अर्थव्यवस्था, दहशतवादाचा धोका आणि देशाचे उज्ज्वल भविष्य यांवर भाष्य करणारे ओबामा यांचे राष्ट्राला उद्देशून केलेले अखेरचे भाषण चिरकाल स्मरणात राहील..

‘‘ज्यांचे आपले मतक्य नाही त्या सगळ्यांविषयी दुष्टबुद्धी बाळगणे योग्य नव्हे. आपले जे ऐकतात त्यांचेच तेवढे ऐकणे म्हणजे लोकशाही नव्हे,’’ हे ओबामा यांचे विधान तर जगातील देशांत.. यांत आपणही आलो.. सुविचारच ठरावे.

अमेरिकी काँग्रेसच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बठकीसमोर अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेले भाषण हे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा आढावा घेणारे सम्यक दर्शन ठरते. अशा संयुक्त बठकीसमोर अध्यक्ष करतो ते भाषण स्टेट ऑफ द युनियन अ‍ॅड्रेस या नावाने ओळखले जाते. या वार्षकि सोहळ्याची प्रथा जॉर्ज वॉिशग्टन यांनी सुरू केली. गतसाल कसे गेले आणि नवे साल काय आव्हाने घेऊन उभे आहे याचे विवेचन अमेरिकी नागरिकांसमोर करणे हा त्याचा उद्देश. त्या देशातील सर्व रेडियो केंद्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, इंटरनेट आदी सर्व माध्यमांतून हे संबोधन थेट प्रसारित केले जाते. वॉिशग्टन यांच्या नंतर थॉमस जेफरसन यांनी काही काळ ही प्रथा बंद केली. ती लोकशाहीतील वाटत नाही, असा त्यांचा आक्षेप होता. म्हणजे ग्रेट ब्रिटनच्या महाराणीने प्रजेस संबोधावे असे ते वाटते, असे त्यांचे म्हणणे. परंतु १९१३ साली व्रुडो विल्सन यांनी पुन्हा ही परंपरा सुरू केली. ती आजतागायत चालू आहे. अध्यक्ष ओबामा यांचे बुधवारचे भाषण हे त्याच मालिकेतील. २००८ साली निवडून आल्यानंतर ओबामा यांना पहिल्यांदा अशा भाषणाची संधी मिळाली. त्यांचे कालचे भाषण हे सातवे. आणि शेवटचे देखील. पुढील वर्षीच्या अशा संबोधनासाठी अमेरिकेने आपला नवा अध्यक्ष येत्या नोव्हेंबर महिन्यातील निवडणुकीत निवडलेला असेल. अमेरिकी कायद्यानुसार कोणताही अध्यक्ष जास्तीत जास्त दोन कालावधींपर्यंतच पदावर राहू शकतो. त्यामुळे ओबामा यांना आता निवडणूक लढविता येणार नाही. हे अखेरचे अध्यक्षीय भाषण त्यामुळेच महत्त्वाचे ठरते.

यात ओबामा यांनी गत सात वर्षांतील घडामोडींना स्पर्श केला. ओबामा सत्तेवर आले तेव्हा अमेरिकाच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेस पांगुळलेपण आले होते. ओबामा यांच्या शपथग्रहणाआधी बुडालेल्या लेहमन ब्रदर्स बँकेने सर्व आíथक संकटांची किनार गहिरी केली होती. तेव्हापासून आजतागायत अर्थव्यवस्थेचे केले गेलेले पुनरुज्जीवन ही ओबामा यांच्या खात्यावरची मोठी जमा. तिचा सार्थ उल्लेख ओबामा यांच्या भाषणात होता आणि त्या पुष्टय़र्थ रोजगार निर्मितीची आकडेवारीही त्यांनी सादर केली. याचे महत्त्व अमेरिकी व्यवस्थेत मोठे आहे. त्याचमुळे त्यांनी भाषणाची सुरुवातच मुळी आíथक विषयांनी केली. ‘‘आपण जगातील सर्वात सशक्त अर्थव्यवस्था आहोत आणि ते स्थान आपले अधिकच बळकट झालेले आहे,’’ हे ओबामा यांचे उद्गार स्थानिकांसाठी महत्त्वाचे होते. याचे कारण मध्यंतरी अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील सावटाची बरीच चर्चा झाली. परंतु ते सावट आता दूर झाले आहे, असा संदेश त्यांना आपल्या नागरिकांना द्यावयाचा होता. त्यात ते चांगलेच यशस्वी झाले. याच्या जोडीला अमेरिका अजूनही ज्ञान आणि तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रात कशी आणि किती आघाडीवर आहे, याचा दाखला त्यांनी दिला. त्यासाठी थॉमस एडिसन ते सॅली राइड अशा अनेकांच्या नावांचा दाखला त्यांनी दिला. राइड या पहिल्या महिला अमेरिकी अंतराळवीर. तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. ओबामा यांच्या भाषणात राइड यांचा उल्लेख सूचक म्हणावा लागेल. अमेरिकी निवडणुकीच्या निकालात महिलांचा वाटा मोठा असतो, असे विख्यात पत्रकार, लेखक स्टीव्ह कोल यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’शी बोलताना नमूद केले होते. त्याचा प्रत्यय ओबामा यांच्या भाषणात आला. ओबामा ज्या पक्षाचे आहेत त्या डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी िक्लटन यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास नक्की आहे. तेव्हा राइड यांच्या उल्लेखाचा अर्थ लक्षात येतो.

