लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले. बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला वाचविण्यासाठी रक्ताचे नमुने देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्तचाचणी नमुना अहवालात ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. तावरे, हाळनोर यांच्यासह शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. न्यायालयाने तिघांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

आणखी वाचा-भोसरीत बनावट पाच बांगलादेशी अटकेत; बनावट आधार कार्ड, पारपत्र जप्त

अगरवाल याच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ससूनमधील शिपायाकडून अडीच लाखांची रोकड जप्त

ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळेच्या घराची झडती गुन्हे शाखेच्या पथकाने घेतली. या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणारा अतुल घटकांबळे याच्या घराची गुन्हे शाखेने झडती घेतली. घटकांबळेने शेजाऱ्यांच्या घरात अडीच लाख रुपये ठेवले होते. पोलिसांनी ती रोकड जप्त केली.