Dhadak Movie Review : गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांनी उत्सुकता लागून राहिलेला ‘धडक’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सैराट’चा हा हिंदी रिमेक असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची तुलना सुरुवातीपासून ‘सैराट’शी झाली. त्यामुळे जर चित्रपटाचा आशय, संगीत, अभिनय, सादरीकरण या सर्व गोष्टींच्या बाबतीत जर ‘सैराट’ला १०० पैकी ८५ ते ९० गुण देत असलो तर तिथे ‘धडक’ला ६५ ते ७० गुण मिळू शकतात.

चित्रपटाची कथा ‘सैराट’चीच पण राजस्थानच्या पार्श्वभूमीवर ‘धडक’ रेखाटला गेला आहे. या चित्रपटाची सर्वाधिक औत्सुकतेची गोष्ट होती ती म्हणजे नवीन चेहऱ्यांची. जान्हवी आणि इशान यांची केमिस्ट्री आणि त्यांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये जान्हवीने बाजी मारली की इशानने असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर दोघांनाही राजस्थानी शैली उत्तम जमली आहे. पण जान्हवीला अभिनयाचा सूर तितकासा सापडलेला दिसत नाही. अभिनय कौशल्याचे धडे तिनं अजून गिरवण्याची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जान्हवीची तुलना आर्ची या भूमिकेशी केल्यास रिंकू राजगुरू बेधडक आणि स्पष्टवक्ती होती. तर जान्हवीत हा बेधडकपणा जाणवत नाही. पण तिचं काम आत्मविश्वासपूर्ण आहे. दुसरीकडे इशान पहिल्या दृश्यापासून पकड घेतो. चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. प्रेक्षकांना कथेत लगेच गुंतवतो, मात्र उत्तरार्धात कथेची ही पकड सैल होताना दिसते.

दिग्दर्शक शशांक खैतानला उत्तरार्धात नाट्य फारसं खुलवता आलं नाही. यात मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर इशानच्या आईची भूमिका साकारत आहे. पण त्यांच्या भूमिकेला म्हणावा तसा वाव मिळाला नाही. चित्रपटात राजस्थानी संस्कृतीची भव्यता आहे. उदयपूरचं सौंदर्य, भव्यता, राजवाडे लक्ष वेधून घेतात. पण या भव्यतेमध्ये चित्रपटाचा आत्मा कुठे तरी हरवतोय असं वाटतं. ‘सैराट’मधल्या झिंगाट या गाण्याने सर्वांनाच अक्षरश: वेड लावलं होतं. पण राजस्थानी पार्श्वभूमीवर असलेल्या ‘धडक’मध्ये झिंगाट गाणं साच्यात बसत नाही. त्याऐवजी एखादा राजस्थानी लोकसंगीत त्यात समाविष्ट केला असता तर कदाचित त्यात वेगळेपण जाणवला असता.

‘सैराट’चा शेवट मनाला चटका लावणारा होता. तर ‘धडक’चा शेवट थोडा वेगळा ठरतो. चित्रपट बघताना ‘सैराट’शी तुलना तुम्ही करा किंवा करू नका पण तरुणाईला मनोरंजन देणारा ‘धडक’ ठरतो.