देवेन्द्र गावंडे

मध्यंतरी पावसाने दडी मारलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उ. महाराष्ट्रात आता बऱ्यापैकी पाऊस झाल्याने दुष्काळाची छाया काहीशी धूसर झाली आहे. पिकांना जीवदान मिळाले असून जमिनीत पाणी मुरल्याने रबी हंगामासाठी हा पाऊस चांगला आहे. मात्र हा पाऊस सर्वत्र न झाल्याने अनेक धरणे रिकामीच आहेत..

विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने बरीच स्थित्यंतरे घडवली आहेत. कापूसपट्टा अशी ओळख असलेल्या या भागातील या महत्त्वाच्या पिकाला या पावसाने बऱ्यापैकी जीवदान मिळाले आहे. या वेळी या तीनही भागांत तब्बल ३९ लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली आहे. गुलाबी बोंडअळीचा धोका कायम असला तरी पावसामुळे झाडांची प्रतिकारशक्ती वाढल्याने शेतकऱ्यांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. काही भागातील टँकरने होणारा पाणीपुरवठा वगळला तर पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ या दुष्टचक्रातून या पावसाने मुक्ती मिळवून दिली आहे. शिवाय जमिनीत भरपूर पाणी मुरल्याने रब्बी हंगामाची सोयसुद्धा करून दिली आहे. एवढा पाऊस पडूनही मराठवाडा व विदर्भातील अनेक धरणे अजून रिकामी आहेत. पावसाचा लहरीपणा व असमान वितरण हे धोके भविष्यातही कायम राहतील, अशी चुणूक या पावसाने दाखवून दिली आहे.

विदर्भात गेल्या चार दिवसांपासून काही ठिकाणी धो-धो पाऊस बरसतो आहे. अनेक गावांची शिवारे शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने झोडपली गेली आहेत. हवामान खात्याच्या भाषेत ही अतिवृष्टीच झाली. काही तासांमध्ये बरसणाऱ्या या पावसामुळे जिकडे-तिकडे पूर आणि पाणी उदंड झाल्याचे दिसते. धरण स्थिती पाहायला जावी, तालुक्यांच्या-जिल्ह्य़ांच्या सरासरीशी पडलेल्या पावसाची आकडेवारी ताडून पाहावी तर झालेला पाऊस पुरेसा नसल्याचे आढळून येते. नागपूर, अमरावती विभागातील मोठी, मध्यम, लहान धरणे अजूनही चाळीस ते पन्नास टक्के रिकामी आहेत. विदर्भातील २२ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यांहून कमी पाऊस झालेला आहे. खरीप पेरण्यांची आकडेवारी तर सरासरीइतकी आहे, पण त्यांची अवस्था बेतास बात आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित अंतराने पाऊस व्हायला हवा. नेमकी हीच बाब अलीकडच्या काळात दुर्मीळ होत चालली आहे. पाऊस पडतो, पण तो कमी दिवसात धो-धो पडून मोकळा होतो. पावसाचे वितरण असमान आहे. दोन पावसांमध्ये पिकांनी माना टाकाव्यात एवढा दीर्घ खंड पडतो. पावसाळ्यातल्या पहिल्या जूनच्या महिन्यात विदर्भात पावसाचे दिवस (रेनी डेज) १५ दिवसांपेक्षा कमी होते. जुलैमध्ये पावसाचे दिवस २० ते २२ इतके होते. ऑगस्टमध्ये आतापर्यंत केवळ ८ दिवसांचा पाऊस झाला आहे. गडचिरोली, वाशीम आणि अकोला जिल्ह्य़ांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. मात्र उर्वरित जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात केवळ ८० टक्केच पाऊस झाला आहे. अजूनही तेथे ४२ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवावे लागत आहे.

खोरेनिहाय पावसाचे प्रमाण पाहिले, तर नर्मदा खोऱ्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २० टक्के, तापी खोऱ्यात ९ टक्के आणि वैनगंगा खोऱ्यात ११ टक्के कमी पाऊस झाला आहे. केवळ वर्धा खोऱ्यात ३ टक्के जास्त पाऊस झाला आहे. नर्मदा खोऱ्यात यंदा पावसाने दिलेली हुलकावणी लक्षवेधी ठरली आहे.

पाऊस पडलेल्या दिवसांची संख्या कमी असूनही सरासरीच्या जवळपास पाऊस नोंदला गेला असेल तर शेती क्षेत्रासाठी ते सुलक्षण म्हणता येत नाही. अशा पावसाने धरणे भरतात, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटते, पावसाची कागदोपत्री सरासरी जुळते पण प्रत्यक्षात पिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता काही हटत नाही. विशेषत: राज्यातले ८० टक्के शेतकरी जेव्हा कोरडवाहू म्हणजेच पावसावर अवलंबून असतात, तेव्हा याचे गांभीर्य अधिक वाढते.

पावसाचे असमान वितरण आणि तीव्रता हा खरा चिंतेचा विषय आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शिवारातील कापूस, सोयाबीन, तुरीला प्रारंभीच्या पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला. पश्चिम विदर्भात पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतातील उभे पीक नष्ट केले. आताच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. पण कीड-रोगांचे संकट कायम आहे.

