[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही पदार्थ आपल्या विशेष जिव्हाळ्याचे असतात. लहानपणापासून आपली त्यांच्याशी ओळख असते, सलगी असते. सतत कानावर हा पदार्थ पडलेला असतो. त्याविषयी आपल्याला नाही, तरी आपल्या जवळच्या वडीलाधाऱ्यांना विशेष आस्था असते. अशाच पदार्थांपैकी एक, म्हणजे रगडा पॅटीस. माणसाची जशी माकडापासून उत्क्रांती झाली म्हणतात, तशी या पदार्थाची एका पदार्थापासून उत्क्रांती झाली आहे, तो म्हणजे धम्मक लाडू किंवा चापट पोळी. काळ बदलला, तसे हे पदार्थही जुने वाटायला लागले. त्यांनी आधुनिक रूपडं धारण करणं अनिवार्य होतं. फोडणीची पोळी, फोडणीचा भात, कांदा पोहे, दही-दूध पोह्यांवरून आपण एसपीडीपी, कट डोसा, कच्छी दाबेली, पाणीपुरीकडे वळू लागलो, तसंच धम्मक लाडूवरून रगडा पॅटीसचा टप्पा गाठणं ही काळाची गरज होती. हे सगळं वर्णन कशाबद्दल चाललंय, हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेलच. तर, `पाठीत रगडा पॅटीस देऊ का,` हे वाक्य उच्चारणं हा प्रत्येक मोठ्या भावंडाचा, पालकांचा हक्क आहे आणि ते ऐकायला लागणं हे प्रत्येक धाकट्या अपत्याच्या वाट्याला आलेले भोग आहेत. ते भोगल्याशिवाय मोठेपणी प्रत्यक्ष रगडा पॅटीसच्या गरमागरम डिशपर्यंत पोहोचता येत नाही, असं म्हटलं जातं. बरं, पाठीतलं रगडा पॅटीस जसं कधीही, कुठल्याही कारणासाठी मिळू शकतं, तसंच खायचं रगडा पॅटीसही कधीही, कुठल्याही कारणाशिवाय ग्रहण करावं, त्यात खरी मजा आहे. दमूनभागून घरी आलेलो असताना, `आज मला घरात प्रचंड काम आहे,` हे तासाभरापूर्वीच फोनवर ऐकायला लागलेलं असताना, अचानक बायकोनं समोर रगडा पॅटीसची वाफाळती डिश समोर आणून ठेवण्यासारखं दुसरं सुख नाही! धोक्याचा इशाराः दिवसाउजेडी स्वप्न पाहणाऱ्या विवाहितांनी ती स्वतःच्या जबाबदारीवर पाहावीत. अचानक स्वप्नभंग झाल्यास किंवा त्यांचा काही उलटा परिणाम झाल्यास, त्याला या सदराचे लेखक जबाबदार राहणार नाहीत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make ragda patties
First published on: 20-10-2016 at 01:15 IST