मद्रास वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकी सांभाळून त्या स्वत:ची ‘पॅ्रक्टिस’ करू शकल्या असत्या. तसे न करता महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत त्यांनी १९८०च्या दशकात, भारतात ‘एचआयव्ही’ विषाणूचा आणि ‘एड्स’ रोगसमूहाचा प्रादुर्भाव कुठे आढळतो का, याचे संशोधन सुरू केले. त्या वेळी असे करणे हा सरकारी पशाचा अपव्यय समजला गेला नसता तरच नवल. पण डॉ. सुनीती सॉलोमन यांनी संशोधन सुरू ठेवले आणि त्यातून, भारतातील पहिल्या एचआयव्ही-बाधित रुग्णांची नोंद अधिकृतपणे झाली. हे साल होते १९८६. तोवर एचआयव्हीची लागण केवळ आफ्रिकेत आणि फार तर पाश्चात्त्य देशांतील समलैंगिक संग करणाऱ्या पुरुषांना होते, असे आपल्याकडे समजले जाई. पण डॉ. सॉलोमन यांच्या संशोधनातून, देहविक्रय करणाऱ्या भारतीय महिला या विषाणूची शिकार होताहेत, हे उघड झाले.
त्या एचआयव्हीबाधित पाच जणींपकी एक होती अवघ्या १३ वर्षांची. हिने आता आयुष्य कसे काढायचे? काळजी काय घ्यायची? भारतात या बाधेचे गांभीर्यच फार कुणाला लक्षात आलेले नसतानाच्या त्या काळात, या प्रश्नांनाही आपणच उत्तरे द्यायला हवीत, हे डॉ. सॉलोमन यांनी ठरवले. पुढल्या पाच-सहा वर्षांत अनेक जणी सापडल्या. पुरुषदेखील बाधित आहेत, हे उघड होऊ लागले .
यातूनच १९९३ साली ‘वाय. आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन’ म्हणजेच ‘वायआरजी- केअर’ या संस्थेची स्थापन चेन्नईत झाली. फोर्ड फाऊंडेशन आदी मोठय़ा देणगीदारांप्रमाणेच बडय़ा औषध कंपन्यांचेही अर्थसाह्य़ या संस्थेस मिळते. हा सामाजिक कार्याचा डोलारा उभा करतानाही, संशोधनावरील त्यांचा भर कायम राहिला. भारतातील एचआयव्ही उपचारांच्या प्रणेत्या असा डॉ. सुनीती सॉलोमन यांचा गौरवोल्लेख होत राहिला आणि राहील, तो या कार्यामुळे. सुनीती यांचे निधन मंगळवारी सकाळी झाले, तरी त्यांनी या केंद्राच्या उभारणीसाठी दाखविलेली जिद्द प्रेरणादायी आहे. मध्यमवर्गीय संस्कार जपणाऱ्या मराठी- पण चेन्नईकर- कुटुंबात सुनीती यांचा जन्म ७० वर्षांपूर्वी झाला. माहेरच्या त्या गायतोंडे. वडिलांचे नावच त्यांनी आपल्या संशोधन व उपचार केंद्राला दिले. पती डॉ. व्हिक्टर सॉलोमन यांनी सुनीती यांना साथ दिली, पण एरवी हृद्रोगतज्ज्ञ म्हणून व्यग्र दिनक्रम असलेल्या डॉ. व्हिक्टर यांचे निधन २००६ साली झाले. एड्स व एचआयव्हीचे आव्हान आता कमी झालेले असतानाही विद्यमान रुग्णांना व बाधितांना चेन्नईचे गायतोंडे केंद्र आधार देत राहील.