मराठवाडय़ात गेल्या आठवडय़ात पावसाने या भागावरील दुष्काळछाया बऱ्याच अंशी हटली. माना टाकणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले खरे, पण काही मोजकी धरणे वगळता अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांपैकी औरंगाबाद व जालना वगळता अन्यत्र सर्व जिल्ह्य़ांमध्ये चांगला पाऊस झाला होता. अगदी मृग नक्षत्रापासून लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्य़ांत पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसामध्ये सरासरी ४० दिवसांचा खंड होता. त्यामुळे पिके वाळू लागली होती. औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर, गंगापूर, पैठण या तालुक्यांतील काही महसूल मंडळात पेरणी पूर्णत: वाया गेली. शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र आता आशा पल्लवित झाल्या आहेत. मका आणि सोयाबीन या दोन पिकांना या वर्षी तुलनेने अधिक भाव असेल. त्यामुळे खरीप हंगामात केलेला खर्च तरी निघेल, असे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांत पाऊस नसल्याने पिकांवर कीड वाढली होती. ती या पावसाने धुऊन निघाली आहे. पण कापसाला गुलाबी बोंडअळी लागल्याने हे पीक मात्र हाती लागण्याची शक्यता धूसर आहे.

गेल्या आठवडय़ातील पावसाने नांदेड जिल्ह्य़ातील विष्णुपुरी धरण भरले. जायकवाडी धरणातही काही अंशी पाणी आले असले तरी आजही अनेक धरणे तळालाच आहेत. परभणीतील येलदरी, हिंगोलीतील सिद्धेश्वर, लातूरचे मांजरा, बीडचे माजलगाव ही धरणे अजूनही भरलेली नाहीत. त्यामुळे पिकांना जगवेल एवढा पाऊस झाला असला तरी पाणीटंचाईचे संकट पूर्णत: टळले, असे म्हणता येणार नाही. आजही औरंगाबादसारख्या जिल्ह्य़ात पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. या हंगामात पुन्हा ऊस लागवड मोठय़ा प्रमाणात आहे. साखर कारखाने नीटपणे चालले तरच शेतकऱ्यांच्या हाती पैसा येईल. पावसाला पुष्य नक्षत्रात पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या मनाला उभारी येईल, असे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अजूनही मोठय़ा पावसाची आवश्यकता आहे.

उत्तर महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाचे दमदार पुनरागमन झाल्यामुळे अनेक पिकांना जीवदान मिळाले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी काही पिके तगण्याची शक्यता कमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजाने पहिल्या पावसाच्या भरवशावर पेरण्या करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे हात पोळले गेले. दुष्काळग्रस्त भागात मान टाकणाऱ्या पिकावर काहींनी नांगर फिरवला. पावसात पडलेला खंड, त्याचे असमतोल प्रमाण या हंगामात कृषी उत्पादन घटण्यास हातभार लावेल. सध्याच्या पावसाचा खरिपापेक्षा रब्बी हंगामासाठी अधिक लाभ होणार आहे.

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्य़ांत ऑगस्टच्या उत्तरार्धात पावसाची टक्केवारी ५० ते ७० पर्यंत पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात दमदार हजेरी लावणारा पाऊस काही भागापुरता मर्यादित राहिला होता. परिणामी, नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात कित्येक गावांना टंचाईला तोंड द्यावे लागले. दुसऱ्या टप्प्यात दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या परिसरात पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचा जीव भांडय़ात पडला. धरणांतील जलसाठा उंचावला. उत्तर महाराष्ट्रात बाजरी, मका, ज्वारी, भात, नागली या तृणधान्यांसह मूग, उडीद, तूर ही कडधान्ये, तर सोयाबीन, भुईमूग, तीळ या तेलबियांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. प्रारंभीच पावसाला इतका विलंब झाला की, काहींना पिकात फेरबदल करावे लागले. नांदगाव तालुक्यातील २५ हून अधिक शेतकऱ्यांनी अधिक प्रतीक्षा करण्यापेक्षा दीडशे एकरवरील पिकांवर दुबार पेरणीसाठी नांगर फिरवला. ज्यांची पिके जगली, त्यांना फारसे उत्पादन मिळण्याची आशा नाही. काहींनी गुरांसाठी चारा हा पर्याय ठेवला. या स्थितीत दुबार पेरणीचे संकट नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. दुष्काळी भागातील, पावसावर अवलंबून असलेली शेतीची समीकरणे विस्कटली. बागायती क्षेत्र धरणालगतच्या शेतीला तितकी झळ बसलेली नाही.

जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्य़ांत  कापसाला जीवदान मिळाले. मध्यंतरी पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. मूग आणि उडीद ही कमी कालावधीची पिके आहेत. जुलै महिन्यात फलधारणेसाठी पाऊस आवश्यक असतो. पण नेमक्या याच कालावधीत पावसाचा खंड झाला. ती वाया जाण्याचा धोका आहे. कापूस, तूर या अधिक मुदतीच्या पिकांना सध्याच्या पावसाचा लाभ होईल. सातपुडा पर्वतराजीत वसलेला नंदुरबार हा यंदा राज्यात सर्वात कमी पर्जन्यमान झालेला जिल्हा. काही वर्षांपासून मान्सूनच्या लहरीपणाची झळ शेती, पर्यायाने शेतकऱ्याला बसत आहे. यंदा त्याची पुनरावृत्ती झाली.

सहलेखन : सुहास सरदेशमुख (औरंगाबाद),

मोहन अटाळकर (अमरावती) व अनिकेत साठे (नाशिक)