जागतिक आरोग्य संघटनेचा करोना-मृत्यूंविषयीचा अहवाल खरे तर महत्त्वाचा दस्तावेज ठरू शकेल. पण आपला त्यातील मोजणी-पद्धतीला आक्षेप..

मोजणे- मापणे विरुद्ध अनमान-धपका यांत आपण भारतीयांस काय अधिक पसंत हे सांगण्याची गरज नाही, इतका हा (अव)गुण आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे. मुद्दा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचा, बेरोजगारीचा असो वा एखादा खाद्यपदार्थ बनवण्याचा. स्वच्छ, पारदर्शी, विज्ञानाधारित मोजमाप टाळण्याकडेच एकूण कल. म्हणून महत्त्वाच्या क्षेत्रांची आकडेवारीच आपणाकडे उपलब्ध नसते आणि खाद्यपदार्थातही आपले बल्लवाचार्य ‘चिमूटभर मीठ’ वा ‘चवीपुरती साखर’ घालण्याचे सल्ले सहज सर्रास देतात. म्हणजे मोजमाप नाही. जसे आपण तसे आपले सरकार. त्यामुळे त्याचाही कल आकडेवारी-आधारित भाष्यापेक्षा कुडमुडय़ा भाकितांवरच अधिक. हे आपले सांस्कृतिक वैगुण्य ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या ताज्या वृत्तलेखामुळे पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आले आहे. विषय आहे करोनाच्या पहिल्या तीन लाटांत किती भारतीयांचे प्राण गेले, हा. सध्या या महासाथीच्या चौथ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर असताना हे प्रकरण उघडकीस आले असल्याने त्याची दखल घेणे आवश्यक ठरते.

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करोना साथीत जगात किती बळी गेले याची साद्यंत पाहणी सुरू असून त्याचा अहवाल प्रकाशित होणे अपेक्षित आहे. तथापि भारतामुळे या प्रयत्नांत मोठी आडकाठी येत असल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले. विशेष म्हणजे ते भारत सरकारने नाकारलेले नाही. ही बाब फारच महत्त्वाची. कारण परदेशी वृत्तपत्रांनी प्रतिकूल वाटेल असे काहीही प्रसिद्ध केले की आपली प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया ‘हा भारतविरोधी कट’ अशी बालिश आणि न्यूनगंड निदर्शक असते. याबाबत तसे झालेले नाही. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने आरोग्य संघटनेच्या पाहणीस आपला विरोध असल्याचे मान्य केले आहे. हा विरोध नोंदवण्यासाठी भारताने जागतिक आरोग्य संघटनेस पाच-सहा पत्रे पाठवली आणि तीत नक्की आक्षेप कशास आहे हे प्रकट केले. या जागतिक पाहणीनुसार जगभरात २०२१ च्या अखेरीपर्यंत जगभरात करोनाने दीड कोटी जनांनी इहलोकीची यात्रा संपवली. ही संख्या सर्व देशांनी जाहीर केलेल्या आपापल्या देशांतील मृतांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा अधिक भरते. आतापर्यंतच्या तपशिलानुसार करोनामुळे जगात साठ लाख जण प्राणास मुकले, असे मानले जाते. पण जागतिक आरोग्य संघटना तर म्हणते ही संख्या आहे दीड कोटी. तसे असेल तर प्रत्येक देशातील बळींच्या संख्येतही त्यानुसार बदल होतो. त्यानुसार एकटय़ा भारतातूनच या साथीत ४० लाखांचे बळी गेले असे हा संभाव्य अहवाल सुचवतो.

आपल्याला अर्थातच हे मंजूर नाही. पण तसे थेट म्हणणे बरे दिसणार नाही, असे वाटल्यामुळे असेल बहुधा पण त्यामुळे आपण आक्षेप घेतला आहे तो पाहणी-पद्धतीस. जागतिक आरोग्य संघटनेची ही मृत-मापन पद्धत चुकीची आहे, असे आपले म्हणणे. ते नोंदवताना आपण ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या हेतूंबाबत संशय व्यक्त करण्यास विसरलेलो नाही, ही बाब सूचक. ज्या पद्धतीने आरोग्य संघटना मृत-मापन करू पाहते तीत एकवाक्यता आणि समानता नाही, हे आपले म्हणणे. त्यानुसार जगाची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून या दोन गटांतील देशांतल्या बळींचे दोन पद्धतींनी मापन केले गेले. हे आपणास नाकबूल आहे. ‘आपल्यासारख्या खंडप्राय देशासाठी असा निकष लावला जाणे अयोग्य आहे,’ हा आपल्या आरोग्य खात्याचा युक्तिवाद. त्याच्या समर्थनार्थ आपले तर्काधारित मुद्दे काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते कदाचित होणारही नाही. कारण ‘आम्ही इतरांसारखे नाही’ अशी एकदा का भूमिका घेतली की इतरांस जे लागू होते ते आपणास कधीच स्पर्श करू शकत नाही. याच धारणेतून आपला या मोजमापनास आक्षेप दिसतो. पण महत्त्वाची बाब ही की असा आक्षेप घेणारे आपण एकटेच नाही. या आक्षेप मोहिमेत आपले साथीदार देश आहेत इराण, बांगलादेश, सीरिया, इथियोपिया, इजिप्त आणि चीन.

