श्रावण महिना म्हटलं की जसं रिमझिम बरसणारा पाऊस आणि हिरवळ लगेच डोळ्यासमोर येते तसंच श्रावण महिना म्हटलं की, मांसाहार बंद करून उपवासाचे, व्रत वैकल्याचे दिवस हेही लगेच लक्षात येते.

काही धार्मिक विधिनियमानुसार किंवा पूर्वापार चालत आलेल्या काही चालीरीतींमुळे श्रावण महिन्यात वा चातुर्मासात मांसाहार खाणं बंद केलं जातं,  पण धार्मिकच कारण या मागे आहे असे नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनातूनसुद्धा काही चालीरीती आल्या असून त्या बरोबरच असतात असे यावरून दिसते. मागील काही लेखांत आपण पाहिले की या     ऋ तुमध्ये पचनशक्ती एवढी चांगली नसते. मांसाहार तर पचण्यासाठी जड असतो. पचण्यासाठी खूप वेळ लागतो व वारंवार खाण्यात आला तर पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो, त्यातून अपचन, पित्त होणे इत्यादी अनेक तक्रारी सुरू होऊ शकतात. मांसाहार बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेल व मसाल्यांमुळे यात अधिकच भर पडू शकते. आधी खाल्लेले अन्न व्यवस्थित पचले असेल तरच पुढील घेतलेल्या जेवणाचा ताण येत नाही. नैसर्गिकरीत्याच जेव्हा पचनशक्ती अल्प असते तेव्हा तिच्यावर मांसाहार (जो पचायला कठीण व वेळखाऊ आहे) वारंवार घेतल्याने आणखीनच ताण येऊन ती अशक्त होऊ शकते.

या दिवसातील केवळ शाकाहाराने पचनशक्तीवर तेवढय़ा प्रमाणात ताण येत नाही. आतडय़ांच्या हालचाली मंदावत नाहीत. पित्ताच्या तक्रारी व पचनाच्या तक्रारी त्यातून उद्भवत नाहीत व आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते व त्यातून कार्यक्षमता वाढीस लागते. म्हणूनच कमीत कमी श्रावणात का होईना मासांहार टाळला जातो.

 

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com