09 August 2020

News Flash

‘सब का विश्वास’ जिंकणार का?

भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला जनमताचा कौल हा प्रचंड मोठा आहे हे नाकारता येणार नाही.

(संग्रहित छायाचित्र)

पी. चिदम्बरम

भाजपने सरकार स्थापन केले, ते ‘मोदी काहीच चुकीचे करू शकत नाहीत’ असे मानणाऱ्या लोकांच्या मतांवर. पण ज्या वंचित लोकांना मोदी यांनी त्यांच्यासाठी काही केले नाही असे वाटते, त्यांनीही मोदींनाच मते दिली आहेत! या पाश्र्वभूमीवर, मोदी यांना ‘सब का विश्वास’ जिंकण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील..

भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला जनमताचा कौल हा प्रचंड मोठा आहे हे नाकारता येणार नाही. यापूर्वीही लोकसभा निवडणुकीत एकाच राजकीय पक्षाला ३०३हून अधिक जागा मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत; त्यामुळे आताचा काही अपवाद नाही. इंदिरा गांधी यांना १९८० मध्ये ३५३ जागा मिळाल्या होत्या, तर राजीव गांधी यांना १९८४ मध्ये ४१४ जागा मिळाल्या होत्या. फक्त या प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी होती. इंदिरा गांधी यांनी अप्रिय आघाडीविरोधात लढून हे यश मिळवले होते. त्यांनी तुरुंगवासासह अनेक प्रकारचे छळ सोसले होते, पण त्यानंतर लोकांच्या पाठिंब्याने त्यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणली. रायबरेली मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता, पण नंतरच्या या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना या मतदारसंघाने पुन्हा निवडून दिलेच शिवाय देशातही काँग्रेसला भरघोस यश मिळाले. राजीव गांधी यांच्या बाबतीत वेगळी परिस्थिती होती. त्यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे ही सुप्त लाट निर्माण झाली.

व्यापक मताधार

या वेळी भाजपला ३०३ जागा मिळाल्या आहेत, पण ज्या प्रमाणात भाजपला यश मिळाले आहे ते आश्चर्यकारक आहे. भाजपला केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांत अजिबात यश मिळाले नाही. जिथे दोन पक्षांत लढत होती अशा मतदारसंघांत भाजपला मोठे विजय मिळाले. विशेषकरून हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम या राज्यांमध्ये फार मोठय़ा फरकाने त्यांच्या उमेदवारांना विजय मिळालेले आहेत, हे मताधिक्याचे आकडे पारंपरिक वाटत नाहीत, ते अविश्वसनीय आहेत. आता या सगळ्याचे आकडे कुणीही भाकीत केलेले नव्हते, कुठल्याही सर्वेक्षणात मताधिक्याचे आकडे सांगितले गेले नव्हते तरी या राज्यांमध्ये भाजपच्या विजयाची शक्यता निवडणूकतज्ज्ञांनी वर्तवलेली होती. भाजपने हिंदी भाषिक पट्टय़ात जे यश मिळवले त्याचा अर्थ उच्चवर्णीयांची मते भाजपला मिळाली आहेत एवढाच मर्यादित नाही तर भाजपला इतर मागासवर्गीय, बहुतांश दलित, मुस्लीम व ख्रिश्चन यांचीही मते मिळाली आहेत. या सर्व लोकांचे भाजपला मतदान करण्याचे हेतू वेगळे असू शकतील, पण त्यांनी भाजपला मते दिली हे सत्य आहे. ते नाकारता येणार नाही.

मते मिळाली, विश्वास नव्हे

लोकसभा निवडणुकीत एवढे प्रचंड बहुमत मिळाले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आनंदित झाले असतील, पण समाधानी नक्कीच झाले नसतील असे मला वाटते. माझ्या मते त्यांना या निवडणुकीतील यशातून जे समजले किंवा उमगले ते त्यांच्याच पक्षातील इतरांना उमगले नसावे. निवडणुकीत केवळ दलित, मुस्लीम, ख्रिश्चन, अति गरीब लोक यांची मते मिळवणे पुरेसे नसते. मोदी यांना हे पुरते ठाऊ क आहे की, त्यांना या सर्व लोकांची मते मिळाली असली तरी त्यांचा विश्वास संपादन करता आलेला नाही. त्यामुळेच निवडणुकीनंतर त्यांनी संसद भवनात झालेल्या एनडीए मित्रपक्षांच्या पहिल्याच बैठकीत ‘सब का साथ, सब का विकास’ या जुन्याच घोषणेला ‘सब का विश्वास’ची जोड दिली हे तुमच्याही लक्षात आले असेल.

ही अतिशय चतुर अशी खेळी होती, पण त्यात अनेक अडचणी आहेत हे खरे. यात त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या अडचणीही आहेत. गिरीराज सिंह, साध्वी निरंजन ज्योती, संजीव बल्यान यांसारखे अनेक सहकारी मोदींना व पक्षाला अडचणीत आणण्याचे काम नित्यनेमाने आजही करीत आहेत. याआधी अशी अडचणीत टाकणारी वक्तव्ये करणारे व मंत्रिमंडळात असलेले महेश शर्मा, अनंतकुमार हेगडे यांना आताच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. साक्षी महाराज व साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हे तशीच विधाने करतात, पण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. अनावश्यक विधाने करणारे गिरीराज सिंह हे मात्र कॅबिनेट मंत्री आहेत. इफ्तार पार्टीच्या वेळी गिरीराज सिंह यांनी इतर दोन मित्रपक्षांच्या नेत्यांना उद्देशून वक्तव्य केले. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना समज दिली, पण तरी गिरीराज सिंह यांनी ना खेद व्यक्त केला ना त्यांना त्याची खंत वाटली. इफ्तार पार्टीच्या मुद्दय़ावरून गिरीराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांना लक्ष्य केले होते. हे सगळे कमी की काय म्हणून साक्षी महाराज यांनी तुरुंगास भेट देऊन उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेतील आरोपी असलेल्या आमदाराची भेट घेतली. ही बलात्काराची घटना २०१७ मध्ये घडली होती. आपल्या विजयात आ. कुलदीप सिंह सेनगर यांचा मोठा सहभाग होता, असे सांगून साक्षी महाराजांनी त्यांचे आभार मानले.

