माणसं जगतात, रोजच्या रगाडय़ानं पिचूनसुद्धा जगतात, जगण्याचा आनंद मिळवतात.. तेव्हा आपल्या हाताबाहेरची एक व्यवस्था आपलं वस्तूकरण करते आहे, हे या माणसांना लक्षात येत असेल का?  या वस्तूकरणाची जणू ‘स्मारकं’ ठरणारी शिल्पं सन १९७० ते १९९० मध्ये उभारली गेली होती..

वृत्तछायाचित्रकारांनी- म्हणजे फोटोजर्नालिस्टांनी टिपलेली सर्वसामान्य माणसांची छायाचित्रं अनेकदा पाहून आपल्या अंगवळणी पडली आहेत. दिवाळी आली की पणत्या किंवा होळी आली की रंग-पिचकाऱ्या खरेदी करणाऱ्या आई-मुलाचा फोटो,  घामाची राजधानी अशी ख्याती असलेल्या मुंबईत हिवाळय़ात का होईना पण लोकांनी स्वेटरबिटर चढवले तर तापमानघटीच्या या अनपेक्षित परिणामाचा फोटो.. अशा फोटोत सामान्य, शहरीच चेहरे- काहीही ‘स्पेशल’ नसलेले लोक दिसतात. पंधरा ऑगस्टच्या झेंडेविक्रेत्या गरीब मुलाच्या डोळय़ांत जी आगळी चमक आपल्याला दिसते, तसंही काही या फोटोंमध्ये नसतं.. पण तरीही ते दुसऱ्याला सांगण्यासारखे फोटो असतात, त्या फोटोत एक साधीशी का होईना, ‘बातमी’ असते. सोबतचा जो फोटो (एक स्त्री पर्समधून काहीतरी शोधून समोरच्या तरुणाला काढून देतेय, मागे एक मध्यमवयीन पुरुष मोबाइलवर बोलतोय) आहे, तो गूगलवर ‘इंडिया, सिटी, पीपल, फोटोजर्नालिझम’ असे क्ल्यू देऊन मिळालाय आणि मुख्य म्हणजे तो आपल्या आजच्या विषयामध्ये आणि फोटोजर्नालिझममध्ये फरक काय, हे कळावं यासाठी चांगला उपयोगी पडणारा फोटो आहे. म्हणून तो इथं आहे. छायाचित्रकाराचं नाव हिमांशु खगटा (ते फोटोवरच वॉटरमार्क पद्धतीनं लिहिलंय)- हा फोटो इतक्या साध्या माणसांच्या इतक्या साध्या कृती कॅमेराबद्ध करणारा- त्या साध्या कृतींकडे दुरून किंवा अंतर राखूनच पाहिल्यावर या कृती हास्यास्पद वाटतात- उदाहरणार्थ तो मोबाइलबोल्या माणूस कसा उभा आहे वगैरे. आणि याच कृतींकडे कलाप्रेक्षक म्हणून जरा सहानुभावानं पाहिलं तर भारतीय मध्यमवर्गाचं आजचं रूप कसं टिपलंय हे आपण पाहू लागतो. पण हिमांशू खगटा नावाच्या त्या फोटोग्राफरनं हा फोटो ‘फोटोजर्नालिझम’या विभागात मोजला, याचं कारण- हा श्रीनगर येथील एका बागेत टिपलेला फोटो आहे. इथं पर्यटक कसे गर्दी करताहेत, हे त्याला प्रामुख्यानं दाखवायचंय. ही पर्यटकांची गर्दी मध्यमवर्गीयच असणार, हा पुढला भाग. ओघानं आलेला. आपल्या वर्तमानपत्रांमधल्या फोटोंतसुद्धा होळीचे रंग वा दिवाळीची खरेदी करणारी आई या फोटोचा हेतू ‘खरेदीची लगबग वाढली आहे’ एवढंच दाखवण्याचा असतो. ते व्यक्तिचित्र नसतं.
याउलट, इथे जी परकीय- पाश्चात्य माणसांची चित्रं दिसताहेत, ते प्रत्यक्षात पुतळे आहेत आणि व्यक्तिचित्र म्हणूनच केलेले आहेत. फोटोच काढलाय असं वाटेल- फोटोग्राफीसारखी एक पोज या माणसांमध्ये आपसूक आहे, परंतु हे पुतळेच आहेत आणि तेही चांगले पूर्णाकृती! आणखी माहिती अशी की, हे पुतळे थेट माणसांच्या अंगावरच रबराचा लेप लावून, त्यातून साचा घडवून त्या साच्यातून काढलेले आहेत.
