गौरव सोमवंशी

बिटकॉइनबाबत सातोशी नाकामोटोने केलेले नियम कायम राहतील की त्यात काही बदल होतील?

सातोशी नाकामोटोने अभ्यासपूर्ण अंदाज लावत बिटकॉइनच्या व्यवहारांबाबत काही तरतुदी केल्या. या तरतुदी अमलात आणण्यासाठी काही नियम पाळावे लागतात, त्यांना ‘बिटकॉइन प्रोटोकॉल’ असे संबोधतात. काहींना प्रश्न पडला आहे की, सातोशी नाकामोटोने केलेले हे नियम कायमस्वरूपी तसेच राहणार का? मोबाइलमधील वेगवेगळे अ‍ॅप्ससुद्धा अनेकदा ‘अपडेट’ करावे लागतात; बिटकॉइनमध्ये ‘अपडेट’ची गरज भासल्यास काय?

बिटकॉइनची प्रणाली, त्यामधील नियम किंवा प्रोटोकॉल हे जगातील कोणतीही व्यक्ती बघू शकते. या सदरातील पहिल्या लेखात (‘काचेचे इंजिन!’, २ जानेवारी) आपण हेच पाहिले होते की, ही प्रणाली एका काचेपासून बनलेल्या इंजिनप्रमाणे आहे; ज्याची कार्यप्रणाली सगळ्यांना पाहता येते, ज्यामध्ये काहीच गुपित नाही. दुसरे म्हणजे, ही काही साधीसुधी काच नसून सुरक्षाकवच असलेली काच आहे; ज्यामुळे कोणाही व्यक्तीला या इंजिनमध्ये काही हस्तक्षेप करता येणार नाही. इथे हस्तक्षेप म्हणजे ‘ब्लॉकचेन’मध्ये नमूद केलेली माहिती बदलणे किंवा काढून टाकणे. ते शक्य नाहीच. परंतु समजा हे काचेचे इंजिन आपल्याला आणखी परिपूर्ण बनवायचे असेल तर?

कोणत्याही यंत्रणेत बदल घडवून आणण्याची गरज भासूच शकते. समजा, बिटकॉइनमध्ये भविष्यात आढळून येणाऱ्या त्रुटी, चुका दूर करायच्या किंवा इच्छित बदल अमलात आणायचे असतील, तर ‘बिटकॉइन प्रोटोकॉल’ आपल्याला तसे करण्याची मुभा देईल का? सातोशी नाकामोटोने याबद्दल काही तरतुदी केल्या आहेत का? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बिटकॉइन हे एक ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ आहे. याचा अर्थ, ही यंत्रणा कोणाच्याच मालकीची नाही. अगदी सातोशी नाकामोटोचीसुद्धा नाही! नाकामोटोने सुरू केलेल्या संकेतस्थळावर असे स्पष्ट नमूद केले आहे की, ‘बिटकॉइन ही यंत्रणा कोणी बनवली, सातोशीची खरी ओळख काय, हे जाणून घेण्याचे महत्त्व कागदाचा वापर करताना तो कागद नक्की कोणी शोधून काढला हे जाणून घेण्याइतकेच आहे.’ एकदा का कागद बनला, की लोक हवे तसे त्यात बदल करून त्याचा कोणत्याही कामासाठी वापर करूच शकतात. तसेच बिटकॉइनचा कोड घेऊन  जगातील कोणीही प्रोग्रामर त्यात बदल घडवू शकतोच. असे असताना निव्वळ गोंधळ उडण्याची शक्यता कशी नाकारता येईल?

