गुजरात निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरलेली होतीच.. तिचा नीचांक अय्यर यांनी गाठला.

विनाशासाठी आवश्यक असलेल्या सर्व अहंगुणांचा समुच्चय कोणा एका ठायी पाहावयाचा असेल तर त्यासाठी मणिशंकर अय्यर यांच्याइतके दुसरे आदर्श उदाहरण नाही. उच्च वर्ण आणि वर्ग, बुद्धिमान, त्यात प्रशासकीय अधिकारी, निवृत्त्योत्तर राजकारण प्रवेश आणि या सगळ्या अवगुणांनी जिभेला चढलेली धार. अशा या मणिशंकरांस स्वत:च्या जिभेवर सरस्वती नर्तन करते असे भास वारंवार होत असतात. त्यातूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलू नये ते बोलले. तेदेखील अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकांच्या तोंडावर. वास्तविक इतक्या कागदोपत्री तरी शहाण्या माणसास कोणत्या वेळी कोणाविषयी काय शब्दांत बोलावे इतका ताळतंत्र असू नये, ही एरवी आश्चर्याचीच बाब ठरली असती. परंतु मणिशंकर यांच्याविषयी यात काहीही आश्चर्य नाही. अशा या मणिशंकराची जीभ पंतप्रधान मोदी यांच्याविषयी जरा जास्तच घसरली यात शंका नाही. ते जे बोलले ते अत्यंत निषेधार्ह आहे यात वादच नाही. तथापि तसे पाहू गेल्यास हा काळच सर्व काही घसरण्याचा. जीभ, वृत्ती, पाय असे अनेकांचे अनेक काही या काळात घसरताना दिसून येते. आव्हाने आली की माणसातील उच्चतम गुणांचे दर्शन होते, असे मानतात. परंतु हे सत्य राजकीय आव्हानांना लागू नाही. राजकीय आव्हान जितके मोठे तितके त्यास सामोरे जाणाऱ्या व्यक्तींतील दुर्गुणांच्या दर्शनाची संधी अधिक.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हेच दिसून येते. या निवडणुकांचा पहिला टप्पा संपला असून त्यात जवळपास ७० टक्के इतके मतदान झाले. गुजरातचे भाग्यविधाते, त्या राज्याची देशास देणगी असलेले विकासपुरुष नरेंद्रभाई मोदी यांच्या राज्यातील ही निवडणूक. स्वत: मोदी यांना गुजरात तळहाताच्या रेषांइतका परिचित. स्वत: चार चार वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकलेली आणि सलग १४ वर्षे गुजरातवर राज्य केलेले. तेव्हा आपल्या जन्मभूमीच्या विधानसभेत बहुमत मिळवणे म्हणजे जणू त्यांच्यासाठी हातचा मळच. त्यात देशात पंतप्रधान म्हणून गेल्यावर त्यांनी जो काही विकासाचा धडाका लावला तो पाहता खरे तर गुजरात विधानसभेसाठी मोदी यांनी स्वत: वणवण करण्याचीदेखील गरज नव्हती. त्यांची पुण्याई इतकी थोर की त्यांनी शेंदूर फासलेला प्रत्येक दगड सत्तासागरात खरे तर आपोआपच तरंगायला हवा.

परंतु तसे काही झाले नाही. उलट आपल्या पश्चात हे राज्य हातून जाईल की काय अशी परिस्थिती आली असून आपल्या पक्षाची नव्हे तर आपली इभ्रत वाचवण्यासाठी मोदी यांना स्वत: जातीने कंबर कसावी लागली, हे उल्लेखनीय. यामुळे कावलेल्या मोदी यांच्या हाती मणिशंकर अय्यर यांनी कोलीतच दिले. आधीच मुळात गुजरातेत निवडणुकीत विकासाचा मुद्दाच नाही. आपले आचार विकासाचे, विचार विकासाचे आणि म्हणून कृतीही विकासाची असे मोदी सांगतात. त्यामुळे या निवडणुकीत विकासाखेरीज काही मुद्दाच असणार नाही, अशी बापुडय़ा जनसामान्यांची आशा. आणि त्यात काँग्रेसने देशात काहीही विकासच केलेला नसल्याने भाजपच्या विकासासमोर आव्हान उभे राहणारच नाही, असे मोदी यांनी जनतेस सांगितले होते. आपल्या कार्यतेजाने विरोधकांचे डोळे दिपून आपण म्हणू त्या साजिंद्यांना निवडलक्ष्मी माळ घालेल, असा मोदी यांचा अंदाज. तो किती चुकला किंवा काय याचे उत्तर १८ डिसेंबरास मतमोजणीत काय ते मिळेलच. परंतु ते उत्तर काय असू शकते याच्या केवळ अंदाजानेच मोदी आणि त्यांची वैचारिक सावली पक्षाध्यक्ष अमित शहा यांना धडकी भरली असावी. त्यामुळे समोर आ वासून उभे असलेले संकट टाळण्यासाठी मोदी यांनाच जातीने मैदानात उतरावे लागले. इतक्या मोठय़ा प्रचंड देशाचा पंतप्रधान एका मध्यम आकाराच्या विधानसभा निवडणुकीसाठी दिवसाला पाच-सहा सभा घेत रानोमाळ हिंडू लागला. यावरून त्यांचे गुजरातच्या मातृभूमीवरचे प्रेम जसे दिसून आले तसेच त्यातून गुर्जर बांधवांच्या भाजपवरील आटत्या प्रेमाचीदेखील चाहूल लागली. आणि प्रेमभंगाच्या उंबरठय़ावर असलेला जसा सैरभैर होतो, तसा भाजप या निवडणुकीत बावचळला. त्यामुळे काय काय घडले या राज्यात!

