कोणतीही कंपनी आणि सामाजिक कार्य म्हटले की सामाजिक दायित्व अर्थात ‘सीएसआर’ हा शब्द हमखास उच्चारला जातो. कंपन्या ‘सीएसआर अ‍ॅक्टिव्हिटी’वर किती भर देतात, नफ्यातील किती प्रमाण अशा उपक्रमांवर खर्च होते, याची आकडेवारी मग माध्यमांकडूनही तपासली जाते. मात्र उद्योगपती आणि खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ताही असे समीकरण म्हणजे वीरेन शाह!
आता सामाजिक कार्य, उद्योग असे शब्द आले म्हणजे राजकीय पक्षाशी थेट संबंध येणे तसे विरळच. पण याच सामाजिक कार्याच्या झपाटलेपणामुळे ते भाजपशी जोडले गेले. राजकीय कारकीर्दीमुळे त्यांचा संपर्क गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांइतकाच महाराष्ट्राशीही आला. महाराष्ट्रातील उद्योग शेजारच्या गुजरात राज्यात स्थलांतरित होण्याची चर्चा जोरात सुरू  होण्यापूर्वी महाराष्ट्राला त्यांनी एक आघाडीचा स्टील निर्मिती उद्योग समूह दिला. कळव्याची प्रसिद्ध म्हणून ओळखले जाणाऱ्या मुकंद आयर्न अँड स्टील लिमिटेड या कंपनीचे वीरेन जीवनलाल शाह हे १९७२ पासून तब्बल २७ वर्षे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहिले. १२ मे १९२६ रोजी त्यावेळच्या कलकत्त्याचा जन्म असणाऱ्या वीरेन यांनी पदवी शिक्षण मात्र मुंबईतून घेतले होते. १९६७ ते १९७० मध्ये ते लोकसभेचे खासदार होते. तेव्हा गुजरातच्या जुनागढ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. १९७५ ते १९८१ आणि १९९० ते १९९६ दरम्यान ते राज्यसभेचे सदस्यही बनले. पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून १९९९ ते २००४ दरम्यान त्यांनी घटनात्मक पदही भूषविले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जमनालाल बजाज यांचे मित्रत्व प्रसिद्ध आहे. तर जमनालाल बजाज यांच्याशी असलेली वीरेन यांचे वडील जीवनलाल यांची मैत्रीही त्या काळात उल्लेखली जायची. मुकंद ही कंपनी शाह यांनी स्थापन केलेली कंपनी नव्हती, तो वडिलोपार्जित उद्योगही नव्हता. म. गांधी यांच्याकडे मुकंदलाल अगरवाल हे अर्थविवंचनेत असताना आले होते. तेव्हा गांधीजींनी शाह यांच्याकडे शब्द टाकला. तो शिरसावंद्य मानून वीरेन शाह यांनी अगरवाल यांच्याकडून मुकंद आयर्न आणि स्टील वर्क्‍स खरेदी केली.. आणि नाव कायम ठेवून ही कंपनी शाह यांनी ऊर्जितावस्थेस नेली!