आज आपला देश स्वतंत्र होऊन अनेक वर्ष झाली. देश स्वतंत्र व्हावा यासाठी अनेक सैनिकांनी त्यांचं रक्त सांडलं. त्यामुळे आज देशातील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत आहे. मात्र या स्वातंत्र्यावर कोणतीही गदा येऊ नये किंबहुना देशातील प्रत्येक नागरिकाचं संरक्षण व्हावं यासाठी देशाच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने भारतीय जवान तैनात आहेत. देशाचं स्वातंत्र्य अबाधित रहावं यासाठी भारतीय जवानांनी अनेक परकीय सैन्याबरोबर लढा दिला आणि देशावरील संकट माघारी परतवलं. याच वीर योध्दांची कथा देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी ‘पलटन’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जे.पी दत्ता यांचा हा प्रयत्न यशस्वी झाल्याचंही पाहायला मिळालं आहे.

कायम परकीय देशांबरोबर मैत्रीचं नातं प्रस्थापित करणाऱ्या भारताच्या पाठीत चीनने १९६७ साली खंजीर खुपसलं. त्यामुळे आज चीन भारताच्या शत्रूराष्ट्रांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून भारताचा मैत्रीभाव आणि चीनने केलेली बेईमानी या चित्रपटातून दाखवण्यात जेपी दत्ता यांनी यश आलं आहे. चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसंतसं भारतीय सैन्याविषयीचा आदरभाव प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात दाटून येतो.

भारतीय सैन्याच्या आजवर झालेल्या लढाईमध्ये भारत-चीन लढाई प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करुन आहे. त्यामुळे या लढाईवेळी भारतीय सैन्याची आणि त्यांच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची काय अवस्था होत असेल हे या चित्रपटामधील काही गाण्यातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यातच सीमेवर आपल्या कुटुंबापासून आणि प्रियजनांपासून दूर असणाऱ्या सैनिकांची घालमेल आणि देशाप्रतीचं आपलं कर्तव्य यांची जाणीव करुन देणारं ‘रात कितनी दास्ताने कह रही है’ असे बोल असणारं गाणं प्रत्येक भारतीय प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आणतं. तर ‘मैं जिंदा हूँ’ या गाण्यातून संघर्षाच्या काळातही केवळ देशभूमीसाठी लढणारे जवान पाहून अंगावर काटा उभा राहतो.

लेफ्टनंट कर्नल राय सिंह ,मेजर बिशन सिंह या पात्रांच्या माध्यमातून चित्रपट साकारण्यात आला असून प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न काही अंशी यशस्वीही ठरला आहे. मात्र चीनी सैन्यातील काही अधिकाऱ्यांची भूमिका वठविणाऱ्या कलाकारांना आपल्या भूमिकेला म्हणावा तसा न्याय देता आलेला नाही. ज्यावेळी हे कलाकार खोटा मुखवटा परिधान करुन ‘हिंदी-चीनी भाई भाई’ असा जयघोष करतात तेव्हा त्यांच्या तोंडून निघणारे उद्गार मन विषिण्ण करतात.

कधी काळी भारतापुढे मैत्रीचा हात पुढे करत चीनने भारताच्या पाठीत खंजीर खूपसला होता. १९६७ साली चीनने भारतावर आक्रमण केलं आणि यातच मोठी युद्धपरिस्थिती निर्माण झाली. या विशाल अशा महाकाय युद्धामध्ये भारताचे १३८३ सैनिक मारले गेले तर १०४७ जखमी झाले होते. मात्र तरीदेखील भारतीय सैन्याने जीवाची बाजी लावत चीनी सैन्याला थोपवून धरलं होतं. इतकंच नाही तर या युद्धानंतरही भारतीय सैन्याचा हा लढा इथेच थांबला नव्हता. भारत चीनच्या युद्धानंतर १९६७ साली नाथुला येथे भारत आणि चिनी सैनिकात वादाची ठिगणी पडली आणि हा लढा पुन्हा एकदा १९६७ पर्यंत सुरु राहिला. त्यामुळेच वीर जवानांची हीच यशोगाथा कथा जेपी दत्ता यांनी ‘पलटन’मध्ये हुबेहूब रंगविली आहे.

‘पलटन’च्या माध्यमातून जेपी दत्ता यांनी उत्तम कलाकारांची निवड केली आहे. विशेष म्हणजे अर्जुन रामपालने लेफ्टनंट कर्नल राय सिंह यांची भूमिका खऱ्या अर्थाने जगला. तर सोनू सूद (मेजर बिशन सिंह) नेही भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त हर्षवर्धन राणे आणि गुरमीत चौधरी या युवा कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. विशेष म्हणजे लव सिन्हानेही अंतर सिंहची भूमिका तारुन न्यायचा प्रयत्न केला आहे. या साऱ्यामध्ये सिद्धांत कपूर याच्या वाट्याला म्हणावी तशी दमदार भूमिका न आल्यामुळे त्याचे प्रयत्न सरासरी असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात, काय तर आपल्या देशासाठी, देशातील प्रत्येक नागरिकाच्या संरक्षणासाठी अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच जवानांना आदररांजली वाहण्यासाठी आणि या लढाईमध्ये जखमी झालेल्या जवानांना सेल्युट करण्यासाठी पलटनने केलेला हा छोटासा प्रयत्न होता. मात्र या छोट्या प्रयत्नामुळे आज प्रत्येक भारतीयाच्या मनात पुन्हा एकदा भारतीय जवानांप्रतीचा आदर द्विगुणित होईल हे निश्चित.