बाळासाहेब जवळकर

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी पालिका शाळांच्या तपासणीसाठी पाहणी दौरा केला. त्यानंतर, स्मशानभूमींची दुरवस्था पाहण्यासाठी दौरा केला. आता ते पालिकेच्या मिळकतींची व  प्रकल्पांची पाहणी करत असून लवकरच त्यांचे पालिका रुग्णालयांच्या दौऱ्यांचे नियोजन आहे. महापौर पाहणी दौरे का करतात, त्यांना दुसरे काम नाही का, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा दौऱ्यांमधून अपेक्षित प्रसिध्दी मिळतेच. मात्र, दुसरे काही गणित दौऱ्यांमागे आहे का, याविषयी तर्कवितर्क सुरू आहे.

महापौर राहुल जाधव यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पाहणी दौऱ्यांचा जणू सपाटाच लावला आहे. महापौरपदाची सूत्रे घेतल्यानंतर महापौरांनी सलग दौरे सुरू केले आहेत. सर्वप्रथम पालिका शाळांचा त्यांनी पाहणी दौरा केला. त्यात पालिका शाळांच्या समस्या, शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. यासंदर्भात, अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी मुख्याध्यापकांची संयुक्त बैठकही घेतली. त्यानंतर, महापौरांनी आपला मोर्चा स्मशानभूमींकडे वळवला. शहरभरातील सर्व स्मशानभूमींची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर, स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्मशानभूमींच्या विविध कामांसाठी त्यांनी ४० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्याची सूचनाही केली. पुढे, महापौरांनी पालिकेच्या मालकीच्या इमारती तसेच विविध प्रकल्पांच्या सद्य:स्थितींची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी गैरव्यवस्थापनावरून प्रशासनाला खडे बोल सुनावले. मध्यंतरी, यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील नियोजनशून्य व्यवस्थेवरून त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. आता दवाखाने आणि रुग्णालयांची पाहणी करण्याचे त्यांचे नियोजन सुरू आहे.

महापौर हे पाहणी दौरे कशासाठी करतात, त्यामागे त्यांचा हेतू काय आहे, दौऱ्यांचे फलित काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, त्याचे उत्तर कोणाला मिळत नाही. महापौर भल्या सकाळी दौऱ्याला सुरुवात करतात. त्यांच्यासमवेत प्रभागातील नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी असतात. वाहनांचा ताफाच निघत असल्याने दौऱ्यांच्या निमित्ताने सगळे काही ढवळून निघते.  कधी नव्हे ते अधिकारी-कर्मचारी कामाला लागतात. झाडलोट होते, डागडुजी केली जाते. इतरवेळी जे प्रश्न चर्चेत येत नाहीत, त्यावर चर्चा होते. एखादा प्रश्न चुटकीसरशी सुटूनही जातो. अशा दौऱ्यांमधून प्रसिद्धी मिळते म्हणून महापौर दौऱ्यांची आखणी करतात, असे भाजप वर्तुळातूनच सांगण्यात येते. पाहणी दौरे झाल्यानंतर महापौर अधिकाऱ्यांची बैठक घेतात आणि विविध सूचना करतात. मात्र, त्याचे पुढे काय होते, याचा आढावा महापौरांनी घ्यायला हवा. कारण, पुढचे पाठ, मागचे सपाट, ही पिंपरी पालिकतेची जुनी कार्यपद्धती आहे. महापौर एकामागोमाग एक दौरे करत सुटले आहेत आणि प्रशासनाला त्याचे काही सोयरसुतक नाही, असे होता कामा नये. किमान, नागरिकांशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने तरी पाठपुरावा व्हायला हवा.

लोकनियुक्त अध्यक्ष मिळूनही कारभार तसाच

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची नियुक्ती झाली. जवळपास १४ वर्षे पिंपरी प्राधिकरणाचा कारभार प्रशासकीय पातळीवरून लोकनियुक्त अध्यक्षांकडे आला. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाविषयी नागरिकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. त्यानुसार, प्राधिकरणाचा २०१९-२० या आर्थिक वर्षांचा ६७९ कोटींचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर करण्यात आला. मात्र, सामान्यांवर छाप पडेल असे काहीही अर्थसंकल्पात दिसून आले नाही. अर्थसंकल्पात प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राधिकरणातील पेठ क्रमांक ६, १२, ३० आणि ३२ या ठिकाणी जवळपास पाच हजार घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही घोषणा जुनीच आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागेत हेलीपॅड, औंध-रावेत रस्त्यावर दोन समांतर उड्डाणपूल, औद्योगिक संग्रहालय, विरंगुळा केंद्र, खुली व्यायामशाळा, संविधान भवन, विपश्यना केंद्र, महिलांसाठी वसतिगृह अशा अनेक घोषणा प्राधिकरणाने केल्या आहेत. शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याची घोषणा नव्याने करण्यात आली. मात्र, वर्षांनुवर्षे हा प्रश्न कायम आहे. शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. लोकनियुक्त अध्यक्ष मिळाल्यानंतही प्राधिकरणाचा कारभार तसाच राहणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.