेही गरम. तुम्ही इथं कधी काही खाद्यपदार्थ घ्यायला गेलात, तर द्रोणात दोन गुलाबजाम घ्याच आणि शक्यतो ते चमच्यानं खाण्याच्या फंदात पडू नका. पाकात निथळणारा गरम गुलाबजाम तुमच्या मुखात पडला की तुम्हाला समजेल अस्सल गुलाबजाम म्हणजे काय ते!

कुठे आहे

  • ९४५ रविवार पेठ
  • केव्हा : सकाळी सात ते रात्री दहा