पुण्यात बुधवारी पोलिसांनी वाहनांची चोरी करणाऱ्या एका टोळक्याला ताब्यात घेतले. या टोळक्याकडून १२ दुचाकी, ३ स्कॉर्पिओ अशा सर्व मिळून १५ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या या गाड्यांची एकुण किंमत ४० लाख इतकी आहे. पुणे पोलिसांच्या युनिट-३ ने केलेल्या या कारवाईत अशोक रामनाथ हिंगे (२२), सुमित गणेश असवले (२१) आणि महेश नारायण राऊत या तीन आरोपींना अटक करण्यात आली. या तिघांनी पुण्यातील वारजे माळवडी, सिंहगड रोड, चंदननगर तसेच लोणीकंद , सातारा , शिरूर कासार या भागांमधून बुलेट, होंडा शाईन, बजाज पल्सर, होंडा प्लेजर या दुचाकी चोरल्या होत्या. हे टोळके दुचाकी चोरताना गाडीवर बसून एक पाय हँडलला लावून दोन्ही हातांनी जोर लावून हिसका मारून गाडीचे हँडल तोडत असत. त्यानंतर स्वीच वायर कनेक्शनच्या वायर्स जोडून गाडी थोड्या अंतरावर पुढे नेऊन चालू करत. त्यानंतर आरोपी महेश राऊत जुने आर.सी.बुक घेऊन त्याची झेरॉक्स करून त्यावर चोरून आणलेल्या गाडीची माहिती टाकून बनावट आर.सी. बुक तयार करत असे आणि दुचाकींची विक्री करत असे. याशिवाय, स्कॉर्पिओ गाडी ही स्क्रु ड्रायव्हरच्या सहाय्याने पाठीमागील दरवाजाचे हँडल उघडून आत प्रवेश करून स्टेअरिंग लॉक तोडून गाडी चोरून नेत असत. चोरी केल्यानंतर स्कॉर्पिओच्या इंजिन नंबर व चेसीस नंबरवरून मालकाचा शोध होऊ नये म्हणून हे दोन्ही नंबर काढून टाकले जात. तसेच मूळ इंजिन नंबरवर डुप्लीकेट इंजिन नंबर पंच करून टाकत असल्याचे तपासात उघड झाले. या गाड्यांची विक्री करण्यासाठी भंगारात काढलेल्या चारचाकी गाड्यांचे इंजिन नंबर व चेसीस नंबर घेऊन ते चोरी केलेल्या गाडीवर टाकला जात असे.
पुण्यात वाहने चोरणाऱ्या टोळक्याला अटक; १५ गाड्या हस्तगत
दोन्ही हातांनी जोर लावून हिसका मारून गाडीचे हँडल तोडत असत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-01-2017 at 21:09 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle robbery gang arrested by pune police