स्वत:च्या लशींच्या कुचकामीपणाची जाण चीनला एव्हाना झाली असावी, परंतु ते कबूल करण्याचा प्रामाणिकपणा त्या देशाकडे नाही..

गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक संहारक ठरलेल्या करोना महासाथीचे उगमस्थान नि:संशय चीन. तेथील वुहान प्रांतात ‘नॉव्हेल करोनाव्हायरस-२’ हा विषाणू २०१९च्या अखेरीस प्रकटला आणि पुढील वर्षांच्या सुरुवातीस चीनमधून निसटून त्याचा जगभर फैलाव झाला. काही कोटींची जीवितहानी आणि कोटय़वधींची वित्तहानी होत असतानाही, विषाणूचा उद्भव वुहानमधील मांसबाजारात झाला की तेथील एका प्रयोगशाळेमध्ये झाला, याविषयी केवळ तर्कच मांडले जाताहेत. कोणताही विषाणू एखाद्या देशात प्रकटणे हे त्या देशाचे पाप नव्हे. पण मानवाला धोकादायक ठरू शकेल असे ठरवल्या गेलेल्या विषाणूचा फैलाव रोखण्याची पहिली जबाबदारी सर्वस्वी उद्भव देशाचीच असते. त्या आघाडीवर चीनने अरेरावी आणि बेजबाबदारपणा दाखवला. करोनाचे फटके बहुतेक सर्व देशांना बसले, पण या विषाणूने सुरुवातीला सर्वाधिक हाहाकार उडवला तो अमेरिका, युरोप आणि नंतर भारतात. ही सर्वच राष्ट्रे किंवा राष्ट्रसमूह वेगवेगळय़ा परिप्रेक्ष्यात चीनचे प्रतिस्पर्धी आहेत हा आणखी विलक्षण योगायोग. तो तसा नसावा, अशी समजूत अमेरिका आणि काही पाश्चिमात्य देशांमध्ये जोर धरू लागली आहे. या समजुतीला आधार होता, तो आणखी एका समजुतीचा. चीनने इतर देशांच्या तुलनेत तत्परतेने आणि यशस्वीरीत्या करोना साथीवर विजय मिळवला, ही ती समजूत. ती किती निराधार होती हे, त्या देशाची सध्या करोनामुळे उडालेली धांदल पाहता प्रत्ययास येते. 

आज अनेक देश कमी-अधिक प्रमाणात करोनाच्या तिसऱ्या-चौथ्या लाटेशी झुंजत असले, तरी तेथे करोना हा आता राष्ट्रीय आपत्ती ठरवला जात नाही. चीनमध्ये तशी वेळ आलेली आहे. शांघाय हे तेथील सर्वात मोठे शहर आणि चिनी समृद्धीचे ठळक प्रतीक तीन आठवडय़ांहून अधिक काळ कडकडीत टाळेबंदीमुळे थिजले आहे. अनेक शहरांमध्ये, प्रांतांमध्ये संचारबंदी, टाळेबंदीचा वरवंटा सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन चिरडून टाकत आहे. तेथील रोजी आणि रोटी केवळ सरकारच्या कृपेवर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या लाटेबरोबर बाधितांची संख्या पुन्हा झपाटय़ाने वाढताना दिसते. हे धक्कादायक खरेच. पण अधिक धक्कादायक वास्तव हे की शांघाय या चीनच्या आर्थिक राजधानीच्या शहरात त्यांतील ९० टक्के रुग्ण आढळले. शांघायव्यतिरिक्त अन्य १८ प्रांतांमध्ये नवीन बाधितांची नोंद झालेली आहे. जवळपास ४४ शहरे पूर्णत: किंवा अंशत: टाळेबंदीग्रस्त आहेत. यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या दिसत नाही. चीनवर ही वेळ आली याचे पहिले कारण म्हणजे, ‘झिरो कोविड’ किंवा शून्य संसर्ग हे अत्यंत अशास्त्रीय आणि अव्यवहार्य धोरण. दुसरे कारण म्हणजे तेथील करोना प्रतिबंधक लशींचा सकृद्दर्शनी कुचकामीपणा. दोन्ही धोरणांच्या मुळाशी आहे अर्थातच चिनी शासकांची एककल्ली दमनशाही. 

चीन अलीकडच्या काळात दर्शनी आणि भागश: समृद्ध बनला ते बंदिस्तपणा आणि संकुचितपणाचे धोरण त्यांनी एकतर्फी सोडून दिले म्हणून. औद्योगिक उत्पादन प्रक्रियेला चालना देत असतानाच, व्यापाराची कवाडे खुली करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे चिनी माल अमेरिका,  युरोप, भारत, ब्राझील अशा बडय़ा बाजारपेठांमध्ये जाऊ लागला. यातून होणारा फायदा दुहेरी होता. अलीबाबा हे नाव अमेरिकेत घराघरांत पोहोचले आणि औद्योगिक-वित्तीय केंद्र म्हणून शांघाय हे शहर  न्यू यॉर्क, लंडन, फ्रँकफर्ट, टोक्यो या शहरांशी स्पर्धा करू लागले. हा सारा व्यापार, ही सारी स्पर्धा तुलनेने निकोप आणि पारदर्शी अशी होती. त्यामुळे चीन जागतिक व्यापार आणि समृद्धीचा सत्त्वगुणक ठरू लागला होता. त्या देशातील एकपक्षीय एकाधिकारशाहीचे वैगुण्य त्यामुळेच तितकेसे खुपत नव्हते. 