म्हणजे एक प्रकारे, ‘क्षण गोठवून ठेवणारा’ हा त्रिमिती फोटोचाच (वेळखाऊ आणि तशा जुन्याच तंत्राचा) प्रकार आहे. रबरानं किंवा प्लास्टरनं सुद्धा थेट शरीराचाच – किंवा कश्शाचाही साचा घेता येतो आणि तंतोतंत तशी वस्तू घडवता येते हे तंत्र जुनं असलं तरी ‘निषिद्ध’ मानलं जायचं. साधारण १९०० सालच्या आसपास आपला उत्तुंग प्रतिभेचा आणि ‘द किस’ सारखी छान गुळगुळीत, अभिजात दिसणारी शिल्पं घडवू शकत असतानाही ‘बाल्झाक’च्या शिल्पात बराच भाग मुद्दाम खडबडीत सोडण्याचा प्रयोग करण्याची हिंमत शिल्पकलेच्या इतिहासात प्रथमच करणारा ऑगुस्त रोदँ याच्यावर ‘हा माणसावरच साचा करतो’ असा आरोप त्याचे हितशत्रू करणार होते. याचा सुगावा लागल्यावर रोदँनं सर्व शिल्पं पूर्णाकृतीपेक्षा मोठीच करायला सुरुवात केली.. अशी एक गोष्ट इतिहासात सांगितली जाते. मुद्दा हा की, पूर्णाकृती तंतोतंत पुतळय़ासारखी शरीरावरून साचा काढणं हे कमअस्सल कलेचं लक्षण मानलं जातं, हे अगदी सर्वश्रुत असलं पाहिजे!
डय़ुआन हान्सन (१९२५- १९९६) या अमेरिकी शिल्पकारानं या निषिद्ध, कमअस्सल मानल्या जाणाऱ्या तंत्रानंच काम केलं. एकदा का शरीरावरनं साचा झाला, की पुढलं काम अगदी बारकाईनं, मेहनतपूर्वक आणि तंत्राचा उत्कृष्ट वापर करत  करायचं, ही या हान्सनची शिस्त. त्याच्या शिल्पांतल्या माणसांचे केस (पोटऱ्या वा हातांवरले सुद्धा) खरे वाटत, त्वचेवरली रंध्रं, सुरकुत्या, खरेखुरे कपडे, वस्तू.. हे सारं अगदी हुबेहूब माणूसच उभा आहे असा भास निर्माण करणारं होतं. अमेरिकेत १९६०च्या दशकात ‘फोटोरिआलिझम’ नावाची- तंतोतंत फोटोसारखंच रंगकाम करणारी चित्रपद्धत फोफावली होती आणि आपला हान्सन १९६५ नंतर काम करू लागला, त्या चित्रपद्धतीचा थोडाफार परिणाम त्याच्यावर झाला म्हणून त्यालाही ‘फोटोरिआलिस्ट शिल्पकार’ ठरवण्याचा उद्योग अनेकांनी केला.
इथे टिपिकल कलेतिहासकार आणि कलेकडे आपापलं भान जागं ठेवून पाहणारे, यांच्यातला फरक दिसेल : हान्सन जे करत होता, ते कोणत्या प्रेरणांतून करत होता? फक्त फोटोरिआलिझम होता का तो? फोटोरिआलिस्टांनी रंगकामाचं आव्हान अधिक वाढेल, अशी अमेरिकी दृश्यं फोटोसाठी निवडली आणि ते फोटोच मोठ्ठे रंगवले. हान्सननं जी अमेरिकी माणसं निवडली, ती त्यानं अगदी निराळय़ा प्रेरणेतून निवडली होती. पिचलेली, थकलेली, तरीही समरसून जगणारी, मध्यमवर्गीय माणसं आहेत ही सगळी! पुढे मध्यमवर्गीय माणूस हा विषय हान्सननं जेव्हा कधीकधी बाजूला ठेवला, तेव्हा तो फोटोरिआलिस्ट कसा नाही, हेच त्यानं केलेल्या न्यूड्समधून वा अन्य शिल्पांतून दिसलं होतं.
