चार वर्षांपूर्वी शहरात खळबळ उडवून देणाऱ्या वानवडी येथील एका सोसायटीमध्ये प्रियकराच्या नियोजित पत्नीला जाळणाऱ्या अनुश्री कुंद्रा या उच्चशिक्षित तरुणीला विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत तिने तिच्या प्रियकरालाही जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता.
जुही अभयनंदन प्रसाद (वय २६, रा. नवी दिल्ली, मूळ रा. पाटणा, बिहार) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर, तिचा प्रियकर निमेश रमेशनंदन सिन्हा (वय ३०, रा. वानवडी, मूळ रा. पाटणा, बिहार) हादेखील या घटनेत होरपळला होता. विशेष न्यायाधीश येनकर यांनी अनुश्री सतीशकुमार कुंद्रा (वय ४३, रा. नवी दिल्ली) हिला खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. १३ फेब्रुवारी २०११ रोजी ही घटना घडली होती.
अनुश्री ही घटस्फोटित आहे. संतोष चितलूर याच्यासोबत तिने विवाह केला होता. मात्र, हा विवाह फार काळ टिकला नाही. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. २००९ मध्ये निमेश सिन्हा हा गुरगावमधून एका कंपनीत काम करीत होता. तेव्हा, त्याची अनुश्री हिच्याशी ओळख झाली. तेव्हा तिने निमेश याच्याकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. गुरगाव येथे हे दोघेजण एकत्र राहात होते. निमेशच्या घरच्यांनी त्यांच्या विवाहाला विरोध केला होता. निमेश आणि अनुश्री वानवडी येथे राहायला आले.
दरम्यान, त्याची बालपणाची मैत्रीण जुही ही पुन्हा त्याच्या संपर्कात आली. तिचे वडील वकील आहेत. जुही निमेशच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडू लागले. १३ फेब्रुवारी रोजी जुही पुण्यात आली होती. जुही, निमेश आणि अनुश्री यांच्यात विवाहावरून चर्चादेखील झाली. जुही आणि निमेश हे झोपेत असताना अनुश्रीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. तेथून अनुश्री पसार झाली. तिला तेथून जाताना रखवालदाराने पाहिले होते. गंभीर भाजलेल्या जुहीचा २१ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण वालतुरे यांच्या पथकाने अनुश्रीला अटक केली होती. या खटल्यात जामीन मिळविण्यासाठी अनुश्रीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने हा खटला लवकर निकाली काढावा, अशी सूचना दिली होती.