अभय टिळक agtilak@gmail.com
दहीहंडी म्हणजे काला नव्हे. काला करण्यासाठी आवश्यक असणारे दही शिंक्यामध्ये ठेवलेली हंडी फोडूनच काढावे लागते यात वाद नाही. परंतु, दहीहंडी फोडणे ही भौतिक कृती होय तर, काला ही आहे आंतरिक अवस्था. ती प्राप्त होत असते नीरव एकांतातच. दहीहंडी हा सामूहिक उत्सव असला तरी काला प्राप्त करून घ्यायचा असतो एकेकटय़ानेच. तो व्यवहार निराळाच. तिथे चालत नाही गलबला. त्या प्रांतातील परिभाषाच निराळी. दहीदूध चोरण्यासाठी गोकुळचोर नंदनंदनाबरोबर झुंडीने मोहिमेवर निघालेल्या सवंगडय़ांना, म्हणूनच, हळूहळू चला । कोणी कोणाशीं न बोला असा सावधगिरीचा इशारा प्रत्यक्ष कृष्णतत्त्वच देते असा दाखला आहे तुकोबांचा. गोकुळातील बाळकृष्णलीलांचे गहनगंभीर अंतरंग कधीच हळुवारपणे बघत-अनुभवत नाही आपण. मित्रांसह गोविंद गोकुळ-वृंदावनामध्ये दहीलोण्याच्या चोऱ्या करत हलकल्लोळ उडवून देत असे, याची रसभरित वर्णने दरवर्षी ऐकणे हा आपला परिपाठ बनलेला आहे. परंतु, या रूपकांमागून डोकवणारा सखोल, सघन अतिंद्रिय संदेश तितक्याच संवेदनशीलतेने टिपण्याबाबत बहुतेक वेळा आपण उदासीनच असतो वा राहतो. ‘दिसले घर की मार डल्ला’, असा भुरटा धंदा काही अभिप्रेत नाही तुकोबांना गोकुळातील चौर्यकर्मामध्ये. बालमुकुंदाने बाळगोपाळांसह कोठे धाड घालावी याचा सूक्ष्म उलगडा तुकोबाराय, घर पाहोनि एकांताचे। नवविधा नवनीताचें अशा विलक्षण सूचक व मार्मिक शब्दांत करतात. परतत्त्वाशी परमऐक्याची चिरंतन अवस्था म्हणजे ‘काला’, हे भक्तिविभातील गमक नवविधा भक्तीचा निर्देश करत तुकोबाराय कमालीच्या प्रगल्भपणे अधोरेखित करतात. ‘स्व’चे संपूर्ण विसर्जन होण्याच्या स्थितीला म्हणावे ‘काला’. एकदा का ‘स्व’चे उच्चाटन झाले की ‘पर’ची भावना अंकुरित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘स्व’ नामक एका पदार्थाचा अंत घडून आला की जी स्थिती साकारते तिला म्हणतात ‘एकांत’. दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा हे तुकोबारायांचे स्वानुभवदर्शक वचन निर्देश करते त्याच स्थितीकडे. अद्वयदर्शनाचा हा तर सोलीव गाभाच ! एकच तत्त्व जगदाकार नटलेले आहे याची अनुभूती हे काल्याचे सार. या अर्थाने एकदा का काला यथास्थित झाला की, लौकिक व्यवहारातील सारे भेदाभेद पूर्णत: अप्रस्तुत ठरतात तिथून पुढे. काला सेवन करून अभेदाचा तोच अवीट आनंद अनुभवला गोकुळवासी गोपगोपींनी आणि नंदकुमाराच्या सख्यांनी. आनंदें कवळ देती एका मुखीं एक। न म्हणती सान थोर अवघीं सकळिक अशा प्रगाढ समतेचा माहौल लोकव्यवहारात साकारणे हा होय काल्याच्या उपक्रमाचा सर्वकाळ प्रस्तुत ठरणारा आद्य हेतू. लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती। विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं अशी भयशंकारहित सृष्टी निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणारा उपक्रम म्हणजे काला, अशी भावनावजा दृढ धारणा व्यक्त करतात तुकोबाराय. दहीभाताचा एकजीव केलेला काला हे झाले त्या भावनेचे भौतिक रूप. दही-भात एकत्र केल्यानंतर त्या दोन पदार्थाचे पृथक अस्तित्व दिसते खरे, पण म्हणून त्यांना परस्परांपासून वेगळे काढता येत नाही. यालाच म्हणावे सम्यक् अद्वयदर्शन. तर, हृदया हृदय येक जालें । ये हृदयींचें ते हृदयीं घातलें । द्वैत न मोडितां केलें । आपणाऐसें अर्जुना या अवस्थेला म्हणावे परिपूर्ण काला!