आज कोणत्याही क्षेत्रात पाहायला गेलं तर घोटाळा हा होतच आहे. मग शैक्षणिक क्षेत्र असो किंवा औद्योगिक. प्रत्येक क्षेत्रामध्ये लहान- मोठा घोटाळा पाहायला मिळतो. साहजिकच या घोटाळ्यांचा थेट परिणाम हा सामान्य माणसाच्या खिशावर होत असतो. त्यामुळेच या मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी दिग्दर्शक श्री नारायण सिंह यांनी ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या माध्यमातून देशात होणाऱ्या वीजचोरीच्या मुद्द्यावर प्रथमच आवाज उठविला गेला. हा चित्रपट आज (२१सप्टेंबर) देशभरामध्ये प्रदर्शित झाला.

श्री नारायण सिंह यांनी या चित्रपटाला न्याय देण्यासाठी योग्य कलाकारांची निवड केली असून बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलेला मुद्दा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी कलाकारांप्रमाणेच पडद्यामागील व्यक्तींनीही तितकीच मेहनत घेतल्याचं दिसून आलं.

उत्तराखंडमधील टिहरी या छोट्याशा गावामध्ये राहणारा सुशील कुमार पंत (शाहीद कपूर)याच्या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरत असून या गावामध्ये होत असलेल्या वीजचोरीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला. वीज पुरवठा अनिश्चित असतानादेखील येथील लोकांना प्रचंड बील भरावे लागतं आहे. याच गावात राहणाऱ्या सुशील कुमारच्या मित्राचा एक कारखाना असतो. मात्र वीज अनियमित असल्यामुळे त्याचा व्यवसायही थंड पडत असतो. यातच त्याला ५४ लाख रुपयांचे वीजबील येते. विशेष म्हणजे वीजपुरवठा सुरळीत नसतानाही पदरात पडलेल्या या वाढीव बिलाच्या तणावाखाली येऊन सुशीलचा मित्र आत्महत्या करतो. येथूनच खऱ्या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते. गावापर्यंत वीजेचा नीट पुरवठा होत नसतानाही इतकं वाढीव बिल कसं काय येतं याचा शोध सुशील घेतो आणि त्यातूनच येथे वीज चोरी होत असल्याचं समोर येतं. या वीजचोरी विरोधात सुशील कायदेशीर आवाज उठवतो आणि आपल्या आत्महत्या केलेल्या मित्राला न्याय मिळवून देतो. सुशीलच्या या लढ्यामध्ये त्याला याच गावात राहणारी ललिता (श्रद्धा कपूर) आणि वकील (यामी गौतम) त्याला साथ देतात.

चित्रपटाचं कथानक हळूहळू पुढे सरकत असताना त्याला साजेशा गाण्यांची जोडही देण्यात आली आहे. या गावातील नागरिकांची व्यथा, सुशीलचा संघर्ष, त्याचा अडचणी यावर अनेक गाण्यांची निर्मिती केली असून या गाण्यांमुळे चित्रपटात वातावरण निर्मिती होताना दिसत आहे.

‘बत्ती गुल…’मध्ये श्री नारायण सिंह यांनी उत्तम कलाकारांची निवड केली आहे. विशेष म्हणजे शाहीद सुशील कुमारची भूमिका खऱ्या अर्थाने जगला आहे. तर श्रद्धा कपूरनेही ललिताच्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त वाणी कपूर, पंकज त्रिपाठी, अश्रुत जैन, अनुष्का राजन या युवा कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.