मुंबईच्या क्रिकेटमध्ये अनेक बंधू, पिता-पुत्र यांच्या जोडय़ा गाजल्या. त्यापैकीच माधव आणि अरविंद हे आपटे बंधू. माधव आणि नारायण मंत्री, अतुल आणि राहुल मंकड, एकनाथ आणि अनंत सोलकर, सुभाष आणि बाळू गुप्ते, अजित आणि अशोक वाडेकर, गोपाळ आणि गोविंद कोळी, रमाकांत आणि सुरेश देसाई अशी ही यादी खूप लांबते. परंतु माधव आणि अरविंदचा स्थानिक क्रिकेटमधील ठसा लक्षात राहणारा.
तसे ते दोघेही सलामीचे फलंदाज. परंतु अरविंद अधिक आक्रमक. अरविंद हा आपल्यापेक्षा अधिक चांगला फलंदाज हे माधव आपटेही मान्य करायचे. परंतु तशी दोघांचीही आंतरराष्ट्रीय कारकीर्द अल्प ठरली. माधव हे सात कसोटी सामने खेळले तर अरविंद लीड्स येथे इंग्लंडविरुद्धचा एकमेव सामना खेळले. १९५९मध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दत्ताजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गेला होता. त्या वेळी राखीव सलामीवीर म्हणून अरविंद यांनी संघात स्थान मिळवले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात नरी कॉण्ट्रॅक्टर जखमी झाल्यामुळे अरविंद यांना पंकज रॉयसोबत सलामीला उतरण्याची संधी मिळाली. परंतु अ‍ॅलन मोस या इंग्लिश गोलंदाजाने त्यांना दोन्ही डावांत अनुक्रमे ८ आणि ७ धावांवर बाद करीत अपयशी ठरवले. अरविंद यांच्यासाठी १९५८-५९चा क्रिकेट हंगाम फलदायी ठरला होता. गुजरातविरुद्ध १४१ आणि बडोद्याविरुद्ध १४९ अशा दमदार शतकांसह अरविंद यांनी ७०.५०च्या सरासरीने ५६४ धावा केल्या होत्या. त्यामुळेच इंग्लंड दौऱ्यावर त्यांची निवड झाली होती. ते मुंबईकडून १४ सामने खेळले. परंतु त्या वेळी मुंबईच्या संघात स्थान मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा होती. त्यामुळे त्यांनी राजस्थानचा आश्रय घेतला. मग १९७०-७१ साली निवृत्ती पत्करेपर्यंत त्यांनी राजस्थानचे प्रतिनिधित्व केले. एकंदर ५८ सामन्यांत सहा शतके आणि १५ अर्धशतकांसह २७८२ धावा ही त्यांची प्रथमश्रेणी क्रिकेटमधील धावांची पुंजी. इंग्लंडच्या उन्हाळी हंगामाची या दोन्ही बंधूंना भुरळ होती.
टेक्स्टाइलच्या कौटुंबिक व्यवसायातून वेळ काढत हे दोन बंधू इंग्लंडमध्ये हमखास जायचे. लॉर्ड्सचा कसोटी सामना आणि विम्बल्डन यांचा आस्वाद घेण्याची त्यांची परंपरा गेली दोन दशके अबाधित होती. तसे हे संपूर्ण आपटे कुटुंबीय क्रीडाप्रेमी. माधव यांचा मुलगा वामन भारताचा यशस्वी स्क्वॉशपटू तर मुलगी बॅडमिंटनपटू. त्यामुळे या कुटुंबाला मेरिलिबोन क्रिकेट क्लबचे (एमसीसी) सदस्य लाभलेले. याचप्रमाणे आपटे कुटुंबीयांचे लॉर्ड्सच्या शेजारीच एक घरसुद्धा आहे. भारत-इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या इंग्लंडमध्ये सुरू असतानाच अरविंद आपटे यांनी जगाचा निरोप घेतला आहे.