या संदर्भात अकबर आणि बिरबलची एक गोष्ट आठवते, ती अशी.. एकदा बिरबलकडे दोन भावंडे आपली व्यथा घेऊन आली. त्यांच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झालेला असतो, आणि मृत्यूपश्चात त्यांची बरीच मालमत्ता या दोन भावंडांत विभागली जाणार होती. पण कोणत्या पद्धतीने ही विभागणी होणार, हे वडिलांनी कुठेच नमूद करून ठेवले नव्हते. मालमत्तेत जमिनी, घरे, गाय, बैल, सोने-चांदी.. असे खूप काही होते. इतक्या गुंतागुंतीच्या मालमत्तेची विभागणी करताना त्या दोघा भावंडांत नेहमी भांडणे होत होती. म्हणून दोन्ही भावंडे बिरबलसमोर येऊन उभी ठाकली होती. पण बिरबलने मालमत्तेची यादी ढुंकूनसुद्धा पाहिली नाही, तरीही त्याने यावर उपाय शोधून दिला. तो कसा? तर बिरबलने त्यांना सांगितले, ‘‘तुम्हा दोघांपैकी एक जण सगळ्या मालमत्तेची विभागणी स्वत:च्या पद्धतीने करेल आणि त्याचे दोन भाग बनवेल. पण दोन्ही भागांपैकी कोणता भाग निवडायचा याचा हक्क दुसऱ्या भावाला असेल.’’ याने काय झाले? तर पहिल्या भावाला प्रामाणिकपणे आणि काटेकोर विभागणी करण्याचे कारण वा प्रोत्साहन मिळाले. दोन्ही भावांनी स्वार्थी होऊन बिरबलची युक्ती अमलात आणली तरी त्यात दोन्ही भावांचे भले होते आणि फसवेगिरी होण्याची शक्यताही खूपच कमी होती.

हे उदाहरण ध्यानात ठेवा. आता समजा, ‘बिटकॉइन प्रोटोकॉल’ नव्याने बनवण्याचा हक्क कोणत्याही प्रोग्रामरला आहे. पण या नव्या प्रोग्रामरने केलेले बदल स्वीकारायचे की नाहीत, हे ठरवणारे इतर बिटकॉइन वापरणारेच असतील. बहुमताचे महत्त्व आपण एका लेखात (‘बहुमताचे कोडे..’, ३० एप्रिल) तांत्रिकदृष्टय़ा समजून घेतलेच आहे. त्या लेखात ‘बहुमत मिळवण्याची कार्यप्रणाली’ (कन्सेन्सस अल्गोरिदम) या संकल्पनेची चर्चा केली होती. पण ती फक्त आणि फक्त ‘ब्लॉकचेन’अंतर्गत होणाऱ्या तंत्रज्ञानाशी निगडित होती. पण हाच बहुमताचा दृष्टिकोन ‘ब्लॉकचेन’च्या बाहेर आणला आणि ‘ओपन सोर्स’ प्रणालीसाठी वापरला तर ध्यानात येईल की, बदल कसे घडतात आणि हे बदल स्वीकारले जातील की नाही हेसुद्धा बहुमतावर अवलंबून असते. परंतु बहुमत का असावे? तर.. बदल सर्वाच्या फायद्याचे आणि बिटकॉइनला पूरक असल्यास प्रत्येकाचे भलेच आहे, अगदी बिरबलच्या गोष्टीमधल्या त्या भावंडांसारखे!

परंतु हे बदल सुचवायचे कसे? त्याची कार्यप्रणाली आमिर टाकी नामक संगणकतज्ज्ञाने सुचवली आहे. आमिर टाकी हा अवलिया अनेक ‘ओपन सोर्स’ प्रयोगांमध्ये कार्यरत असून, २०१० साली त्याचे लक्ष बिटकॉइनकडे वळले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आमिर टाकीने ‘बिटकॉइन इम्प्रूव्हमेन्ट प्रपोजल (बीआयपी)’ ही बदल सुचवण्याची कार्यपद्धत जगासमोर मांडली. ‘बीआयपी’ ही संकल्पना आमिर टाकीने ‘पायथॉन एनहॅन्समेंट प्रपोजल’वरून प्रेरित होऊन बिटकॉइनसाठी सुचवली. ‘पायथॉन’ ही आजची अत्यंत लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा असून त्यात सुधारणा होत राहतात. सुधारणा होत राहणे ही कोणत्याही संगणकीय प्रणालीची मूलभूत गरज आहे आणि बिटकॉइनही त्यास अपवाद नाही. फरक इतकाच आहे की, ‘मायक्रोसॉफ्ट विंडोज’मध्ये फक्त त्या कंपनीचे कर्मचारी सुधारणा करू शकतात, तर ‘ओपन सोर्स’ प्रणालीत कोणीही सुधारणा सुचवू शकतो आणि ती सुधारणा स्वीकारायची की नाही, हे बहुमताने ठरते. आजपर्यंत असे जवळपास ३४० ‘बीआयपी’ सुचवले गेले आहेत. ‘बीआयपी’चे तीन प्रकार पडतात : (१) स्टॅण्डर्ड ट्रॅक बीआयपी : यातून ‘बिटकॉइन प्रोटोकॉल’मध्येच बदल सुचवले आहेत. उदा. एका ब्लॉकमध्ये किती माहिती साठवून ठेवता यावी, बहुमत कसे मिळवावे, वगैरे. (२) इन्फॉर्मेशनल बीआयपी : यामध्ये फक्त काही डिझाईनसंबंधी माहिती असणे किंवा माहिती प्रसारित करणे याविषयीचे बदल सुचवलेले असतात. (३) प्रोसेस बीआयपी : हे स्टॅण्डर्ड बीआयपीप्रमाणेच असतात, पण कधी ते ‘बिटकॉइन प्रोटोकॉल’ला वगळून सुचवलेले असतात.