राजकीय आव्हान देणाऱ्या हार्दिक पटेल याचे कथित शयनगृह दर्शन, राहुल गांधी यांचा धर्म कोणता त्याची चिकित्सा, त्यांचे मौंजीबंधन झाले होते किंवा काय, या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा, मोरवी येथे कित्येक दशकांपूर्वीच्या धरण अपघातामुळे झालेल्या विध्वंसाची पाहणी करण्यासाठी आल्या असता इंदिरा गांधी यांनी नाकास लावलेल्या पदराचे दाखले, माता नर्मदेच्या प्रश्नावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कशी आपणास भेटच नाकारली होती त्याचे हवेतले किस्से, मग त्यानंतर मनमोहन सिंग यांना कसे वयपरत्वे विस्मरण होत असावे असे सांगत सिंग यांच्याविषयी व्यक्त केली गेलेली निराधार शंका, काँग्रेस सत्तेवर आल्यास मुख्यमंत्रिपदी मुसलमान व्यक्ती येईल याची घातली गेलेली भीती, मुसलमान आहेत म्हणून अहमद पटेल यांच्या नावाचे काँग्रेसचे भावी नेते असे झळकलेले फलक, तुम्हाला मंदिर हवे की मशीद आणि गुजरातेतील निवडणुकीत पाकिस्तानचे काम काय हे खुद्द पंतप्रधानांनीच विचारलेला प्रश्न तर म्हणजे कळसच. असे किती दाखले द्यावेत? या सगळ्यात कोठेही राजकीय सभ्यता, किमान सत्य प्रतिपादनाचे संकेत आदी काहीही पाळले गेले नाही. यात अर्थातच सत्ताधारी भाजप आघाडीवर होता आणि तो तसा राहीलदेखील. याचे कारण गुजरातसारख्या आपल्यासाठी अतिसुरक्षित राज्यात आपल्याला आव्हान निर्माण होऊ शकते हेच भाजपस मान्य नाही. तेदेखील ज्याच्या नावे केवळ विनोदच पसरवले जात होते त्या राहुल गांधी या कालच्या पोराकडून, हे भाजपस सहन होण्याच्या पलीकडचे आहे. आणि ते तसे सहन झाले नाही हे या प्रचारातून दिसून आले. या निवडणुकीची हवा तापू लागली तेव्हापासून तेथून विकास जो गायब झाला तो झालाच. इतकेच काय, पण पंतप्रधान खुद्द जातीने निवडणुकीसाठी गुजरातेतच स्वत:स बांधून घेते झाल्याने अन्यत्रचीदेखील विकासाची चर्चा खुंटली. आधी लगीन गुजरातचे, हाच जणू भाजपचा मंत्र बनला.

तेव्हा या निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरलेली होतीच. तिचा नीचांक मणिशंकर अय्यर यांनी गाठला. या निवडणुकांची आणखी एक फेरी १४ तारखेस आहे. तोपर्यंत मणिशंकराचा विक्रम राखला जाईलच असे नाही. कारण सर्वच पक्षीय राजकारण्यांनी पातळी सोडण्याचा जणू चंगच बांधलेला आहे. जो पक्ष सभ्यतेच्या राजकारणाची भाषा करतो, आविर्भाव आणतो त्याच पक्षाने सभ्यतेची पातळी सोडली की मणिशंकरांसारखेच बेताल समोर येणार यात शंका नाही. शहाण्याच्या शहाणपणास मर्यादा पडू लागल्या की वेडय़ांचे वेडेपण हाताबाहेर जाते. मणिशंकर यांनी आपल्या अत्यंत निषेधार्ह अशा वक्तव्यातून तेच दाखवून दिले. परंतु लक्षात घ्यायचे की मणिशंकर हा आजार नाही. ते लक्षण आहे. प्रतिस्पध्र्यास शत्रू मानण्याची वृत्ती हा खरा आजार. तो बळावला की त्यातून असे मणिशंकर निपजतात. ते आज सर्व पक्षांत आहेत. म्हणून आधी निवडणुका म्हणजे लढाई नव्हे आणि प्रतिस्पध्र्याचा पराभव म्हणजे त्याला समूळ नष्ट करणे नव्हे हे आधी लक्षात घ्यावे लागेल. तसे झाल्यास काँग्रेसमुक्त भारत यांसारखी विधाने केली जाणार नाहीत. अशा सर्वपक्षीय मणिशंकरांपासून मुक्ती हवी असेल तर आधी हा बदल करावा लागेल.