[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलकर्णी काकूंचा हलव्याच्या दागिन्यांचा अनेक वर्षांपासूनचा बिझनेस होता. संक्रांत जवळ आली, की…संक्रांत कशाला, खरंतर दिवाळीपासूनच त्यांच्या तयारीला सुरुवात व्हायची. अर्थात, हा बिझनेस त्यांनी प्रचंड मेहनतीनं आणि फक्त माउथ पब्लिसिटीवर वाढवला होता. एरव्ही `कुलकर्णी काकू म्हणजे बीबीसी आहेत. बोलायला लागल्या, की तास दीडतास तरी सुटका होत नसते,` अशी त्यांची अख्ख्या सोसायटीभर माउथ पब्लिसिटी झाली होती. पण ह्याच तोंडाचा आता त्यांच्या बिझनेसला फायदा होत होता. कुलकर्णी काकूंना गेल्या संक्रांतीला तब्बल तीन आणि या संक्रांतीला चक्क चार ऑर्डर्स त्यांना मिळाल्या होत्या. कर्तृत्वाचे नवे पंख लाभल्यामुळे त्या जवळपास हवेतच उडत होत्या. तसे आधीच्या गिऱ्हाइकांनी दिलेल्या ऑर्डर्सच्या बाबतीत काही घोळ झाले होते, पण त्यामागचं कारण फक्त गैरसमज आणि मिसकम्युनिकेशन, एवढंच होतं. काकूंच्या कामात काही खोट नव्हतीच. त्यांचा बिझनेस वाढत असला, तरी आधीची गिऱ्हाइकं मात्र टिकत नव्हती. यंदा त्यांना एक नवं गिऱ्हाईक मिळालं होतं, सोसायटीत नव्यानं राहायला आलेल्या पवार काकू. कुलकर्णी काकूंच्या कामाचं कौतुक त्यांच्याच तोंडून ऐकल्यानंतर पवार काकूंनी त्यांना हलव्याच्या पदार्थांची एक आर्डर दिली होती. भले ती छोटी होती, पण महत्त्वाची होती. ठरलेल्या वेळेत कुलकर्णी काकूंनी पवार काकूंची ऑर्डर पूर्ण केली. व्यवस्थित पॅकिंग करून त्यांचे हलव्याचे पदार्थ त्यांना नेऊन पोहोचवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पवार काकू दत्त म्हणून दारात उभ्या असलेल्या पाहून कुलकर्णी काकूंना अतिशय आनंद झाला. त्या आपल्या पदार्थांचं कौतुक करण्यासाठी आणि पुढची ऑर्डर देण्यासाठी आल्या असणार, असा कुलकर्णी काकूंचा विश्वास होता. पवार काकूंना साखरेच्या हलव्याचे दागिने नव्हेत, तर `हलवा` नावाच्या माशाचे पदार्थ हवे आहेत, हे ऐकल्यावर मात्र कुलकर्णी काकू हळव्या झाल्या आणि जरा हलल्या. तरीही त्या खचल्या नाहीत. कारण हा सगळा घोळ केवळ गैरसमज आणि मिसकम्युनिकेशनमुळे झाला होता. तो विषय तिथेच सोडून कुलकर्णी काकू पुढच्या वर्षीच्या ऑर्डर्सच्या तयारीला लागल्या!

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make halwa fish green masala maharashtrian recipes
First published on: 28-12-2016 at 01:15 IST