संमेलन मराठी साहित्याचे असले, तरी उद्घाटन आणि समारोप यांसारख्या सोहळय़ांना परभाषक साहित्यिकांना आवर्जून महत्त्वाचे स्थान देण्याची एक प्रथा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाने सुरू केली होती. यंदा चिपळुणात ती पाळली जाणार नसल्याचे दिसते. मात्र, धुळे येथे १३ रोजी ऊर्मिला पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन गुजरातचे सांस्कृतिक कार्यकर्ते व नाटककार दक्षिण बजरंगे  यांच्या हस्ते होते आहे! ‘बुधन थिएटर’ या संस्थेचे दक्षिण हे एक संस्थापक.. ही संस्था छारा या भटक्या-विमुक्त आणि एकेकाळी ‘गुन्हेगार’ ठरवल्या गेलेल्या जमातीतील तरुणांनी उभारली.  छारा व तत्सम भटक्यांवर झालेला अन्याय नाटकांतून मांडण्यासाठी पथनाटय़-मुक्तनाटय़ या प्रकाराचा अभ्यास दक्षिण यांनी केला. आत्मकथन किंवा रडगाणे या आकृतिबंधात कधीही न फसणाऱ्या रचना त्यांनी या नाटय़प्रकारातून मांडल्या. त्यांचे पहिले नाटक होते, पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी केवळ संशयावरून जिवे मारलेल्या बुधन सबर याची कहाणी सांगणारे. बोलीभाषांतील प्रतिभेचा अभ्यास व संग्रहण करणारे गणेश देवी (बडोदे) आणि सामाजिक व राजकीय चळवळींच्या अनेक छटा निरखणाऱ्या साहित्यिक महाश्वेतादेवी (कोलकाता) यांनी या ‘बुधन बोलता है’ चे कौतुक केले आणि तोवर निनावीच असलेल्या छारा थिएटर ग्रूपचे नावही ‘बुधन थिएटर्स’ असे झाले. महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त पिन्या हरी काळे याच्या कहाणीवर आधारित ‘एन्काउंटर’, दंगलकाळ आणि दंगलीची मानसिकता कशी साऱ्यांनाच वेठीला धरते याचे चित्रण करणारे ‘मजहब नही सिखाता.. ?’ तसेच पारंपरिक वस्त्या आणि शहरांचा वाढता विस्तार यांतील संघर्ष चितारणारे ‘बुलडोझर’ ही त्यांची नाटके, ‘बूधन बोलता है’ या नावाने ग्रथित झाली आहेत.ही नाटके म्हणजे ‘अहिंसात्मक लढाईची साधने’ आहेत, असे दक्षिण मानतात. अहमदाबाद शहराच्या वेशीबाहेर ‘छारा नगर वस्ती’ आहे., हे छारा नगर गुन्हेगार जमातींचं वसतिस्थान म्हणून ओळखलं जाण्याऐवजी सांस्कृतिक केंद्र व्हावं, यासाठी आम्हा साऱ्यांचे प्रयत्न आहेत’ असे दक्षिण सांगतात.