‘आर्ट गॅलरीच्या बाहेरही कला असतेच’ ही आपली- म्हणजे महाराष्ट्रवासींची भावना असेल किंवा काहींना तसं वाटत नसेलही, पण आजकाल जगभर काही जण म्हणू लागले आहेत की, कला फक्त गॅलरीत नसते. कलेचा इतिहास काहीही असेल, पण लोकांच्या संस्कृतीकडे पाहिलं पाहिजे, पण लोकांमधून आलेल्या दृश्य संस्कृतीला मानणारी कलासुद्धा गॅलरीच्या चार भिंतींत दिसतेच.. मग?
‘कला काय फक्त गॅलरीतच असते का?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपण आपलाच विचार करू. रांगोळीची प्रदर्शनं, गणपती उत्सवातली अगदी कल्पक सजावट, स्थानिक पातळीवरल्या चित्रकला स्पर्धानंतर भरणारी प्रदर्शनं, या सर्वातून अनेक महाराष्ट्रवासींप्रमाणे आपल्यालाही दृश्यकला बघण्याचा अनुभव मिळतच असतो. कलेनं ‘संदेश दिला’ की ती समाजोपयोगी ठरते, असा एक समज आपल्या महाराष्ट्रात रूढ होता. त्यामुळे रांगोळीतून थोर पुरुषांच्या चरित्रांमधले प्रेरक प्रसंग असत. गणेशोत्सवात तर अगदी आत्ता-आत्तापर्यंत सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटी पाहायला मिळत. या सर्वाच्या पुढे मग पक्षिनिरीक्षण, निसर्गनिरीक्षण असे छंद.. ‘निरीक्षणा’तला पाहण्याचा भाग महाराष्ट्रानं मनापासून आपलासा केला. म्हणजे इथं आपला निष्कर्ष असा की, पाहण्याची सवय महाराष्ट्रीय मंडळींना नक्की आहे. तरीसुद्धा आपण चित्रकार लोकांची चित्रप्रदर्शनं बघणं का टाळतो?
कुणी म्हणेल, ‘टाळतो’ हा निव्वळ आरोप आहे. चांगल्या चित्रकाराची चांगली चित्रं पाहायची संधी मिळाली, तर आम्ही टाळाटाळ करण्याचा प्रश्नच कुठे येतो?
हो. बरोबर, पण चांगलं म्हणजे काय?
तर, चांगलं म्हणजे आपल्या रांगोळ्या, आपल्या गणेशोत्सव वा अन्य उत्सवांमधले देखावे यांमधून किंवा आपण नीट पाहिलेल्या चांगल्या जाहिराती किंवा आणखी कशाहीमधून ‘चांगली कला’ आणि ‘चांगली कलाकारी’ याबद्दल जी एक समज आपली प्रत्येकाची झालेली असते, त्या समजेला साजेसं ते चांगलं.
म्हणजेच ही ‘चांगल्या कले’ची व्यक्तिसापेक्ष व्याख्या त्याच्या थेट जगण्यातूनच आलेली आहे. काही चित्रकार, कला-इतिहासकार, अभ्यासक यांनी ‘सामान्य माणसांची कलाजाणीव विकसित नाही’ वगैरे कितीही म्हटलं, तरी ते सरसकट कुणीही मान्य करत नाही.
अमान्यच केलं पाहिजे! आमची जाणकारी काढणाऱ्यांचीच जाणकारी संकुचित, असं उलटं डिवचलंसुद्धा पाहिजे.
मग ते- म्हणजे अभ्यासक वगैरे- जागे होतील आणि म्हणतील, ‘होय. आमचीच जाणकारी संकुचित, कारण आम्ही ग्रीक-रोमन कलेपासून ते १९६० च्या दशकापर्यंत जी काही कला राजाश्रयानं किंवा धनिकांच्या आश्रयानं घडली आणि वाढली, तिचाच अभ्यास करून तिच्याच विकासाबद्दल निष्कर्ष काढले. त्यालाच कलेचा ‘खरा’ इतिहास मानलं.