मग हान्सनला काय म्हणायचं आपण? इथं रिचर्ड हॅमिल्टनचं ते ‘जस्ट व्हॉट इज इट दॅट मेक्स टुडेज होम्स सो ब्यूटिफुल, सो डिफरंट?’ नावाचं कोलाज (चिकटचित्र) आठवून पाहा.. त्यात हॅमिल्टन मध्यमवर्गीय जीवनाच्या वस्तूकरणाची, जाहिराती आणि तत्कालीन हॉलिवुड यांची जगं नेहमीच्या- रोज‘मर्रा’-  मध्यमवर्गीय जगण्यावर कसा उगाचच्या उगाच परिणाम घडवतात याचं दर्शन घडत होतं. डय़ुआन हान्सननं हे सारे परिणाम झेलूनही ‘जगणाऱ्या’ लोकांची शिल्पं घडवली. एका वाक्यात सांगायचं तर, त्याची ही शिल्पं दिसतात अगदी ‘फोटोरिआलिझम’ सारखी, पण त्यांचं खरं कूळ ‘पॉप आर्ट’सारखं आहे.
शैली फक्त दिसण्य़ावर वा तंत्रावर अवलंबून नसते, तर चित्रकाराच्या विचाराची जातकुळी ही त्याच्या शैली घडवत असते (आणि विचाराची जातकुळी ज्यांच्यात शोधूनही सापडत नाही, ते सारे चित्रकार शैलीचं नुसतं ढोंग करत असतात) हा धडा आपण केव्हातरी शिकणारच असू, तर त्याच्यासाठी आपल्याला डय़ुआन हान्सन फार उपयोगी पडतो.
हान्सन मध्यमवर्गीय माणसांना विनंती करून स्वत:च्या स्टुडिओत बोलवायचा. त्यांना पोज देऊन, त्यांचे साचे घ्यायचा. मग काम सुरू. या सगळय़ात एक नाटकीपणा नाही का, असा प्रश्न कुणीही आता (म्हणजे हान्सननं हे सुरू केल्यानंतर ४० वर्षांनी आणि तो वारल्यावर जवळपास १६ वर्षांनी) विचारू शकतं. हा प्रश्न चांगला आहेच, पण ‘कसं गप्प केलं’ या पद्धतीचं समाधान न मिळवता खरोखरच त्याचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी पुन्हा या ‘पोज दिलेल्या’ माणसांच्या चेहऱ्यांकडे पाहायला हवं.. एक शक्यता अशी आहे की, या माणसांनी जेव्हा पोज दिली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर हे हरलेले, पिचलेले, जगणं एन्जॉय करण्याची शिक्षाच नीटपणानं भोगणारे भाव नसतीलच! ते नंतर हान्सननं घुसडले असतील..
.. पण मग अशा शरीरयष्टीच्या, असे कपडे घातलेल्या, असे चेहरे असलेल्या, अमुक ठिकाणी सहसा दिसू शकतात अशा.. अमुक लकबी असलेल्या वगैरे.. या माणसांच्या चेहऱ्यांवर ते भाव असू शकणं- हे आपल्याला खरं वाटतंय ना! त्याचं काय?
माणसाचं हल्लीच्या काळानं नेमकं काय केलंय, हे हान्सनला कळलं होतं.
त्याला माणूस कळला, तो त्यानं आपल्याला दाखवला. या माणसाचं वस्तूकरण झालंय, ‘हे असं जगायचंस तू’ असं जणूकाही त्याला कुणी भलतंच अमानवी (जाहिराती- त्यामागल्या आर्थिक व्यवस्था, त्या तशाच असू देणारे त्याहून मोठे राजकीय-आर्थिक हितसंबंध) सक्तीनं सांगतंय, हे हान्सनची १९७० ते १९९० मधली अमेरिकी (म्हणजे एकप्रकारे, जागतिकीकरणोत्तर आजतागायतच्या काळातली शहरी भारतीय) माणसं पाहून कळतंय.
या वस्तूकरणाचंच पूर्णाकृती पुतळय़ांद्वारे ‘स्मारक’ डय़ुआन हान्सन या शिल्पकारानं केलं होतं जणू.