यावरून आपण कोणाच्या तरी पंगतीत आहोत हे कळेल. या कोणत्याही देशात करोना साथ आणि तिने घडवलेला उत्पात याविषयी पारदर्शकता नव्हती आणि नाहीही. यातील चीन या देशात सध्या चौथ्या वा पाचव्या लाटेचा धुमाकूळ सुरू आहे. शांघाय हे त्या देशाचे आर्थिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे शहर अराजकाच्या उंबरठय़ावर आहे. त्या शहरातील नागरिक आणि सरकारी यंत्रणा यात करोना हाताळणीबाबत संघर्ष सुरू झाला असून सुरक्षारक्षकांस पाचारण करण्याची वेळ आली आहे. पण हा देश आपला करोना मृत-मापनास आक्षेप घेणाऱ्यांतील जोडीदार;  यातच काय ते आले. बाकी इथियोपिया वा सीरिया या देशांविषयी बरे बोलावे असे काहीही नाही. अनैसर्गिक मृत्यू हे या देशांतील नागरिकांचे प्राक्तन. कधी करोना तर कधी यादवी इतकाच काय तो फरक. खरे तर त्यामुळे करोनाच्या बळींची संख्या मोजण्यास त्या देशांस इतका आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. कलेवरे मोजणे हा तेथे नैमित्तिक कार्यक्रम. इराण, बांगलादेश यांची स्थिती या देशांपेक्षा निश्चित बरी. विशेषत: बांगलादेशाची आर्थिक प्रगती तर वाखाणण्याजोगी. आपल्या ज्येष्ठ सहोदरास, म्हणजे पाकिस्तान, बांगलादेशाने मागे टाकले आहे. पण तरी करोना मृत-मापनास त्याचा विरोध.

याच्या जोडीला आपण. आपली पवित्र वगैरे गंगामैया करोनाकाळात शववाहिनी झाली, प्राणवायूअभावी अनेकांस तडफडत प्राण सोडावे लागले, भीषण टाळेबंदीमुळे कराव्या लागलेल्या स्थलांतरणात अनेकांनी प्राण गमावले. पण याची आकडेवारी आपल्याकडे नाही. आपल्या सजग सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेसदेखील यातील काही पडले नाही. अशा परिस्थितीत न पाहिल्यामुळे जे दिसलेच नाही, ते मोजायचे कसे, हा गंभीर प्रश्न आपल्या सरकारांपुढे असणार. त्याचमुळे; प्राणवायूअभावी प्राण गमावलेल्यांची एकही नोंद आपल्या देशात अजूनही नसावी यात आश्चर्य ते काय? सर्वोच्च लोकप्रतिनिधीगृहांतही सरकारने दिलेले उत्तर हे असेच आहे. त्या वेळी पत्रकारितेच्या धर्मास जागणाऱ्या वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने, वृत्तवाहिन्यांची दृश्ये प्राणवायूसाठी व्याकूळ नागरिकांच्या जथ्यांनी भरून गेले होते. प्राणवायू पुरवणाऱ्या नळकांडय़ा घेण्यासाठी देशाची राजधानी दिल्ली आदी परिसरांत रांगाच्या रांगा लागल्या. परिस्थिती इतकी गंभीर की रुग्णालयेदेखील माना टाकू लागली. पण याची अधिकृत तपशीलवार आकडेवारी सरकारने सादर केल्याचे दाखले औषधालाही मिळण्याची पंचाईत. त्यात या सर्वास राजकीय उत्तर मतपेटीतून मिळाले असे मानणाऱ्यांची आपल्याकडे चलती! अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचा हा अहवाल खरे तर या संदर्भातील महत्त्वाचा दस्तावेज ठरू शकेल. पण आपला त्यालाही आक्षेप. वास्तविक भारताने या संघटनेचे काही घोडे मारलेले नाही. त्यामुळे आपल्याविषयी या संघटनेस आकस असण्याचा, भारताची बदनामी करण्याचा वगैरे उद्देश असण्याचे काही कारण नाही. पण तरीही आपणास असे वाटत असेल तर ते वास्तवापेक्षा खरे तर आपल्या न्यूनगंडाचे निदर्शक ठरते. महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशाने ही भीती सोडायला हवी. मोजमापास विरोध म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनास विरोध. तो जितका लवकर आपण सोडू तितकी अधिक प्रगतीची संधी. मोजमापाची सवय प्रत्येकास वास्तव समजून घेण्यास उपयोगी असते. म्हणून वास्तव बदलू पाहणाऱ्या प्रत्येकाने मोजमापाची सवय अंगीकारणे आवश्यक. ती अभावी आपल्या महानतेचे गोडवे मनातल्या मनात गाणे निर्थक ठरेल.