बालपण व तरुणपणापासून जे आपपरभाव या काही लोकांमध्ये आहेत त्या सवयी सहजासहजी जाणार नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप यांच्या वरिष्ठ नेत्यांनीही याला पूरक विधाने वेळोवेळी केली आहेत. ‘ईदसाठी वीज दिली, पण दिवाळीसाठी नाही’, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाड या ‘अल्पसंख्याक हे बहुसंख्याक’ असलेल्या मतदारसंघात उमेदवारी करीत आहेत, अशा आशयाची विधाने पंतप्रधान मोदी यांनीच प्रचारात केली होती. दलित व मुस्लीम यांचे झुंडबळी घेण्याच्या घटना थांबणार नाहीत तोपर्यंत काहीच साध्य होणार नाही. शिवाय संघ व भाजपचे शीर्षस्थ नेतेही समतोल बोलणार नाहीत तोवर दलित, ख्रिश्चन, मुस्लीम यांच्या मनात विश्वास निर्माण होणार नाही. भाजपच्या निवडून आलेल्या ३०३ खासदारांत जर केवळ एक मुस्लीम खासदार असेल तर अल्पसंख्याकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यास मदत होणार नाही.

भीती नको, कल्याण हवे

यात आणखी एक मोठी समस्या आहे. मुस्लीम, दलित, ख्रिश्चन तसेच गरिबांचा विश्वास संपादन करायचा असेल तर भाजपला दोन अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यात पहिली अट अशी की, देशात कुणी भीतीच्या सावटाखाली राहता कामा नये. दुसरी अट म्हणजे या सर्व लोकांचा आर्थिक स्तर सातत्याने उंचावत गेला पाहिजे. आज तरी ही कुठलीच अट पूर्ण होताना दिसत नाही. आताचे सरकार या दोन अटींची पूर्तता कशी करते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

समाजातील काही गटांत भीती पसरलेली आहे. ती दूर करण्यासाठी फार धाडसी पावले उचलावी लागतील. प्रत्येक वेळी दलित, मुस्लीम, ख्रिश्चन यांच्या विरोधात आक्षेपार्ह व पक्षपाती कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण सध्या तरी तशी अपेक्षा करणे अवघड आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आता अशा आक्षेपार्ह वागणुकीवर कठोर कारवाई करून नवा आदर्श घालून देतील, अशी अपेक्षा आहे. दुसरी अट ही वस्तुनिष्ठपणे सांगायचे तर सरकारच्या नियंत्रणात नाही. या लोकांचा आर्थिक स्तर त्यांना नोकऱ्या व नोकरीची सुरक्षितता मिळाली तरच उंचावणार आहे. त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. त्यांना सार्वजनिक वस्तू व सेवा मिळणे महत्त्वाचे आहे. उच्च व समान आर्थिक वाढ होत असेल तर नोकऱ्या व उत्पन्नाच्या समस्या राहात नाहीत. २०१८-१९ हे वर्ष ज्या निराशाजनक अवस्थेत संपले त्यानुसार तरी समान व उच्च आर्थिक वाढ अजून तरी दृष्टिपथात नाही. दलित, मुस्लीम, ख्रिश्चन व दारिद्रय़रेषेखालील लोकांनी भाजपला मते दिली याचे कारण त्यांना भाजप किंवा त्यांच्या उमेदवारांमध्ये फार मोठी गुणवत्ता दिसली असे नाही तर त्यांना विरोधी पक्षात जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार दिसले नाहीत. त्यामुळे हे विश्वासदर्शक मतदान नव्हते तर शहाणपणाचा विचार करून केलेले मतदान आहे. त्यामुळे भाजपवर लोकांचा विश्वास आहे असे म्हणता येणार नाही, त्यामुळे भाजपला मतदारांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे.

आताची परिस्थिती असाधारण आहे, भाजपने सरकार स्थापन केले, ते ‘मोदी काहीच चुकीचे करू शकत नाहीत’ असे मानणाऱ्या लोकांच्या मतांवर. पण ज्या वंचित लोकांना मोदी यांनी त्यांच्यासाठी काही केले नाही असे वाटते, त्यांनीही मोदींनाच मते दिली आहेत! अशा या कात्रीत सापडल्यानंतर आता मोदी या आतापर्यंत अनभिज्ञ असलेल्या प्रांतात प्रवास करताना या समस्यांवर कशी मात करतील हे आता बघावे लागेल.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 12:11 am

Web Title: article by p chidambaram on everyones faith to win
Next Stories
1 हा ‘सब का विकास’ कसा?
2 दुसरा डाव सर्वसमावेशकतेचा?
3 चर्चेऐवजी फक्त प्रचार!
Just Now!
X