हे आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या पत्नी जेन यांचं प्रांजळ आत्मकथन. पंचवीस वर्षांचा यशस्वी संसार मोडल्यानंतर लिहिलेलं. पण त्यात कुठेही आरोप-पत्त्यारोप नाहीत की आक्रस्ताळेपणा नाही. आहे ती समंजस, प्रगल्भ दृष्टी आणि समृद्धपणे जगलेल्या आयुष्याची रंगतदार हकिकत. ध्रुवांइतकं अंतर असलेल्या स्टीफनबरोबरच्या संसारात जेन दुधातल्या साखरेसारखी विरघळून गेली खरी, पण त्या दुधाला गोडी साखरेमुळेच होती. ती दुधात विरघळली तरी आपलं अस्तित्व राखून होती..
एकजण भौतिकशास्त्राचा अभ्यासक, दुसरा संगीत, भाषा या विषयांमध्ये रमणारा.
एकजण परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित करणारा, दुसरा कमालीचा सश्रद्ध.
एकाला ऑपेरा म्हणजे जीव की प्राण, तर दुसऱ्याचा बॅलेवर कमालीचा जीव..
अशी दोन माणसं एकत्र आली तर दिवसरात्र वादांचा आखाडाच उभा राहील. पण हीच दोन माणसं विशीच्या आसपासची असतात आणि मुख्य म्हणजे स्त्री-पुरुष असतात तेव्हा निसर्ग त्याचं काम करतो आणि ती ‘आपोझिट पोल अ‍ॅट्रॅक्ट्स’ या नियमाप्रमाणे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करून एकत्र येतात. म्हणूनच एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाची जोडपी पाहताना हे कसे काय एकत्र आले असतील, हा प्रश्न कुणालाही पडतो. पण हेच थेट जगविख्यात शास्त्रज्ञ- संशोधक स्टीफन हॉकिंग यांच्याबाबतीतही घडू शकतं हे वाचताना गंमत वाटल्यावाचून राहत नाही.
हे वाचायला मिळतं, ‘ट्रॅव्हलिंग टू क्षन्फिनिटी – माय लाइफ विथ स्टीफन’ या जेन हॉकिंगच्या म्हणजेच स्टीफन हॉकिंगच्या पत्नीच्या आत्मकथनात. स्टीफन हॉकिंगबद्दल खरं म्हणजे वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यांची असाधारण प्रज्ञा, त्यांनी मांडलेली स्ट्रिंग थिअरी, ‘ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक, या पुस्तकाची प्रचंड विक्री, स्टीफन यांचा मोटारन्यूरॉन म्हणजेच मज्जासंस्थेचा घातक आजार, त्यातून त्यांना आलेलं कायमचं अपंगत्व आणि त्या सगळ्यावर मात करत त्यांनी मांडलेला विश्वाच्या उत्पत्तीचं रहस्य शोधणारा सिद्धांत.. या सगळ्यामुळे स्टीफन कधीपासूनच दंतकथा बनून राहिले आहेत. त्याच्या जोडीला पंचवीस वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांनी त्यांची शुश्रूषा करणाऱ्या एलिन मेसन या नर्सबरोबर लग्न करण्यासाठी जेनला घटस्फोट दिला. त्यामुळे तर जेन आणि स्टीफनचं लग्न आणखीनच प्रकाशझोतात आलं. त्या पाश्र्वभूमीवर स्टीफनबरोबरच्या आपल्या आयुष्यावर जेननं पुस्तक लिहिलं, तेव्हा अवघ्या जगाचं त्याकडे लक्ष जाणं साहजिक होतं.
विवाहित स्त्रीचं आत्मचरित्र म्हणजे तिच्या पतीचं चरित्रच असं मानलं जातं. जेनचं आत्मचरित्रही त्याला अपवाद नाही. मुळात तिला स्टीफनबरोबरच्या आयुष्यावरच लिहायचं असल्यामुळे तिचं हे आत्मचरित्र स्टीफन हॉकिंगभोवती फिरत राहतं. स्टीफन आणि जेन यांचं लग्न झालं १९६५ साली. तेव्हा जेन होती अवघी २१ वर्षांची आणि स्टीफन तिच्याहून थोडा मोठा. दोघेही कॉलेजच्या काळातच एकमेकांच्या प्रेमात पडले. स्टीफनचा गंभीर आजार, त्याचे परिणाम यांची जेनला पूर्ण कल्पना होती. तो कधीही बरा होणार नाही, त्याला कधीही मृत्यू गाठू शकतो हे माहीत असूनही जेनने त्याच्याशी लग्न केलं. कारण त्याच्याबरोबर मिळतील तितकी वर्षे आपण पूर्णपणे आनंदात जगावी असं तिला वाटत होतं.