ही अशी कबुली देणारे चिक्कार जण सध्या आहेत. ते आता ‘कलेचा इतिहास’ न मानता ‘दम्ृश्यसंस्कृती’ म्हणजेच इंग्रजीत ‘व्हिज्युअल कल्चर’चे अभ्यासक झाले आहेत.
याचा राग कलेच्या इतिहासवाल्या काही कर्मठांना येतो. त्यांचं म्हणणं जरा कठीण आहे, क्लिष्ट आहे, पण आपण तेही ऐकू.. त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की, कला ही मानवी जाणिवांचाच आविष्कार करते हे त्यांनाही मान्य आहेच, पण इतिहास हे मानवी जीवनाचं वस्त्रगाळ रूप आहे असं ते मानतात. त्यामुळे आजची संस्कृती अशी का आहे आणि सांस्कृतिक प्रगती असं कशाला म्हणावं, याचं मार्गदर्शन कुणालाही इतिहासातून मिळू शकतं, असंही ते मानतात. हे छान वाटतं, पण इथपासून पुढे मात्र ते लोक हेकेखोर वाटू लागतात. म्हणून ते कर्मठ.
कलेचा इतिहास निराळ्या प्रकारेही अभ्यासता येतो. तो निराळा प्रकार कमी शब्दांत असा सांगता येईल की, आधी कला घडते, मगच इतिहासवाले पुढे येतात.. असंच असतं की नाही? म्हणून कलाकृतीनं त्या-त्या वेळी ‘इतिहास घडवला’ की नाही, हे इतिहास घडल्यावरच लक्षात येतं! दुसरा भलताच मुद्दा असा की, इतिहासच जर पैशाच्या किंवा सत्तेच्या बळावर घडवला जाऊ शकत असेल, तर कलेचा इतिहास हासुद्धा ज्या कलेला सत्तेचं किंवा पैशाचं पाठबळ होतं, त्याच कलेचा आहे की काय?
आपले एक माधवराव सातवळेकर नावाचे गुणी चित्रकार होते. कलानगरात राहायचे. त्यांनी १९६६ च्या ‘ललित’च्या दिवाळी अंकात असा एक लेख लिहिला होता की, पिकासो-बिकासो सगळे झूठच वाटावेत तो वाचल्यावर! त्या लेखात माधवरावांचा मुद्दा असा होता की, हे सगळे उगाच गाजवले गेलेले चित्रकार आहेत. बंडखोरी वगैरे थोतांड रचून त्याचा बडिवार माजवणं, ही या खोटय़ा गाजवणुकीसाठी योजली गेलेली निव्वळ एक क्ऌप्ती आहे.
ही अशी मतं मांडणाऱ्या माधवरावांनी आपल्या लिखाणातूनच नव्हे, तर जगण्यातूनही कलेचा इतिहास आणि संस्कृती याबद्दलची जी समज जपली होती ती अशी की, कलेचा खरा इतिहास हा तंत्रकौशल्याच्या बळावर कल्पनेची नवी-नवी शिखरं पादाक्रांत करणाऱ्या चित्रकारांनी रचला आहे. त्या शिखरांच्या पायावर कलेची आणि जगण्याचीही संस्कृती उभी राहते. माधवरावांचं हे मत आजदेखील काही चित्रकारांना मान्य होईल, असंच आहे.
पण प्रश्न असा येतो की, आपल्यापर्यंत माधवराव सातवळेकरांचा हा वाचायला इतका छान वाटणारा कलाविचारसुद्धा कसा काय पोहोचलेला नसतो?
याचं उत्तर माधवराव आणि त्यांच्यासकट अनेक थोर चित्रकारांची क्षमा मागून मगच मनातल्या मनात शोधून बघायचं. शोधताना कदाचित गोंधळ होईल, पण त्या गोंधळातूनही आपणा सर्वाच्या असं लक्षात येईल की, या  चित्रकारांनी कलेची म्हणून एक निराळीच संस्कृती असते, असं काही तरी बहुधा मानलं होतं.