या भाषणात महत्त्वाचा भाग आहे तो विरोधी रिपब्लिकन पक्षाचे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यावरील. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या अमेरिकेत उच्छाद मांडलेला आहे. मुसलमानांविषयी जमेल तितकी बेजबाबदार विधाने करून जास्तीत जास्त ख्रिस्ती मतदारांना आपल्याकडे वळवणे हे त्यांचे राजकारण. यामुळे अमेरिकेत दुहीची भीती निर्माण झाली असून या ट्रम्प यांना आवरावे कसे हा प्रश्न सुज्ञांना पडलेला आहे. त्याचे प्रतििबब ओबामा यांच्या भाषणात दिसले. त्यांनी कोठेही ट्रम्प यांचा वा रिपब्लिकन पक्षाचा उल्लेखदेखील केला नाही. परंतु तरीही ओबामा यांची विधाने धारदार होती. एखाद्याचा जन्म, धर्म, कांती यावरून त्यास वेगळे पाडणे हे किती मागास राजकारण आहे, हे ओबामा यांनी नमूद केले. ‘‘हे या पद्धतीने राजकारण करणे हे अमेरिका महान का झाली हे कळत नसल्याचे लक्षण आहे,’’ असे ते म्हणाले. या त्यांच्या विधानाचा परिणामही लगेच दिसून आला. साऊथ कॅरोलायनाच्या गव्हर्नर निक्की हॅली यांनी जाहीर निवेदन करून ओबामा यांच्या विधानाचे स्वागत केले. हॅली यांचा उल्लेख यासाठी करावयाचा कारण त्या रिपब्लिकन पक्षाच्या आहेत. ‘‘जेव्हा आपल्यातले काही मुसलमानांना लक्ष्य करतात, त्यांच्या धर्माचे नाव घेऊन आरोप करतात, त्या धर्मातील तरुणांविषयी मत कलुषित करतात म्हणून आपले जगणे सुरक्षित होते असे मानणे खुळचटपणाचे आहे,’’ असे ओबामा यांचे थेट विधान आहे. ते अमेरिकेबाहेरही तितकेच लागू पडते हे चाणाक्षांच्या ध्यानी येईलच. हे असे करणे वा बोलणे म्हणजे राजकारण नव्हे. ‘‘ज्यांचे आपले मतक्य नाही त्या सगळ्यांविषयी दुष्टबुद्धी बाळगणे योग्य नव्हे. आपले जे ऐकतात त्यांचेच तेवढे ऐकणे म्हणजे लोकशाही नव्हे,’’ हे ओबामा यांचे विधान तर जगातील देशांत..यांत आपणही आलो..सुविचारच ठरावे. ‘‘या पद्धतीच्या भाषेने आपण जगाच्या नजरेतून उतरतो हेदेखील ही भाषा करणाऱ्यांना कळत नाही. या भाषेमुळे आपण आपल्या लक्ष्यापासून दूर जाऊ आणि तो देश म्हणून आपला पराभव असेल,’’ इतक्या नि:संदिग्धपणे ओबामा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आवर्जून लक्षात घ्यावा असा त्यांच्या भाषणातील अन्य मुद्दा म्हणजे नागरिकांच्या देशाविषयीच्या बांधिलकीचा. कोणाला तरी वाटते म्हणून कोणीतरी युद्ध करते, असे व्हायला नको, अशा शब्दांत त्यांनी त्यांचे पूर्वसुरी जॉर्ज बुश यांची खिल्ली उडवली. बुश यांच्या काळात अमेरिकेने अफगाणिस्तान, इराक आदींविरोधात युद्ध छेडले. त्यात अमेरिकेचे दुहेरी नुकसान झाले. आíथक आणि जीवितदेखील. आपल्या मतास काहीही किंमत नाही असे सर्वसामान्य माणसास जेव्हा वाटू लागते तेव्हा ते लोकशाहीच्या अशक्ततेचे लक्षण असते, हे त्यांचे आणखी एक दखल घ्यावी असे विधान.

या भाषणात ओबामा यांनी देशाला भेडसावणाऱ्या काही समस्यांना स्पर्श केला. त्यातली एक निवडणुकीतील खर्चाची होती. आपल्याला या भाषणातला जवळचा वाटेल असा त्यातल्या त्यात हाच मुद्दा. व्यवस्थेतील त्रुटी कशा बदलता येतील आणि नागरिकांचा प्रतिसाद त्यासाठी कसा आवश्यक आहे याचे तटस्थ तरीही पुरेसा ओलावा असलेले विवेचन ओबामा यांनी केले. त्यांच्या भाषणाचा शेवटही तसाच हृद्य होता. ‘‘आपले काम चोख करणारा रस्त्यावरचा पोलीस, आपल्या संरक्षणासाठी वाटेल ते पणास लावणारा जवान, मुलांना उत्तेजन देणारे वडील..आपले मतदान कर्तव्य बजावणारा तरुण मतदार..ही अमेरिका माझ्या माहितीची आहे. तुम्हालाही हीच अमेरिका आवडणारी आहे. नि:शस्त्र सत्यास भिडणारी, नि:स्वार्थी प्रेमाने जिंकणारी, स्वच्छ दृष्टिकोनाची आशावादी अमेरिका ही आपली अमेरिका आहे. ती तशीच राहील ही खात्री मला आशावादी ठेवते,’’ या ओबामांच्या उद्गाराचे स्वागत उपस्थितांनी मानवंदना देऊन केले नसते तरच नवल.

ती मानवंदना बराक हुसेन ओबामा यांना मिळाली कारण तो करून दाखविलेला, म्हणून करविता, नेता आहे. नुसते बोलविते कोण हे आपण पाहतोच.