ही परिस्थिती पालटली त्या देशाच्या सत्ताधीशपदी क्षी जिनिपग आल्यानंतर. शांततामय सहअस्तित्व या वैश्विक मूल्यावर जिनिपग यांचा विश्वास नाही. त्यांचा चीन हा संकुचित राष्ट्रवादी आणि सत्ताकांक्षी बनला आहे. त्यांची मैत्री आणि त्या मैत्रीपोटी ते इतर देशांना करत असलेली मदत ही निष्ठुर सावकारीपेक्षा वेगळी नाही. म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान भिकेला लागले ते चीनवर विसंबून राहिल्यामुळेच. चीनचे प्राचीन वैभव, मानवी इतिहासातील चीनचे अढळपद वगैरे पुन्हा प्रस्थापित करण्याच्या वेडगळ कल्पनांनी त्यांना आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या अंधमती अनुयायांना झपाटून टाकले. चीनच्या मैत्रीचा उल्लेख वर आला. चीनच्या शत्रूंबाबत तर अधिकच दु:साहसी धोरण या देशाने अवलंबले. भारत त्या दु:साहसाची सर्वाधिक झळ बसलेला देश. भारत, भूतान यांचे काही भूभाग, संपूर्ण तैवान, दक्षिण चीन समुद्रातील विशाल टापू यांवर स्वामित्व सांगण्याची हिंमत याच मग्रुरीतून आलेली. चीनचे हे खेळ सुरू असताना करोना धडकला. 

या साथीचे जागतिक स्वरूप पाहता, परस्पर सहकार्याशिवाय तीवर मात करणे जवळपास अशक्य. चीनला फारसे मित्र नाहीत. इराण, उत्तर कोरिया, पाकिस्तान आणि रशिया यांची करोना रोखण्यातली सिद्धता दिव्य म्हणावी अशीच. त्यामुळे करोनाचा सामना इतर बडय़ा देशांच्या सहकार्याने करणे क्रमप्राप्त होते. चीनच्या नेतृत्वाने तो विचारही केलेला दिसत नाही. प्रगत पाश्चिमात्य देशांना करोनाची झळ काही कमी बसली नाही. परंतु शोधक संस्कृती आणि वैज्ञानिक बैठक पक्की असल्यामुळे करोनाविरोधात पहिले शस्त्र म्हणजे लशींच्या संशोधनासाठी तेथील बहुतेक यंत्रणा कामाला लागल्या. लस निर्मिल्याची फुशारकी चीननेही मारून झाली. पण त्यांच्या लशी आणि पाश्चिमात्य लशींतील मूलभूत फरक होता पारदर्शित्वाचा आणि बहुस्तरीय विकसनाचा. पाश्चिमात्य लशी एकेक टप्पा ओलांडत, यशापयशाचा सामना करत, कसोटय़ांवर तावूनसुलाखून विकसित झाल्या. पुन्हा आमच्या लशी म्हणजे रामबाणच असा दावा आजतागायत त्यांच्यातील कोणीही केलेला नाही. चिनी लशींच्या बाबतीत उलटा प्रकार. किती लोकांवर त्यांच्या चाचण्या झाल्या, वयोगटाचे नमुने किती होते, नमुन्यांची व्यामिश्रता किती, सर्वात महत्त्वाचे म्हणजे लशींची परिणामकारकता किती यांविषयी आकडेवारी वा माहिती प्रसृत करण्याची चिन्यांची संस्कृती नाही. त्यामुळे शून्यसंसर्ग धोरण राबवूनही आणि लशीही जवळपास सर्वाच्या आधी वगैरे विकसित केलेल्या असूनही आज त्या देशावर ही वेळ का आली? पण हा प्रश्न विचारण्याची आणि त्यांना उत्तरे देण्याचीही तेथे संस्कृती नाही. हे सारे वास्तव आता  उघडे पडत आहे. कारण शून्यसंसर्गाविषयी चिनी नेतृत्वाला आजही विश्वास वाटतो. कदाचित स्वत:च्या लशींच्या कुचकामीपणाची जाण त्यांना आता झाली असावी. परंतु ते कबूल करण्याचा प्रामाणिकपणा चीनकडे नाही. त्यामुळे आजही चीन लशी आयात करत नाही.

करोनाच्या निमित्ताने चीन आणि युक्रेन युद्धाच्या निमित्ताने रशिया एकटे पडणे यात काही संगती सापडू शकतील. दोन्ही देशांच्या नेतृत्वाने केवळ वैयक्तिक सत्ताकांक्षेपुढे राष्ट्रहिताला गौण ठरवले. करोनामुळे मोठय़ा संख्येने मनुष्यहानी ही दमनशाही नेतृत्व असलेल्या देशांमध्ये सर्वाधिक झाली. करोना हाताबाहेर जाऊ लागला तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्य, व्यापारस्वातंत्र्य, रोजगारस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य, आस्वादस्वातंत्र्य यांचा संकोच करण्याची प्रवृत्ती सर्वाधिक या देशांत दिसून आली. अमेरिकेत रस्तोरस्ती रुग्ण मरण पावत होते, तेव्हा त्या देशात डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता होती. ब्राझील, रशिया यांची कहाणी वेगळी नाही. यांतील काही नेत्यांना साथीचे गांभीर्यच कळाले नाही, काहींचा स्वत:च्या आकलनावर आणि धोरणांवर फाजील विश्वास होता. आमचे आम्हीच अशी टिमकी वाजवण्यात आणि आत्मप्रौढी मिरवण्यात ही मंडळी मश्गूल राहिली. पण एखादे वेळी असा दमनज्वर उलटतो, तेव्हा त्याची जबर किंमत मुक्या बिचाऱ्या जनतेला मोजावी लागते. चीनमध्ये हेच होताना दिसते. हा धडा आहे. मोकळेपणा, पारदर्शता यास कर्तबगार नेता हा पर्याय नसतो.