हरवलेला तपास : कोटय़वधींना गंडा घालणाऱ्या महिलेचा शोध कायम 

 वारजे भागातील रहिवासी निर्मला भुसारे (वय ४८) यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घालण्यात आल्याच्या घटना सामान्यांच्या वाचनात नेहमीच येत असतात. सामान्यांना गंडवून गडगंज माया कमावणे, हा एकमेव उद्देश त्यामागे असतो. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या ठकांना परिणामांची जाणीव असते. एक दिवस आपण पोलिसांच्या हाती लागणार याची माहिती देखील त्यांना असते. पण झटपट पैसे कमविण्यासाठी सामान्यांना गंडा घालण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात आणि गुंतवणूकदारही त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. काही घोटाळे अतिशय मोठे असतात. त्याची व्याप्ती संपूर्ण राज्य किंवा देशभरात असते. अशी प्रकरणे उजेडात आली की तो गुंतवणूकदारांच्या दृष्टीने धडा असतो. तरी देखील गुंतवणूकदार जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडतात. स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या घटना घडत असतात. पण या घटनांची दखल व्यापक प्रमाणावर घेतली जात नाही. वारजे भागात आठ महिन्यांपूर्वी गुंतवणुकीच्या आमिषाने ७५ नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास आठ कोटी रुपये घेऊन पसार झालेल्या महिलेचा आर्थिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे. अद्याप तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.

वारजे भागातील रहिवासी निर्मला भुसारे (वय ४८) यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. भुसारे यांनी पुढाकार घेऊन गुंतवणूकदारांना एकत्र आणले आहे. गुंतवणूकदारांकडून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी अनिता सिंग (वय ४६) ही गेली आठ महिने पसार असून पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी सिंग मूळची डेहराडूनची. तिचे सासरे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कामाला होते. सिंग कुटुंबीयांनी वारजे भागातील लक्ष्मीनगर भागात वीस वर्षांपूर्वी जागा घेतली. तिथे त्यांनी छोटेखानी घर बांधले. कालांतराने अनिताची परिसरातील नागरिकांशी ओळख झाली. तिने स्वत:च्या घरात छोटे दुकान सुरू केले. अनिताने या भागातील महिलांशी ओळख वाढविली. वारजे भागात तिचा परिचय वाढला. त्यानंतर गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तिने भिशी सुरू केली. या भागातील महिलांनी तिच्याकडे दरमहा पैसे भरण्यास सुरुवात केली. भिशी चालविल्यानंतर तिने नागरिकांकडून गुंतवणुकीच्या आमिषाने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. ‘दरमहा हजार रुपये भरा, बारा महिन्यानंतर पंधरा हजार रुपये मिळतील,’ असे आमिष तिने दाखविण्यास सुरुवात केली. जादा परताव्याच्या आमिषाने नागरिकांनी तिच्याकडे पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. तक्रारदार निर्मला भुसारे यांनी देखील पैसे गुंतवले. त्यांनी मोठी रक्कम तिच्याकडे गुंतवली. सुरुवातीच्या काळात तिने गुंतवणूदारांना परतावा दिला. मात्र, परतावा देताना तिने आणखी वर्षभर पैसे ठेवा आणखी पैसे मिळतील, असे आमिष दाखविले. त्यामुळे तिच्या भूलथापांवर गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवला.

वारजे भागातील अनेक महिलांनी तिच्याकडे पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. दरम्यान, वर्षभरापूर्वी भुसारे यांना पैशांची गरज होती. त्यांनी अनिताकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा तिने टाळाटाळ सुरू केली. प्रत्येक वेळी बहाणा करून अनिता वेळ मारून न्यायची. भुसारे यांना व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. अखेर अनिताचा खोटेपणा उघड झाला. दरम्यान, अनिताने तिची मालमत्ता तारण ठेवून पैसे परत करते, असे भुसारे यांना सांगितले. एप्रिल महिन्यात अनिता, तिचे पती आणि मुलगा वारजे भागातील घराला कुलूप लावून पसार झाले. तेव्हा या भागातील गुंतवणूकदारांचे डोळे उघडले आणि अनिता पसार झाल्याचे समजताच अनेक जण हवालदिल झाले. भुसारे यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एच. पी. कुंभार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अनिता सिंगने वारजे भागातील ७५ नागरिकांना गंडा घातल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. तिने जवळपास आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तिने सुरू केलेली भिशी आणि गुंतवूणक योजनेला शासनाने परवानगी दिली नव्हती. बेकायदा भिशीत अनेक जणांनी पैसे गुंतविले आहेत.

गेले आठ महिने पसार असलेल्या अनिताचा आर्थिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे. पोलिसांकडून तिच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. अनिता आणि तिचे कुटुंबीय परराज्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक परराज्यात जाऊन आले आहेत. तिला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एच. पी. कुंभार यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman cheating investment lure pune crime

ताज्या बातम्या