कोणतेही बदल अगदी कोणीही सुचवू शकते/शकतो- फक्त त्यासाठी आकृतीत दाखवलेल्या मार्गाने जावे लागेल. बरे, या मार्गाने गेल्यास बदल घडवून आणले तरी ते प्रोग्रामरपुरते मर्यादित असतील. इथे सगळे प्रोग्रामर हे बिरबलच्या गोष्टीतील पहिल्या भावाप्रमाणे आहेत. तर बदल स्वीकारायचा की जुन्याच यंत्रणेस प्रमाण मानायचे, याचे हक्क हे बिटकॉइन वापरणाऱ्यांकडे असतात.

मागील लेखात (‘संख्या आणि मूल्य’, १ जुलै) हे पाहिले की, बिटकॉइनचा साठा हा २.१ कोटी बिटकॉइन इतकाच आहे, त्यापैकी १.८ कोटी आजवर खणून (मायनिंग) झाले आहेत. सातोशी नाकामोटोनेच ही २.१ कोटींची मर्यादा असावी अशी तरतूद केली आहे. पण जर उद्या बहुतांश बिटकॉइन प्रोग्रामर आणि बिटकॉइन वापरकर्त्यांना ही मर्यादा बदलायला हवी असे वाटले, तर तेव्हा कोणाचा शब्द प्रमाण मानला जाईल? सातोशी नाकामोटोचा की बहुतांश प्रोग्रामर आणि बिटकॉइनधारकांचा? अर्थात, बहुतांश प्रोग्रामर आणि बिटकॉइनधारकांचाच. सध्या तरी २.१ कोटीच बिटकॉइन असावेत या नाकामोटोच्या निर्णयाशी बहुतांश मंडळी सहमत आहेत. पण उद्या जर असहमती हेच बहुतांश लोकांचे मत बनले, तर त्या मताला बिटकॉइन नियमावलीत आणून मूलगामी बदलही घडवून आणता येतील अशी तरतूद आहे. गेल्याच वर्षी असे झालेसुद्धा. मॅट लुओंगो नामक प्रोग्रामरने- बिटकॉइन संख्येच्या मर्यादेत वाढ करावीच लागेल, असे मत मांडले. अर्थात, यास विरोध झाला. पण हा विरोध सातोशी नाकामोटोने येऊन केलेला नव्हता, तो बहुमताचा विरोध होता. असे गृहीत धरा की, जर मॅट लुओंगोचे चाहते वाढत गेले आणि जवळपास सर्वानाच वाटले की लुओंगोचे मत बरोबर आहे, तर तसे होईलसुद्धा!

हे सगळे झाले बहुमताचे बोलणे. पण जे बहुमताचे ऐकत नाहीत, ज्यांचे मत हे अल्पसंख्याकांत मोडते, त्यांनी काय करावे? जर दोन मतांचे दोन वेगवेगळे फाटे फुटले तर? या ‘फाटे फुटण्याला’ बिटकॉइनच्या दुनियेत ‘फोर्किंग’ असे म्हणतात. ‘फोर्किंग’चा शब्दश: अर्थ ‘फाटे फुटणे’ असाच होतो. त्यासंदर्भातही तरतूद केलेली आहेच. परंतु या फाटे फुटण्याने आधीच ब्लॉक्समध्ये बद्ध केलेल्या माहितीला काहीच धक्का लागत नाही, पण त्याने भविष्यात दोन वेगवेगळे मार्ग बनतात. कोणकोणत्या प्रकारे ‘ब्लॉकचेन’मध्ये फाटे फुटू शकतात आणि असे काही बिटकॉइनबाबत झाले आहे का, ते पुढील लेखात पाहू..

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io