पावलस मुगुटमल

पुणे, मुंबई, ठाणे : मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांतील विक्रमी उष्म्यामुळे राज्यभरातील धरणांमधून २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा कमी झाल्याने सध्या केवळ ४४ टक्के साठाच शिल्लक आहे. मुंबईतील धरणांत २७ टक्के तर ठाणे जिल्ह्यासाठी धरणांत ४५ टक्के जलसाठा उरला आहे. या साठय़ात वाढत्या तापमानामुळे वेगाने होत असलेली घट पाहता येत्या काही दिवसांत पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा अनेक शहरांसह नवी मुंबईतील काही भागांमध्ये वितरण दोषांमुळे सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. ती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पाणी समाधानकारक आहे. त्यामुळे यंदा पाणी कपात लागू करण्यात आलेली नाही. पाण्याची गळती आणि चोरी याबरोबरच वाढते तापमान यांमुळे पाणीसाठय़ात वेगाने घट होण्याची शक्यता आहे. मुंबईत तलावांतील उपलब्ध साठा लक्षात घेता पावसाळय़ापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येईल, असा आशावाद पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांना असला, तरी येत्या काही दिवसांतील तापमान मुंबईकरांच्या जलसाठय़ावर परिणाम करू शकते.

मार्च आणि एप्रिल हे दोन महिने राज्यात विक्रमी काहिली होती. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तीन ते चार वेळा उष्णतेच्या लाटा आल्या. सर्वच भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान सातत्याने सरासरीच्या तुलनेत अधिक राहिले. विदर्भात तर १२२ वर्षांतील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शेतीसाठीही पाण्याची मागणी वाढली. तीव्र झळांमुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले. त्याचा परिणाम म्हणून दोन महिन्यांत राज्यातील धरणांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी कमी झाल्याचे दिसून येते. 

पंधरा दिवसांत..

२ मार्चला राज्यातील धरणांमध्ये ७१ टक्के पाणीसाठा होता. चिंतेची बाब म्हणजे सर्वच विभागांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. १५ दिवसांपूर्वीपर्यंत राज्यात सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या पुणे विभागात सध्या इतर विभागांच्या तुलनेत सर्वात कमी पाणी शिल्लक आहे. तापमानवाढीमुळे अशीच परिस्थिती मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही होऊ शकते.

चंद्रपूरमध्ये उच्चांकी तापमान

सोमवारी विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भात अद्यापही सर्वत्र पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे आणि सरासरीपेक्षा अधिक असला, तरी मागील आठवडय़ाच्या तुलनेत त्यात किंचित घट झाली आहे. मराठवाडय़ात परभणी, नांदेडमध्ये ४३ अंशांपुढे तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात नगर येथे ४३.९, तर सोलापूर येथे ४२ अंश तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत मात्र कमाल तापमान घटले असून, ते सरासरीच्या जवळ आले आहे. कोकण विभागातील अलिबाग येथे सरासरीपेक्षा ४ अंशांनी अधिक ३६ अंश कमाल तापमान नोंदविले गेले. मुंबई परिसरासह कोकण विभागात इतर ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळ आहे.

ठाण्याची स्थिती..

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या ४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच उल्हास नदीची पाणी पातळीही समाधानकारक आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील दोषामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरे पाणीटंचाईचा सामना करत आहे.

मुंबईचा जलसाठा..

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलशी या सात तलावांमध्ये चार लाख ६४६ दशलक्ष लिटर इतका जलसाठा शिल्लक राहिला असून तलावांमधील वापरायोग्य पाणी सरासरी २७.६८ टक्के आहे. मागील वर्षी ते २३.६२ टक्के इतके होते.

मोठय़ा धरणांना फटका

राज्याच्या विभागांमधील मोठय़ा धरणांतील पाणीसाठय़ात गेल्या दोन महिन्यांत झपाटय़ाने घट झाली आहे. पुणे विभागातील कोयना धरणात २ मार्चला ७१ टक्के पाणी होते. ते सध्या ३२ टक्क्यांपर्यंत घटले आहे. सोलापूर विभागातील उजनी धरणात २ मार्चला ८८ टक्के पाणी होते. दोन महिन्यांत त्यात तब्बल ६३ टक्क्यांनी घट झाली असून, सध्या २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. औरंगाबाद विभागातील जायकवाडी प्रकल्पात २ एप्रिलला ७७ टक्के पाणी होते. ते सध्या ५१ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

कोणत्या विभागात किती पाणी?

पाण्याची चिंता पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे असलेल्या पुणे विभागात अधिक.

पंधरा दिवसांपूर्वी पुणे विभागात ५७ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. तो ३८ टक्क्यांपर्यंत घसरला.

नागपूर विभागात ४० टक्के, तर नाशिक विभागात ४३ टक्केच पाणीसाठा शिल्लक.

नागपूर, नाशिकसह, अमरावती, कोकण आणि औरंगाबाद या विभागांतही गतवर्षीपेक्षा धरणांतील पाणीसाठा कमी.

बाष्पीभवनात वाढ..

तीव्र झळांमुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने गेल्या दोन महिन्यांत धरणांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी कमी झाले. मार्च आणि एप्रिल महिन्यांत पूर्वमोसमी पाऊस काही प्रमाणात हजेरी लावतो. मात्र, यंदा त्याचे प्रमाणही कमी राहिल्याने पावसाच्या हंगामात जमा झालेल्या पाण्यावरच राज्याची भिस्त आहे.

आजपासून काहिली कमी?

पुणे : राजस्थान, विदर्भ आणि दिल्लीशेजारच्या भागांतील उष्म्याची लाट आज, मंगळवारपासून ओसरण्याचा अंदाज भारत हवामान शास्त्र विभागाने सोमवारी वर्तवला. वायव्य भारतातील कमाल तापमान तीन ते चार अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे. शुक्रवापर्यंत हवामानातील हा बदल कायम राहील. पश्चिम राजस्थानातील अनेक भाग आणि विदर्भात गेल्या आठवडय़ात कमाल तापमान ४५ अंशांहून अधिक नोंदवले गेले होते.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

  • पुणे : राज्यातील तापमान किंचित घटले असले, तरी दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ४ आणि ५ मे रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगरमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती तयार होणार आहे. मात्र, ३ आणि ४ मे रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाद या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
  • दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
  • ४ आणि ५ मे रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगरमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती तयार होणार आहे.
  • मात्र, ३ आणि ४ मे रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाद या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.