घरांवर दगडफेक करणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा
हडपसर येथील ससाणेनगर परिसरात टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी बांबूने वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम अलकुंटे, यश जांभळे, प्रितेश अल्लेहोळकर, प्रफुल्ल गोरे, शुभम गावडे, टिनू आणि अतुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन लोखंडे (वय १९, रा. ससाणेनगर, हडपसर) याने या संदर्भात फिर्याद दिली आहे. चेतन आणि त्याचा मित्र अक्षय कांबळे हे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घराजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अलकुंटे आणि त्याचे साथीदार तेथे आले. तुमच्या गल्लीतील मुले दादा झाली आहेत का? अशी विचारणा लोखंडे याच्याकडे केली. आरोपींच्या हातात बांबू आणि शस्त्रे होती. आरोपींनी शिवीगाळ करून नागरिकांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली तसेच तीन दुचाकी आणि जीपची काच फोडली. लोखंडे आणि त्याचा मित्र कांबळे याला जिवे मारण्याची धमकी देऊन अलकुंटे आणि त्याचे साथीदार पसार झाले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशी भयभीत झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे तपास करत आहेत.