24 August 2019

News Flash

चालते मी डौलात हंसावाणी!

आपल्या अंगात किती जोश आहे याचा टेंभा मिरवण्यासाठी माणसासहित अनेक प्राणी आपल्या गळ्यात बळे बळे लोढणी बांधून घेतात!

| March 14, 2014 01:05 am

आपल्या अंगात किती जोश आहे याचा टेंभा मिरवण्यासाठी माणसासहित अनेक प्राणी आपल्या गळ्यात बळे बळे लोढणी बांधून घेतात!
कवयित्री शांता शेळके दहा वर्षांच्या होत्या तेव्हाची गोष्ट. तोवर त्यांच्या पायात हलक्या साखळ्या, तोरडय़ा, वाळे खुशीत खुळखुळायचे. पण काय! एक दिवस त्यांची मैत्रीण पायात नवे कोरे चमचमते भारदस्त तोडे बांधून तोऱ्यात मिरवत आली. झाले, शांताने तोडय़ांचा असा ध्यास घेतला की रुसणे, रडणे, हातपाय आपटण्याचा सपाटा लावला. तिलाही असेच तोडे हवेच हवे! शेवटी आजी म्हणाली, बरं बाई, आणि आजोबांनी जुने चांदीचे दागिने वितळवून भरीव, वजनदार तोडे बनवून घेतले. पायात तोडे बांधले आणि शांताचा जीव हरपला, तिला तिचे पाय अतिशय सुबक वाटू लागले. पण उठून उभी राहिली, तर त्या तोडय़ांनी पायांना इतका जबरदस्त हिसका दिला, असा घट्ट विळखा घातला की पुसता सोय नाही. आजी म्हणाली, जड होतायत का गं? छे:, बिलकूल नाही, म्हणत शांता बळेच तोडय़ांचे वजन सहन करत पावले टाकू लागली. शांता मत्रिणींबरोबर चिक्कार हुंदाडायची. आता तोडा घातलेल्या जड पायाने लगोरीतली ठिकरी उडवणे, लपंडावात धावत जाऊन लपणे अगदी अशक्य करून सोडले. तरी आताच्या मंदगतीत एक नवीच ऐट होती ना? अशा रुबाबापोटी माणसे काय काय जोखडे सांभाळत नाहीत? संस्कृतात जोखडाला म्हणतात धुरा. मानवी समाजात मोठी जोखीम सांभाळणाऱ्यांना धुरंधर असे बिरुद दिले जाते. गुरुचरित्र धुरंधरांचे गोडवे गाते : ‘‘होईल सुख संसारी। राज्य दिधले धुरंधरी?’’ तेव्हा धुरंधर बनलेल्या शांताच्या मनात आले; तोडे माझ्या पायात, पाय माझे तालात, चालते मी डौलात, हंसावाणी!
त्या लखलखत्या शुभ्र तोडय़ांनी मैत्रिणींतही शांताचा भाव चांगलाच वाढला होता. पण असे सांभाळून किती दिवस चालायचे? एक दिवस शांताला चेव आला. मत्रिणींशी खेळता-खेळता ओटीवरून उडय़ांची चढाओढ सुरू झाली. कोणाची उडी जास्त लांब जाते. जसा तोडय़ांचा अडथळा भासू लागला, तशी शांता चिडून चिडून आणखीच जोरात उडय़ा मारायला लागली. शेवटी एका उडीत ती सपशेल तोंडघशी पडली, हातांना खूप लागले, घोटय़ावर तोडे आदळून रक्ताची धार वाहायला लागली. धावत धावत येऊन आईने तोडे काढले, हातांवर, घोटय़ावर हळदीचा लेप लावला, शांताचा जीव पुनश्च हलकाफुलका झाला!
सगळ्याच समाजप्रिय प्राण्यांत- मानवांसहित- आपण इतरांहून वरचढ आहोत हे दाखवण्याची ईर्षां प्रकर्षांने आढळते. अठराशे नव्याण्णव साली थोस्र्टाइन व्हेब्लेन या अर्थतज्ज्ञाने याचे मोठे मार्मिक विवेचन केले आहे. तो म्हणतो की, मानवप्राणी पैशाचा विनियोग शहाणपणे आपल्याला काय उपयोगाचे आहे ते खरीदण्यासाठी अजिबात करीत नाही. हातात पसे खुळखुळायला लागले की माणसाला खऱ्या-खुऱ्या गरजांचा विसर पडतो. डोक्यात येते की जगातले खरे सौदर्य आहे दिमाखात, जीवनातली खरी खुमारी आहे दुसऱ्याला हिणवण्यात. मग तो आपण किती श्रीमंत आहोत, बेपर्वाईने किती अपव्यय करू शकतो हेच दाखवण्याच्या मागे लागतो. मनुष्यस्वभाव आहे मोठा सुरस आणि चमत्कारिक, पण आपल्या अनेक प्रवृत्ती अखेर उत्क्रान्तीच्या मुशीत घडवलेल्या आहेत. साहजिकच व्हेब्लेनचे विवेचन प्राणिजगतालाही लागू आहे. आमोट्झ झाहावी नावाच्या इस्रायली शास्त्रज्ञाने याचा विचार करीत, उत्क्रान्तीच्या ओघात मोराचा पिसारा कसा अवतरला