अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भावार्थ रामायणा’मध्ये ‘बालकांडा’च्या ११व्या अध्यायात एक नितांत गोड प्रसंग शब्दबद्ध केलेला आहे नाथरायांनी. जितका मधुर तितकाच मननीय आणि उद्बोधक. वेदाध्ययनासारखे ग्रांथिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किशोरवयीन राम-लक्ष्मणांना राजा दशरथ व्यावहारिक जगाचा प्रत्यक्षानुभव घेण्यासाठी देशांतरास धाडतात. लोकरहाटीशी थेट परिचय घडून येण्याचे ते पर्व उलगडल्यानंतर दोन्ही बंधू परततात अयोध्येमध्ये. दरम्यानच्या काळात, या उभय दशरथपुत्रांची गाजती-गर्जती कीर्ती ऐकून त्यांची भेट घेण्यास ऋषिवर्य विश्वामित्र येतात. विश्वामित्रांच्या मुखातून प्रसंगवशात, राम-लक्ष्मण ऐकतात योगींद्र शुकाचार्याचे जीवनचरित्र. विदेहराज जनकाकडून ब्रह्मज्ञानाचे पाठ योगिवर शुकांनी गिरवल्याचे ऐकून पराज्ञानासंदर्भातील पराकोटीची जिज्ञासा जागते श्रीरामांच्या मनामध्ये. पराज्ञानाचा बोध श्रीरामचंद्रांना देण्याबाबत विश्वामित्र मग त्या वेळी विनंती करतात दशरथांचे राजगुरू असणाऱ्या ब्रह्मर्षी वसिष्ठांना. वसिष्ठांच्या निकट बसून ब्रह्मज्ञानाचा बोधगाभा मनोभावे आत्मसात केल्यानंतर तारुण्याच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या श्रीरामांच्या मनात प्रकर्षांने दाटते ऊर्मी वैराग्याची; समाधिसुखामध्येच निमग्न राहण्याची. आता आयुष्याच्या या टप्प्यावरच यांच्या ठायी विरागीवृत्तीने ठाण मांडले तर राजकाज कोण बघणार, निरामय समाजधारणेसाठी आवश्यक असणारे खलदुर्जनांचे पारिपत्य कोण घडवून आणणार, अशा रास्त चिंतेने व्यापलेले विश्वामित्र वळतात ते वसिष्ठांकडेच. श्रीरामांची प्रवृत्ती पुन्हा राज्यकारभाराकडे वळेल अशा प्रकारचे उद्बोधन आपणच आता करावे, अशी विनंती वसिष्ठांना करतात विश्वामित्र. जीवनाच्या त्या त्या टप्प्यावर अपेक्षित,उचित असलेली कामे न करता, समाधीसुखाच्या अपेक्षेने एखाद्या व्यक्तीने निष्कामता धारण करणे, हे अपरिपक्वतेचे लक्षण होय, असा रोकडा बोध त्या वळणावर श्रीरामांना कुलगुरू  वसिष्ठ करतात. केवळ निष्कर्म राहणें । तें जीवसमाधीचें लक्षण । तेंही केवळ अपक्वपणें। परिपक्व चिन्ह तें ऐके हे नाथांनी त्या प्रसंगी वसिष्ठांमुखी घातलेले वचन म्हणजे भागवतधर्माला अभिप्रेत असलेल्या ‘योगी’ या संकल्पनेच्या समधात व्याख्येचे सूतोवाचच जणू. समाधिवस्था हे तर योग्याच्या जीवनाचे सर्वोच्च ईप्सित. मात्र, केवळ  आत्ममग्नताच प्रदान करणारी (जीव)समाधी वसिष्ठांना- पर्यायाने नाथांनाच-  मुळात आहे सपशेल अमान्य. त्यांमुळे, लोकव्यवहाराचा भाग बनून समाजमनाला इष्ट वळण देण्यासाठी प्रवृत्तिपर जीवनराहाटी व्यतीत करणाऱ्या धुरीणांसाठी ‘समाधी’ या संकल्पनेची अभिप्रेत असणारी नवव्याख्या सर्व भूतांचे गुणागुण। जगाचे दोषदर्शन। दिसतां न मोडे ब्रह्मपण। ते समाधि पूर्ण पूर्णत्वें अशा शब्दांत नाथराय सिद्ध करतात वसिष्ठाच्या मुखाद्वारे. केवळ इतकेच नाही तर, भवतालातील व्यवहारांत पदोपदी निदर्शनास येणारे अगणितांचे विपरित, निषिद्ध असे आचरण बघूनही, ‘‘हेही विश्वात्मक चैतन्याचेच एक आविष्करण’’, ही भावना अंत:करणातून अणुमात्रही न ढळणे या स्थितीस नाथ ‘पूर्णसमाधी’ असे संबोधतात. भूतांचे विकर्माचरण। भासतां भासें चैतन्यघन। त्या नांव शुद्ध समाधान। समाधि पूर्ण पूर्णत्वें हे नाथांचे उद्गार म्हणजे अपरिपक्व ‘जीवसमाधी’ आणि परिपक्व अशी ‘पूर्णसमाधी’ यांतील मूलभूत अशा गुणात्मक फरकाचे निखळ स्पष्टीकरणच. जीवसमाधीमध्ये आत्ममग्न असणारा ‘योगी’ समाजसन्मुख बनत लोकमग्न अशा ‘संतत्वा’स प्राप्त झाला की अक्षय पूर्णसमाधी उपभोगतो, हेच तर सुचवायचे आहे नाथांना.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak concept of samadhi zws
First published on: 28-09-2021 at 01:27 IST