स्वत:चा तोलही सांभाळू न शकणाऱ्या स्टीफनबरोबर त्याचा कणा बनून उभी राहिलेली, त्याचा संसार करणारी, तीन मुलांना वाढवणारी आणि या पुस्तकातून दिसणारी जेन मोठी लोभस आहे. स्टीफन हॉकिंग हे नाव उत्तरोत्तर मोठं होत गेलं. जेन त्याच्या आजारपणाशी झगडत, त्याची सावली बनून राहिली. आपल्या नवऱ्याच्या सतत नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या शारीरिक परिस्थितीला तोंड देतानाही तिच्या स्वभावातला सकारात्मकतेचा अंकुर सतत डोकावत राहतो. हातात पैसा नसताना हे जोडपं आनंदात जगतं. कोणतीही सर्वसामान्य जोडपी करतात तशा नाना प्रकारच्या तडजोडी करतं. त्या सगळ्यात स्टीफनच्या पाठीशी ठामपणे उभी असलेली जेन, नातेवाईक, मित्रमंडळींची मदत घेत, त्यांनाही आपल्या समस्येत सामावून घेत आपलं वर्तुळ सतत वाढवत जाणारी जेन, मुलांच्या काळजीने पोखरलेली जेन, संगीत आणि भाषा या आपल्या आवडी अशा विपरीत परिस्थितीतही जोपासत डॉक्टरेट मिळवणारी जेन अशी तिची वेगवेगळी रूपं पुस्तकातून डोकावत राहतात.
या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्टय़ं आहे ते जेनचं प्रांजळ आत्मनिवेदन. तिच्या सांगण्यात कुठेही, कसलाही अभिनिवेश नाही. पंचवीस वर्षांचा संसार मोडताना अकांडतांडव नाही की स्टीफनबद्दल एका शब्दाचा अनुदार उद्गार नाही. घडलं ते असं, असं म्हणत तिने आपल्या आत्मचरित्रातून कमालीच्या तटस्थपणे आयुष्याचा वेध घेतला आहे. तिच्या लिखाणात स्टीफनसाठी केलेल्या त्यागाचा गवगवा नाही की आयुष्याचा महत्त्वाचा काळ त्याच्याबरोबर घालवून घटस्फोट झाल्यानंतर हाताशी काय लागलं याची खंत नाही. तिच्यावर स्टीफनच्या घरच्या लोकांकडून म्हणजेच तिच्या सासरच्या लोकांकडून सतत आरोप होतात, पण तेही ती ठिकठिकाणी अगदी तटस्थपणे सांगून टाकते. व्हीलचेअरवर खिळलेल्या स्टीफन हॉकिंग यांनी १९९० साली आर्थिक आणि भावनिक कारणं देत जेनला घटस्फोट देऊन त्यांना सांभाळणाऱ्या नर्सशी, एलिन मेसनशी लग्न केलं. (काही काळातच हे लग्न मोडलं ही गोष्ट वेगळी.) त्यानंतर जेननेही जोनाथन जेन नावाच्या आपल्या संगीतकार मित्राशी लग्न केलं. पण त्यानंतरही स्टीफनवरचं आपलं प्रेम ती कुठेही लपवत नाही.
जेनचा हा सगळा अकृत्रिम स्वभाव तिच्या लिखाणातून सतत डोकावत राहतो. स्त्रियांची आत्मचरित्रं ही पुरुषांच्या आत्मचरित्रापेक्षा नेहमीच वेगळी असतात, हे जेनच्या आत्मचरित्रातूनही जाणवत राहतं. त्यातला घरगुतीपणा, उबदारपणा, आयुष्यातल्या लहानसहान गोष्टींनाही महत्त्व देणं, अनेक गोष्टींचे व्याप लावून घेणं, ते सांभाळत बसणं हे सगळे स्त्रियांचे स्वभावविशेष वेगवेगळ्या प्रसंगांमधून डोकावत राहतात. नाही म्हणायला जेनने आपल्या लिखाणातून काही ठिकाणी रिकाम्या जागा सोडल्या आहेत. पण स्टीफन हॉकिंगसारख्या माणसाची पत्नी म्हणून लिखाण करताना काही जबाबदारी बाळगून लिखाण करण्याच्या प्रयत्नातून ते झालं असावं. त्यामुळे ते क्षम्यही ठरतं.
या सगळ्यातून जाताना जेनने सांगितलेली तिच्या लग्नाची वेगळी गोष्ट मात्र कोणत्याही सर्वसामान्य लग्नाइतकीच गमतीशीर आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. अगदी प्रेमात पडून लग्न करणाऱ्या जोडप्यांमध्ये असावं तेवढं दोन ध्रुवांइतकं अंतर दोघांच्या स्वभावात आहे. तरीही स्टीफनबरोबरच्या संसारात जेन दुधातल्या साखरेसारखी विरघळून गेली आणि नंतरच्या घडामोडी पाहता दुधाला गोडी साखरेमुळे होती, ती दुधात विरघळली तरी आपलं अस्तित्व राखून होती..
पंचवीस वर्षांच्या सहजीवनानंतर स्टीफन हॉकिंग यांनी विकलांग अवस्थेत असतानाही घटस्फोट घेणं, जेनने अवाक्षरही वावगं न बोलता ते स्वीकारणं या सगळ्याची संगती पाश्चिमात्य समाजातला टोकाचा व्यक्तिवाद समजून घेतला तरच लागू शकते. ती सगळी संस्कृती, विचारधाराच इतकी वेगळी आहे की, एरवी आपल्या समाजात सहजपणे करता येईल असं, विश्वाच्या निर्मितीमागचं रहस्य समजून घेऊ शकणारा पुरुष स्त्रीचं मन, तिचं समर्पण मात्र समजून घेऊ शकला नाही, असं विधान करणं धाडसाचं ठरू नये.