याचा छान अर्थ  १९७५ साली लावून दाखवला. खरे तर मोराचा पिसारा हे एक प्रचंड जोखड, मोठे लोढणे आहे. काही धोका जाणवला तर सुटसुटीत लांडोरी चट्कन् उडू शकतात. पण मोरांना हे शक्य नसते. त्यांना धावपट्टीवरच्या विमानासारखे पळत जाऊन, वेग घेऊन मगच उडता येते. शिवाय दरवर्षी एवढी पिसे नव्याने वाढवण्यात भरपूर शक्ती वाया जाते. निसर्ग निवडीच्या प्रक्रियेत जिवांचे आनुवंशिक गुणविशेष सतत पारखले जात असतात. गुण धारकांना आत्मसंरक्षण व प्रजोत्पादन करण्यात किती मदत करतात, या निकषावर. तर मग या कसोटीत मोरपिसाऱ्यासारखी जीव धोक्यात पाडणारी लोढणी कशी उतरतात? साऱ्या जीवनव्यवहारांत तऱ्हेतऱ्हेची तडजोड चालू असते. एका बाजूने पिसाऱ्याच्या लोढण्यामुळे मोराचा मृत्यूचा धोका वाढतो, तर त्याच वेळी ही लोढणी जाहीर करतात की भलामोठा पिसारा फुलवणारे मोर भरभक्कम आहेत. त्यांना हे ओझे सहज पेलते आहे. मोरांच्या स्वयंवरात लांडोरी ठरवतात की सर्वात भपकेदार पिसारेवाला मोर सगळ्यात दणकट असला पाहिजे, त्याचे आनुवंशिक गुण आपल्या पिलांत उतरले पाहिजेत, अन् त्याला पसंत करतात. जरी अशा मोराच्या जिवाला जास्त धोका असला तरी त्याला भरपूर जोडीदारणी मिळाल्याने असे तोऱ्यात दिमाख दाखवणारे सौंदर्य जीवसृष्टीत फैलावत राहते. झाहावीने याला नाव दिले ‘हॅण्डिकॅप प्रिन्सिपल’, ऊर्फ जोखडाचा सिद्धान्त.
जसे मोराचा सौंदर्य जोखड पेलण्यातून निर्माण झालेले आहे, तशीच दयाळ, सुभग, हळद्या अशा पक्ष्यांची गोड सुरावटही. आता लवकरच वसंत ऋतूत असे पक्षिसंगीत ऐकायला मिळू लागेल. हे गायक असतात नर. विणीचा ऋतू आला की ते स्वत:चा एक टापू प्रस्थापित करतात आणि त्या टापूतल्या एखाद्या मोक्याच्या जागी ठाकून गायला लागतात. यातून ते जसे माद्यांचे लक्ष वेधून घेतात, तसेच िहस्र पशूंचेही. तेव्हा हे गायनही मोराच्या पिसाऱ्यासारखेच त्यांचा जीव धोक्यात पाडते. पण असा धोका पत्करत हे नर दाखवतात की आम्ही मोठे समर्थ नर आहोत. आणि खरेच माद्या सर्वात लक्ष वेधून घेणाऱ्या गायकाला पसंत करतात.
प्राणी आपली गुणवत्ता नुसती नाचत-गातच नाही तर भन्नाट उडय़ा मारतही जाहीर करतात. चिंकारा, काळविटांसारखी माळरानावरची हरणे सुसाट धावत शत्रूपासून जीव वाचवायला पाहतात. साहजिकच वाटेल की असे पळताना शत्रूपासून आपले अंतर जितके वाढवता येईल तितके ते वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहतील. पण नाही, काही हरणे असे पळताना अचानक वेगाला खीळ घालत एकदम चारी खूर एकावर एक आपटत एक उंच उडी मारतात. मग पुन्हा वेग घेत पळू लागतात.
हे कशासाठी? उडी मारत ही नि:स्वार्थी हरणे आपल्या सवंगडय़ांना धोक्याचा इशारा देताहेत का? पण माळरानावर त्यांचा शत्रू काही लपत-छपत सावज शोधत नसतो, सगळ्यांच्या सहज नजरेस पडतो. तेव्हा ही उड्डाणे काही धोक्याची सूचना नसावीत. या उडय़ादेखील आहेत एक प्रकारचे जोखड. कळपातली सगळीच हरणे काही अशा उडय़ा मारायला धजावत नाहीत, काही निवडक हरणेच असे धाडस करतात. नाचणारे मोर, गाणारे दयाळ आपल्या प्रेयसींना खुणावत असतात, पण ही उडय़ा मारणारी हरणे आपल्या धाडसातून चित्त्यासारख्या शत्रूला संदेश देतात की आम्ही इतकी चपळ, दमदार आहोत की आम्हाला पकडायचा प्रयत्न फोल ठरेल. तू मुकाटय़ाने दुसऱ्यांच्या पाठी लाग. अशा आहेत जीवसृष्टीला नटवणाऱ्या जोखडांच्या नानाविध लीला!
*लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.

First Published on March 14, 2014 1:05 am

Web Title: amotz zahavis nature vs culture theory