असू देत. जे आज हयात नाहीत, त्यांची आणखी क्षमा मागावी लागेल अशी वेळ आपल्यावर येऊच न देण्यात शहाणपणा असतो. माधवरावांनी जो विचार केला आणि त्यातून आपल्याला जे सापडलं, त्यातून एक मात्र नक्की दिसतंय की, कलेची संस्कृती निराळीच हे म्हणणं मान्य केल्यावर काही प्रेक्षक कलेपासून बाजूला पडतात. त्यांना चित्र छान दिसतंय असं वाटतं, पण कलाकार जगण्याचा विचार कसा करतो हे कुतूहल शमत नाही. मग या कलेला ‘आविष्कार’ म्हणायचं का, असा प्रश्न काही जणांना पडतो. बाकीचे तर सरळ तुटतातच.   
हे तुटलेपण झुगारण्यासाठी काही अत्रंग म्हणावे तसे प्रकार आजच्या भारतीय चित्रकारांनी केलेत. यापैकी सुबोध गुप्ता हा एक बिहारी (असं किमान एकदा तरी स्वत:च्या चित्रातच स्वत:ला म्हणवून घेणारा) चित्रकार खूप नावाजला गेला आहे वगैरे.. पण त्याची ही जी कलाकृती आहे ती आपल्या कामाची आहे. शेणाच्या गोवऱ्या आणि राख यांचं घरासारखं रचितशिल्प (स्कल्प्चरल इन्स्टॉलेशन) करून त्यानं गॅलरीत मांडलं. शेणाचा वास येऊ नये म्हणून प्रक्रिया वगैरे केली. गोवऱ्या नीटसपणे मांडण्याची ‘कला’ भारतीय शेतकऱ्यांमध्ये आहेच.. जगण्यातल्या छोटय़ा छोटय़ा कृती नीट मन लावून आणि हाती असलेली तंत्रं वापरून करणं, यातून भारतीय कृषिसंस्कृतीची दृश्य-जाणीव विकसित झाली आहे.
या सहज (शेतकऱ्याच्या जगण्याबरोबर जन्मलेल्या) दृश्यसंस्कृतीवर खेडोपाडी पहिला घाला जर कुणी घातला असेल, तर तो सरकारनं. शाळा, आरोग्यकेंद्रं, रेशन दुकान, पोष्टं हे सारं उपयुक्तच होतं, पण त्याखेरीज गावात वाट्टेल तिथे ‘देवीचा रोगी कळवा’ काय, ‘पाणी गाळा नारू टाळा’ काय.. घोषणा लिहून-लिहून जनजागृतीचं समाधान मिळवलं सरकारी यंत्रणांनी.
मग केव्हा तरी, एक चिंतन उपाध्याय नावाचा बडोद्यात शिकलेला नि कमवायला मुंबईत आलेला चित्रकार राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्य़ातल्या त्याच्या पर्तापूर गावच्या ओसाड निर्जळ विहिरीत उतरला. त्याच्यासोबत होत्या साखरेच्या वडय़ा. या वडय़ा वापरून त्यानं भर उन्हाळय़ात, ‘अकाल’ असा शब्द त्या चौकोनी विहिरीत लिहिला. तेव्हा तिथं असणाऱ्या कुणाला काय वाटलं याची माहिती ‘संदर्भआर्ट डॉट कॉम’ या वेबसाइटवर नाही सापडणार, पण चिंतनशी बोललात तर तो सांगतो, ‘हा शब्द विरघळून जावा’ असंच सर्वाना वाटलं. चिंतन उपाध्यायची ही कृती म्हणजे कलाकृती होती की नाही, हे तुमचं तुम्ही ठरवालच, पण तिचा विचार करणं उपयोगाचं आहे.
ही कलाकृती आता त्या विहिरीत नसावी, पण कुणा तरी कलाकारानं आपल्याला आपली भीषण वास्तव परिस्थिती दाखवतानाच, आपल्यासाठी मनोमन सदिच्छाही व्यक्त केली होती, याची आठवण पर्तापूर गावातल्या काही जणांना आज दहाएक वर्षांनीही नक्की असेल. आर्ट गॅलरी ही नेहमीच कोरडी विहीर असते, एवढं लक्षात ठेवूया.