प्रत्येक कल्पनेमागे कुणाचा तरी विचार असतो, ती कल्पना पुढे जायला अनेकदा वेळ लागतो व योग्य वेळही यावी लागते. आंतरराष्ट्रीय योगदिनाची कल्पना ही अशीच होती. योगदिन साजरा करावा हे स्वप्न एका परदेशी व्यक्तीने पाहिले त्यांचे नाव अमरता सूर्यानंद महाराज. ते मूळ पोर्तुगालचे योगगुरू आहेत. त्यांनी पोर्तुगालमध्ये लिस्बनला योगदिन पाळण्याची संकल्पना आधीच राबवली होती. असे असले तरी ६ डिसेंबर २०११ रोजी बंगळुरू येथे एक आंतरराष्ट्रीय योग परिषद श्री श्री रविशंकर यांनी भरवली होती, त्या वेळी योग पोर्तुगीज महासंघाच्या आंतरराष्ट्रीय योगदिन प्रस्तावाला श्री श्री रविशंकर व योगगुरू बाबा रामदेव यांनी पाठिंबा दिला होता. अमरता सूर्यानंद महाराज हे योग सांख्य संस्थेचे संस्थापक आहेत.
१९५२ मध्ये त्यांचा जन्म पोर्तुगालला झाला. वयाच्या विशीत त्यांनी हृषीकेश येथील शिवानंद आश्रमाचे कृष्णानंदजी यांच्याकडून योगाचे धडे घेतले. त्यांच्यावर योगी अरविंद, विवेकानंद, सत्यानंद, कुवलयानंद, रामकृष्ण परमहंस यांचा प्रभाव आहे. त्यांनी योगावर ‘चक्रसूत्र’ व ‘कॉस्मो जेनेसिस अँड योग-बियाँड हायड्रोजन’ ही दोन पुस्तके लिहिली. ते योगकोशाचे लेखन करीत आहेत, तसेच पतंजलीची योगसूत्रे पोर्तुगीज भाषेत रूपांतरित करीत आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरवले आहे. ते पोर्तुगीज योग महासंघाचे अध्यक्ष असून, त्यांनी २००१ मध्ये प्रथम योगदिन साजरा केला होता. गेली सात वर्षे तो पोर्तुगालमध्ये साजरा होत आहे. बंगळुरू येथील स्वामी विवेकानंद योग अनुसाधन संस्थानचे कुलगुरू एच. आर. नागेंद्र यांच्यावर सूर्यानंद यांच्या योगदिन संकल्पनेचा प्रभाव होता व त्यांनीच पंतप्रधान मोदी यांना १९८० मध्ये योगसाधना शिकवली. त्या वेळी जागतिक योगदिन साजरा करण्याची कल्पना सूर्यानंदांच्या सांगण्यावरून नागेंद्र यांनी मोदींना सांगितली.
मोदी यांनाही पंतप्रधान होताच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचा ठराव संयुक्तराष्ट्रांमध्ये संमत करून घेण्यात यश आले. सूर्यानंद यांनी पन्नास राष्ट्रीय योग कार्यक्रम केले आहेत. अनेक योगशिक्षक त्यांनी घडवले आहेत. योग हे आत्मज्ञानाचे साधन आहे असे सूर्यानंदांचे मत आहे. त्यांच्या मते मानवी कल्याणासाठी योगसाधना ही आवश्यक असून तो मानवी विकासाचाच एक भाग आहे. त्यांनी प्रगत योगसाधनेसाठी ‘तांडव’, ध्यानधारणेसाठी ‘शंकरा’ व भारतीय प्राचीन मनुष्यविकास तंत्राच्या प्रसारासाठी ‘माया’ हा नाटय़मंच, मंत्रोच्चारणासाठी ‘ओंकार’ असे समूह स्थापन केले आहेत.