चित्रवाणी वाहिन्यांच्या पत्रकाराने आक्रस्ताळी हातवारे वा चढा आवाज ठेवू नये, या संपूर्ण वेळाचा मालक मीच अशा थाटात वागू नये, त्याने स्वत:च मोठा विचारवंत असल्याच्या थाटात शेरेबाजी करू नये.. या रास्त अपेक्षा कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत असे मानणाऱ्यांनी काही क्षण डेव्हिड फ्रॉस्ट यांना आदरांजली वाहायला हवी. चित्रवाणी पत्रकाराने कसे असावे, याचे एक उमदे उदाहरण म्हणजे ‘सर’ डेव्हिड फ्रॉस्ट. आधी बीबीसी आणि गेल्या सात वर्षांत ‘अल् जझीरा इंग्लिश’ वाहिन्यांवर मुलाखतींचे व अन्य कार्यक्रम फ्रॉस्ट यांच्या नावाने ओळखले जात. अत्यंत शांतपणे, सुरुवातीचे प्रश्न जुजबी वाटावेत असेच विचारून समोरच्याला बोलते करण्याचे कसब फ्रॉस्ट यांच्याकडे होते. तिरकस प्रश्न असायचे, पण समोरच्याला त्यातली खोच कळण्याच्या आत चित्रवाणीच्या प्रेक्षकांना खरेखुरे उत्तर मिळून जाईल, असे! उदाहरणार्थ, ‘तुम्ही आणि बुश एकत्र प्रार्थना करता का हो?’ यासारखा प्रश्न इराकवरील चढाईच्या अगोदर टोनी ब्लेअरना विचारून ब्रिटिश आणि अमेरिकी हितसंबंध वेगवेगळे असल्याचे भान तेव्हाच्या ब्रिटिश पंतप्रधानांना नसल्याचे सिद्ध केले ते फ्रॉस्ट यांनीच. याच फ्रॉस्ट यांनी ‘वॉटरगेट’ प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यासह चार मुलाखतींची मालिका केली. निक्सन अगोदर म्हणत होते की, चूक माझी नाहीच. मी राजीनामा दिला खरा, पण पदावर राहण्याचा हक्क मला होताच. याच निक्सनना त्याच मुलाखतींत फ्रॉस्ट यांनी अमेरिकी जनतेची माफी मागावयास लावले. राजकारण्याला त्याच्या कातडीबचाऊ पवित्र्यापासून खाली खेचायचे तर ओढाताण चालणार नाही, जरा सबुरीने घेऊन त्याच्याकडूनच कबुली घेतली पाहिजे, हे फ्रॉस्ट यांना आधीच माहीत होते, म्हणून चार मुलाखतींचा वेळ त्यांनी निक्सनना दिला होता. ही मुलाखत हा चित्रवाणी-पत्रकारितेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. चित्रवाणीवर मोठय़ा मुलाखती देणारे बडे लोक हे प्रतिमा-प्रसिद्धीचाच हव्यास घेऊन येणार, हे फ्रॉस्ट यांनी ओळखले होते. त्या प्रसिद्धी-हेतूंना धक्का लावून बडय़ाबडय़ांना उघडे पाडण्याचे काम त्यांनी अनेकदा केले. पण धक्का लावतेवेळी, पत्रकाराने स्वत:चा कसा विजय झाला असे वागायचे नसते, हे पथ्य मात्र पाळले. ‘देशाला हे आत्ता कळलं पाहिजे’ यासारखी वाक्ये नुसती दरडावल्यासारखी उच्चारायची नसतात, तर    देशाला जे कळले पाहिजे ते बाहेर काढणे, हे पत्रकाराचे काम असते, हे डेव्हिड फ्रॉस्ट यांनी दाखवून दिले आणि अनेकांना शिकवलेही. सन १९९३ मध्ये राणीकडून सर किताब, त्यासोबत वलय, अनेक महत्त्वाचे पुरस्कार या संभारातून फ्रॉस्ट यांनी स्वत:चा भेदक शांतपणा मात्र कायम जपला. राजकीय मते त्यांना असतीलही, परंतु ती त्यांनी कधीही, कुणाहीपुढे मांडली नाहीत. भूमध्य समुद्रात आलीशान जहाजातून जलसफरीवर गेले असताना शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने झालेला फ्रॉस्ट यांचा मृत्यू हा चटका लावणारा आहेच; परंतु चित्रवाणी-पत्रकारितेतल्या एका ‘घराण्या’चा मूळपुरुष निवर्तला, याची हुरहूर   फ्रॉस्ट यांच्या जगभरात विखुरलेल्या प्रेक्षकांना अधिक आहे.